आनंदामृत        

        *प्रकरण पंधरावे* 

          *आत्म-निवेदन* 

देखोनिया जगाची कुमति । खेद होई माझिये चित्ती।
वाटे जन्म नको मागुती। श्रीगुरुराया । ॥१।।

ऐसाचि करावा प्रश्न । तरी नसे पूर्ण ज्ञान ।
मनी वसे मानापमान। माझियाचि ।।२।।

क्षणोक्षणी वृत्ति फिरे। काम क्रोधाचे बसती मारे ।
तेणे जीव अति घाबरे। सद्गुरुराया! ||३||

न करी नेम न करी धर्म। केले नसे पुण्यकर्म ।
पदरी खावोनिया संभ्रम। पडलो क्षितीवरी ।।४।।

न आवडे मजला काही। सद्गुरु केवि भजावा पाही।
जन्ममरण तूटावे तेहि। न साधवे साधन ।।५।।

दुर्व्यसनी बहुत झालो। मायामोहे भ्रमूनि गेलो।
ऐसिया स्थिती लाथलो। चरणावर विंद गुरूचे ।।६।।

सोडले घरदार सर्वहि। फिरलो पोटाकारणे पाही।
मन जिकडे तिकडे जाई। फार पीडिलो तेणेचि ।।७।।

न कळे कर्म रेषा काय। दुष्ट ग्रहांनी शिणविले वाय।
नाठवे दासांची जी माय। तोवरी मजला ।।८।।


आनंदामृत        

अनुदिनी जाहलो उदास । नेणवेचि सत्य सायास।
अति पडले जी प्रयास। सद्गुरुराया ! ॥९॥

ऐसे करिता बहु जन्म गेले। दुर्गुण न साहवेसे झाले ।
सर्वस्वी मन भांबावले। एकाएकी ॥१०॥

वाटे देह त्यागावा जाण । जरी ऐसे स्थितीचे प्रमाण ।
तरी न सुटे मानपान । म्हणोनिया ॥११॥

असो वरखेड नाम नगरी। तेथे वसे संतमुरारी।
नाम आडकोजी अवधारी। दर्शन झाले सुदैवे ।।१२।।

जन्मस्थान आर्वी गावी। स्थिति नग्न दिगंबर बरवी।
श्यामसुंदर रूप दावी। लोकांलागी ।।१३।।

बहुत दिन ऐसे जाता। अडथळा करूनि अनुभव घेता।
वाटे चमत्कार जना तत्त्वता। आडकोजीस पाहोनि ।।१४।।

पुढे जनी एकमते करूनि । स्थापित केले समर्था निशिदिनी।
उत्साह नामसंकीर्तनी। प्रेमादरे सेविती ।।१५।।

जैसी गोकुळी मूर्ति अवतरली। भक्तमंडळी आनंदली।
की स्वर्गी दुमदुमली। सेना इंद्रदेवतेची ।।१६ ।।

इकडे झालो मी फजीत । देखिले देवधर्म अनंत ।
न मिळेचि कोणी संत। सद्गुरुराया! ॥१७॥

अनुतापस्थिति हदयी धरोनि । गेलो मी आडकोजी चरणी।
नमन केले लीन होऊनि। तया समर्था ॥१८॥


आनंदामृत      

म्हणे काय रे करिशी? संत-चरणी न राहशी।
भ्रमोनि उगाचि फिरशी। आजवरी ||१९ ।।

गुप्त दावियली खूण। झालो तेथेचि तल्लीन ।
भानरूपि मंत्र जाण। स्मरण करी नेमेसि ।।२०।।

शिरी ठेवतांचि हस्त। झालो चरणकमली मस्त ।
मन न मानेचि अन्यस्त। श्री आडकोजी-कृपेने ।।२१ ।।

करूनि सदगुरुचे स्मरण । कथिले जना सन्मार्गज्ञान ।
जेणे होती चढे निधान। आनंदामृत ।।२२ ।।

आदरे वदलो जे सर्वहि। मते माझी नव्हती पाही।
संती कथिले जे जे काही। तेचि वदलो सर्वथा ।।२३ ।।

कृपा करा स्वामिराया! पदरी धरा दीनासि या।
आवरोनि अपुली माया। द्या सर्वांसी निजानंद ।।२४॥


इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।
तुकड्यादास विरचिते । पंचदश प्रकरण संपूर्णम् ॥१५॥
           ---------------