यं. राष्ट्रमंत विरचित
आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)
अध्याय पहिला
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
जयजयाची श्री गणराया ! ओंकाररुप तुझी काया ।
रिद्धीसिद्धीच्या राजया । मंगलमूर्ती ।। १।।
सर्व गणांचा गणराज । सर्व गुणांचा महाराज।
निर्गुण सिंहासनी तुज । वंदितो मी पुनःपुन्हा ।।२।।
अकार उकार मकार । अर्धमात्रा ती निराकार ।
स्थूल-सूक्ष्म विश्वाकार । महाकारण तूचि ।।३।।
तूचि मूळ निरंजन । परात्पर परब्रह्म पूर्ण ।
तुझ ठायी जे स्फुरण । तीच देवी शारदा ।।४।।
परा-पश्यंति-मध्यमा-वैखरी । नवतवे रुूप तीच धरी ।
पंचतत्वांचा वीणा करी । षड्चक्र खुंट्या तयाला ।।५।।
ओहं-सोहं अजपा स्वर । सुरु राहे निरंतर ।
बावन्न मातृका सुंदर । उमटती बरव्या ।।६।।
चौदा विद्या चौसष्ट कला । ज्ञान-विज्ञान रंग भगला ।
नाना भाषा ग्रंथ-सोहळा । त्यातचि उपजे ।।७।।


आत्मप्रभाव
   देवपण
आपल्या निर्मत्सर स्वभावाने, नेहमी आपल्या समोर येणाऱ्या सत्कार्याला आपल्या परीने हातभार लावण्यान देवपण अंगी येत असते.
आपल्या अवगुणाची आठवण आपल्या हदयास
तरवारीप्रमाणे बोचत ठेवून, ती साफ (कारणासह नाहीशी ) करण्याकरिता अंतरंगात पश्चातापाच्या उर्मि उत्पन्न करण्याने देवपण अंगी येत असते.
जी गोष्ट आपल्या सद्सदविवेकाला आवडली आहे ती
साधण्याकरिता, विचाराइतकेच पायही धडाडीने पुढे टाकल्याने देवपण अंगी येत अअसते.
माझे सर्व करणे-धरणे माझ्या दैहिक स्वार्थाकरिता नसून ते सर्व देवाच्या इच्छेकरिता आहे; आणि त्यांत न्यायीपणाने वागणे माझे कर्तव्य आहे असे वृत्तीशी निश्चित केल्याने देवपण अंगी येत असते.
कोणता देव मोठा व कोणता धर्म मोठा या वादविवादात आपली बुद्धी मलीन करीत न बसता, जी गोष्ट ग्राह्य व जे तत्व अमर आहे ते जिथे जिथे असेल तिथे तिथे सर्व महत्वाचेच आहे,असे  समजून वागल्याने देवपण अंगी येत असते.
आपल्या सत्य मार्गात आड येणाऱ्या कोणत्याही आपत्तीला वा मृत्यूला सहनशीलतेच्या दृष्टीने पाहून योजक वृत्तीने असणे, याने देवपण अंगी येत असते.
आपले सर्व भाव आपल्या अमर आत्म्यांशी नेहमीचे
तदाकार असून जग हे त्याचे किरण आहे. अनुभवल्यानेच देवपण अंगी येत असते.
- तुकड्यादास
(श्रीगुरुदेव माहे जून १९४५)


म्हणोनि माते सरस्वती ! तुजला नमन पुढत-पुढती ।
देई ग्रंथ-लेखना मती । तूचि स्फूर्तिदेवते ! ।।८।।
बैसोनि माझिया जिव्हाग्री । लोटी अमृताची झारी ।
आत्मप्रभाव-माधुरी  । मिळू दे सर्वा ।। ९।।
माते! तुझिया कृपेविण । मज बालका कैचे ज्ञान ? ।
हंसवाहिनी तूचि पूर्ण । ब्रह्मवीणा वाजविशी ।।१०।।
मी नाही केले विद्याध्ययन। परी तुझी लीला विलक्षण ।
मुकाही बोले वेदवचन । चिंता मजला कासयाची ? ।। ११।।
तुझा वळता कृपाकटाक्ष। घडे आपुली आपणा साक्ष ।
साहित्यकलाही प्रत्यक्ष ।अवतरे तेथे ।।१२।।
म्हणोनि माते! तुज प्रार्थना। स्फूर्ती देई माझिया मना ।
शब्दोशब्दी उमटवी खुणा । निजबोधाच्या ।।१३।।
स्वरुपाची अनुभूती । तीच तू देवी सरस्वती ! ।
तुजवाचूनि कवणाप्रती । शरण रिघावे ?।।१४।।
तुजसी येवो जाता शरण । आड येई जरा विघ्न ।
करिता गणाधीशाचे स्मरण । निस्तरे सकळ ।।१५।।
विघ्नहर्ता गणनायक । सर्वतोपरी मंगलदायक ।
जेथे नुरे द्वैताचीच भाक । मग विघ्न ते केचे ?।।१६।।
मनाचा चंद्रमा कलंकित । तोचि विघ्नरुप येथ ।
स्मरता गणेशु मनातील । बाधा उरेना ।।१७।।
स्वामी ! तुझे जे स्मरण । ते विलयाने विस्मरण ।
मग द्वैताचे नुरे भान । जीवन धन्य होतसे ।।१८।।


तुझे पावता वरदान । सर्व सुखे पायी लीन ।
जे जे करावे ते ते पूर्ण । होय शुभ फलदायी ।।१९।।
जिकड़े पाहावे तयाठायी । स्वरुपावीण दुजे नाही ।
जे जे बोलावे ते होई । कल्याणमय ।।२०।।
जे जे काही करु जावे । तेणे विश्व सुखी व्हावे ।
ऐसे प्रसादफळ बरवे। प्रभुजी ! तुझे ।।२१।।
म्हणोनि मी अनन्य शरण । द्यावी आपुली कृपा पूर्ण ।
केले गणेश-शारदा स्तवन । याचि भावे ।।२२।।
इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्त सार संमत ।
तुकड्यादास विरचित । मंगलाचरण पूर्ण हे ।।२३।।
  
  **सद्गुरुनाथ महाराज की जय**