आनंदामृत    

         *उद्धव-बोध* 

जणे होय मोक्षप्राप्ति । ते प्राणी चुकले नेणती।
काय सांगू जनाप्रती। कोठवरी आता ॥१॥

स्वतः सिद्ध व्यापक। सोऽहं नाम सम्यक ।
ते जाणूनि न जपती कोणी देख। पडले भ्रांति-पाशी ॥२॥

प्रथम गति हेचि देखा। जेणे चौयांशीतूनि सुटका।
सोऽहं नाम अजपा-शिखा। निरंतर घ्याइजे ।।३।।

पूर्वपार सहजाक्षरी। हाचि मंत्र योगी उच्चारी।
धृव प्रल्हादादिका-अंतरी। निश्चय हाचि ।।४।।

श्रीरामाते उपदेशी। गुरु वशिष्टि तत्त्वमसि।
संदीपने हि कृष्णासी। हाचि योग निवेदिला ।।५।।

आता कलिमाजी जाण । तेथे न विश्वासे मन ।
करोनि कल्पित साधन। यमसदन भोगिती ॥६॥

कोठवरी सांगू आता। पाही प्रचीत तत्त्वता।
देही कोणी आहे नांदता। स्वतःसिद्ध जाण तो ॥७॥

महावाक्याचा उपदेश। हाचि वेदाचा सारांश।
भलते मंत्र जपता बहुवस । काय हातास येतसे? ॥८॥

सोऽहं म्हणजे ब्रह्म ते मी। तत्त्वमसि ची हीच ऊर्मि।
महावाक्यार्थ हा तत्त्वप्रेमी। अनुभविती ॥९॥


आनंदामृत         

सोऽहं-अर्थ ऐसा गहन । लक्षिता प्रगटे आत्मज्ञान ।
आणि श्वासोश्वासी जपता जाण। चित्तनिरोधन होतसे ॥१०॥

शिव तो भकुटिस्थानी। सोहं शब्द लक्ष तयालागूनि।
श्वास प्रत्यक्ष नासिकेकडोनि । नित्य घेती प्राणी की॥११॥

जीव तो नाभिकमळी। हं शब्दनाद भूमंडळी।
उछ्वासांतूनि घेत उफाळी। हंकार तो जगांत ।।१२।।

तो कंठापर्यत येत । मिळवी कोण त्या शिवाप्रत?।
सत्य सोडूनि पाषाण पजीत । हेचि खोटेपण ।।१३।।

आता याची हातवटी। सांगती बरे पाहे दृष्टी।
लक्ष ठेवी, अधर कंठी। नाभिस्थानापर्यंत ।।१४।।

तेथूनि उठे जो गद् गद । सोहं शब्दाचा नाद।
ज्याचे अंत:करण शुद्ध। त्यासीचि कळे ॥१५॥

तो शब्द येत कंठावरी। उगेच बैसता अंतरी ।
मग दुमदुमे नासिके द्वारी। सोहं शब्द की ॥१६॥

सो शब्द शिववाचक । वृत्तीसि करी अंतर्मुख ।
हं शब्द जीवास दावी झुळुक । बाहेरीची ॥१७॥

दोघाचिये एकांती। जीव-शिव-ऐक्य उन्मेश वृत्ती।
जैसी सुषुप्ति लागिजति। तैसेचि होय ।।१८।।

मोठे सौख्य आहे बापा!। मार्गहि स्वाधीन आणि सोपा।
कोणी न करिती मापा। बुडविले आळसे ।।१९।।।


आनंदामृत         

अंगे नाही होत कसवटी। गोष्टी करिती चावटी।
ते गेले गेले निरयकपाटी। सत्य जाण उद्धवा! ।।२०।।

म्हणोनि घरी शद्ध भावे । सोहं समाधीतचि राहावे ।
त्यातचि आहे बरवे । नाहीतरी फजीत होशी ।।२१।।

आता कोणीकडे न घाली मन । कुणाची गोष्ट न एके जाण।निश्चये लावी अनुसंधान । सोहं नामाशी ।। २२ ।।

उगीच कवणा सांगो नये। ना तरी अहंकारे हानि होय ।याचा एकांतचि राहे । न बोलावे पाखांड्याशी ॥२३ ।।

पाखांड्यासी निजगुंज। सांगता न होय त्याचे चीज ।म्हणोनि सद्गुरुचेचि काज । नित्य करी उचित ।।२४ ।।

सदा सत्पदी भाव ठेवी। काय सांगो सद्गुरुची पदवी।
सद्गुरुरूप सोहंभावी। नित्य मानावे ।।२५ ।।

ज्याने सत्यरूप दर्शविले। सोहंतत्त्वी रंगविले ।
त्या सद्गुरूसी विसरता भले । पावशील पतन ॥२६॥

मग उद्धव उगाचि बैसोन। बीजमंत्र हा उच्चारून ।
श्वासोछवासी ठेवोनि मन । पाही बरवे अंतरी ।।२७ ।।

सोहं नामाचा गजर। चालतसे जो वारंवार ।
नाभीपासून कंठावर । ध्वनि उमटती सूक्ष्मसे ।।२८॥

आधीच शुद्ध अंतःकरण । त्यावरी कृष्णे बोधिले जाण । त्या सुखासी मग काय उणे। उद्धवाचिया? ॥२९ ।।


आनंदामृत      

श्वासोछ्वासी चाले पाठ । इडापिंगला दुहेरी वाट ।
सत्रावीचा घडघडाट। कंठी शब्द झंकारी ॥३०॥

त्याचा न घेता अनुभव। अवघे सोंगाचेचि नांव।
तैसा नोहे की उद्धव । जया मनी निस्सीमता ॥३१॥

वृत्ति शुद्ध एकाकार । सोहंनामी जाहलो स्थिर।।
वृत्तिसाक्षी शिव साचार। होऊनि राहिला आत्मबोधे ॥३२॥

झाला समाधिस्थ पूर्ण । सोहं-स्वरूपी जाहला लीन । समाधिसुख जिरवून । आला देहावरी प्रारब्धे॥३३ ॥

अष्ट सात्विक भावे दाटला। कंठ-शब्द सद् गत झाला।
नेत्री अश्रु ढाळु लागला । नमस्कार केला निजभावे ।।३४ ।।

सर्व लज्जादिक सोडून । उद्धवे साधले ब्रह्मनिधान ।
जो घेणारा असे जाण । तोचि घेतसे तत्त्वार्थ ॥३५ ।।

आता कैसा होईन उतराई? काय अर्पावे सदगुरुपायी?
तन मन धन अर्पूनि ही। संपवितो बोधकता ॥३६॥

इति श्री उद्धवबोध संपूर्णम् I

तुकरामजी गीताचार्य 
९/०१/ ७७