आनंदामृत
*प्रकरण सोळावे.*
*अंतिम-कथन*
थोडे करीन अंतिम कथन । साधु नसे म्हणती जन।
सर्व भोंदूचे थैमान। जगी चाले॥१॥
एक म्हणती देव नाही। सर्व माया-लेख पाही।
आपण करू जे लवलाही । तेचि होय पैं ॥२॥
तरी हा विकल्प सांडोन। करा स्वयेचि साधन ।
मुमुक्षूसी सद्गुरुचरण। लाभतील आपसया ॥३॥
दांभिकांच्या जाळी न पडा। कानफुकणी दूर सांडा।
साधा सत्संग चोखटा। निवडोनिया विवेके ।।४।।
अंतःकरण होता शुद्ध। लाभे आपेआप सद् बोध ।
ज्ञानतत्त्वचि गुरुदेव सिद्ध। कृपा लाभे साधनी ।।५।।
दूर होता जिवीचे मळ । प्रगटे परमात्मरूप सोज्ज्वळ ।
आत्मसुख लाभता जंजाळ। दूर होय भोगांचे ।।६।।
अरे! जाणा आता खरे। काय भ्रमता जगतांत रे!
करा पांडुरंगा सोयरे। माझिया बापा! ॥७॥
लोकी सत्य पाहाल काही। तरी ते न दिसे सर्वथाहि ।
म्हणोनि स्वये सत्कर्म पाही। केलेचि करा ॥८॥
सत्कर्मासाठी ईश्वरी सत्ता। देव देईल सुफळ तत्त्वता।
की जेणे स्ववेचि देव होता। वेळ न लागे ।।९।।
आनंदामृत
एक म्हणती हेचि कथन । महाग्रंथी झाले जाण ।
यांत काय हो प्रमाण। विशेष ते? ||१०।।
अरे! जन्मापासूनि कर्म करणे। तेच ते वेळोवेळा अनुसरणे।
तैसे केले तुकारामाने । जे ज्ञानदेवे हि संपादिले ।।११।।
ऐसे नवीन झाले जे काही। अंधश्रद्धा सांडोनि पाही।
जुने चि रूपांतर तेहि। धरा वेगी प्रसंगोचित ।। १२ ।।
प्रथम बीज मध्ये बीज । फळी पुष्पी गुप्त सहज ।
अहो! शेवटीहि बीज। तेचि तेचि ।।१३ ।।
परी पुरातन बीजाहूनि। नसे नव्यामाजी उणी।
हदयभूमीमाजी पेरूनि। सुखी व्हा रे! ॥१४ ।।
अधिक न कळे फार मज। थोर ग्रंथांचे ते गुज ।
स्वामीकृपे सत्य ते सहज। बोलिलो मी ।।१५।।
सहज पावलो चिमूर ग्रामी। विठ्ठल गुरुमूर्ति-प्रेमी।
फाल्गुन वद्य द्वितीयेसि नेमी। तेथे केला ग्रंथारंभ ।।१६।।
विचारणा झाली जी खचित । ते ते वदलो प्रमाणभूत ।
घेऊनि बहुतांचे संमत । अनुभवयुक्त जुनेहि जे ॥१७॥
स्वानंदाचे अमृत । जे आत्ममंथने होय प्राप्त ।
जयाचेनि जीव प्रशांत । सुखदुःखातीत होतसे ॥१८॥
ते लाभावे सकळासी। याची पात्रता मनबद्धीसी।
म्हणोनि दाविले बहु साधनांसी। प्रकृतिभेदा जाणोनि ॥१९॥
आनंदामृत
करोनि सुगम साधन-निश्चय। साधूनि सत्संगाची सोय
आत्मरंगी व्हा हो निर्भय । सद्गुरुकृपे निजाभ्यासे॥२०॥
हाचि असे येथीचा सार । करा पावन हा संसार।
आपण तारोनि व्हा सादर । तारावया सर्व जीवा ।।२१ ॥
आता अधिक सांगो काय। धरा आपुली आपण सोय।
संती कथिला हाचि उपाय । माझिया बापा! ॥२२ ।।
संवत् एकोणवीसशे त्र्यांशी। प्रभव नाम संवत्सरासी।
आषाढ शुक्लपक्षेसी। तिथि असे द्वितीया ॥२३॥
भृगुवासरी शुभ योगी। हरिस्मरणी लागवेगी।
सद्गुरु-चरण शिरोभागी। वंदोनि ग्रंथ संपविला ||२४ ।।
इति श्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षोडश प्रकरण संपूर्णम् ॥१५॥
----------------
- श्रीगुरुदेवार्पणमस्तु -