आनंदामृत     

      *प्रकरण चौदावे*          

         *अद्वैतानुभव* 

नित्य सावध राही नरा ! नित्यानित्य विवेक पाही बरा।
सत्य असत्याचिये विचारा। लागे वेगी ॥१॥

जरी ख्यातिच व्हावी जगी। तरी मायिक प्रेम धरी वेगी।
अनुभवणे असे स्वरूपालागी। तरी सत्संग धरावा ।। २ ।।

जाऊनि गुरूसी शरण। पुसावे स्वामी मी कोण? ।
आलो कासया कारण? जगामाजी कोण माझे? ।।३।।

जरी धरिशी फार  हट्ट। की सांगावी इतुकी गोष्ट ।
तेणे कळेल स्पष्ट स्पष्ट। स्वरूप तुझे ।।४।।

भक्त कोण, देव कोण । हेचि पाहावे आधी जाण ।
मग शास्त्रांची गुंतवण। न लागेचि ॥५॥

विवेके शोधावे अंतरी । त्या महावाक्याचा अर्थ धरी। स्वतः बह्म कैसिया परी। आहे मी हो! ॥६॥

स्वरूप शाश्वत पाहावया। अशाश्वत सोड माझे सखया!।
लक्ष लावी सत्य ठाया। शुद्ध जीवन करोनि ।।७।।

पाहावया भगवंताकारण I क्षणिक नको वैराग्य
ज्ञान ।  अष्टधा प्रकृतीचे महिमान I दुर सारी ॥८॥


आनंदामृत      

दृष्टी दिसे जे जे काही। विवेके सांडी सर्व पाही।
मायिकांचे सूक्ष्म लक्षण तेहि। दूर करी ।।९।।

जेथे नसे पंचभूत । कल्पनातीत तत्त्व अद्भुत ।
निर्विकार स्वसंवित। तेचि जाण स्वठायी ।।१०।।

सत्य काय आहे बापा! त्वरित पाही, घेई मापा ।
असत्याच्या निवारी पापा। स्वस्वरूपा जाण सख्या! ॥११॥

बोधरहित बुद्धीने घुसती। अंधारी अद्वैत न होती।
ते जरी स्वरूप शोधती। तरी होती तेचि ते ॥१२।।

जरी गड्या! घेशील शोधा। तरी न लगे द्वैतबाधा।
फोडीत सर्व अंध बंधा। प्रकाश पडे सर्वत्र ॥१३ ।।

जे जे असत्य अनात्म बंध। तेहि चैतन्यचि नटले विशद्ध।
अन्य भासे हा कल्पना-बाध । स्वयंसिद्ध नातरी तू ॥१४ ।।

येथे दुजे कोठूनि आले? जे बंधासि कारण झाले।
ही तो स्वरूपसागरावरी फुले । फुलली जणु गारांची ॥१५॥

हे अनुभवी तोचि मुक्त। देही असोनि देहातीत ।
जन्मोनीहि अजन्मा निश्चित। आत्मदृष्टी ॥१६॥

लक्ष चौऱ्यांशी जाण योनि । मुक्त होशील त्यांतूनि।
बोलणे सत्य घे जाणूनि । गुरुकृपे ॥१७।।

इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार
तुकड्यादास विरचिते । चतुर्दश प्रकरण संपूर्णम् ॥१४॥