आत्मप्रभाव
अध्याय तिसरा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
श्रोती व्हावे सावधान । परिसावया विमल ज्ञान ।
गुरु शिष्याचिये वचन । पूर्ण करी सद्-भावे ।।१।।
अपूर्णाते पूर्णपण । दावावया सद्गुरु पूर्ण ।
तेचि श्रोतेजनी परिसोन । लीन व्हावे आपैसे ।।२।।
श्रेष्ठांचेचि ऐकोन वाद । अल्पज्ञ तो होई शुध्द ।
जेणे मिटेल द्वतबंध । मायोपाधी पाशाचा ।।३।।
मागिलिये प्रकरणी । ऐकोनि दास-विनवणी ।
सद्गुरु तो कृपा-पाणी । पाजितसे सद्-भावे ।।४।।
तव पाहोनी सद्-भाव पूर्ण । प्रसन्न झाले सद्गुरुचे मन ।
म्हणे एकाग्र करी श्रवण । प्रेमे कथीन वाक्यासी ।।५।।
जीव अविद्यातम अज्ञानी। चौऱ्यांशी लक्ष फिरता योनी।
तया अवचित वेळा नरतनी । प्राप्त झाली पुण्यत्वे ।।६।।
पापपुण्य समान असती तई मिळे मनुष्यदेहगती ।
तयासी नसता सुसंगती । व्यर्थ जाय आसक्तीने ।।७।।
विषयी आसक्तपण आघवे । जडले तयासी स्वभावे।
वैराग्येविण केवी सुटावे ? । ऐक भावे करुनिया ।।८।।
जयासी अनुताप न बाणला । तो आसक्तीत बुडाला ।
पुन:पुन्हा जन्मासी आला । गर्भवास भोगावया ।।९।।


आत्मप्रभाव
विषयी आसक्तपण तुटणे । पाहिजेत वैराग्य लक्षणे ।
तयाविण मिथ्या भावे । सत्यचि वाटे ।।१०।।
वैराग्यास द्वय साधन । प्रथम चित्तशुध्दी जाण ।
दुसरे नित्यानित्यविवेक पूर्ण । साधला पाहिजे ।।११।।
चित्तशुद्धीचिया कारणे । उपासना संपादणे ।
तेणे तुटती भवबंधने । युगायुगी ।।१२।।
उपासना ती ऐसी करावी । प्रथम लीनता हृदयी धरावी ।
गुरुवचनी ती ऐसी करावी । निश्चयेसी जाणपा ।।१३।।
घेउनिया लहानपण । होई सद्गुरुची वहाण ।
ऐकोनिया तयाचे वचन । पूर्णपणे मानावे ।।१४।।
सोडुनिया हयगयी आळस । शरीरी राहावे उदास ।
तव तुटेल विषयपाश । मायिकांचा ।।१५॥।
अंगी वागलिया वाचोन । वैराग्य नवचे कधी जाण ।
शब्दज्ञाने व्यर्थ भान । लटकेपणी शोभतसे ।।१६।।
ईश्वरभजनी धरी प्रेम । कर्मोपासना हा तो नेम ।
साधावी भक्ती निष्काम । चित्तशुद्धीसाठी या ।।१७।।
हृदयी राखावा सद्-भाव । तेणे प्रसन्न होय सद्गुरराव ।
तयाचे बोधावरी अभाव । न करी केधवा जाणपा ।।१८।।
ये देही तो प्रपंच करिती । लक्षी ईश्वरचरणी प्रीती ।
ऐसी चित्तशुद्धीची रीती । निश्चयेसी जाणपा ।।१९।।


आत्मप्रभाव
सत्संगतीचिये वाचोन । विवेकबुद्धी नवचे जाण ।
नित्यानित्य करावया प्रमाण । सत्संगती धरावी ।।२०।।
सत् म्हणजे नित्य जाण । संगती तो अनुसरण ।
अज्ञानी सत् भरवीन । असत्य लोपवावे ।।२१।।
वारंवार पाहोनी विवेक । नित्याचे मानावे कौतुक ।
अनित्यी अभाव सत्यक । सर्वठायी ठेवावा ।।२२।।
ऐसी ही सत्यसंगती । विवेक प्रगटेल चित्ती ।
नाशिवंत वाटेल देहस्थिती । निश्चयेसी जाणपा ।।२३।।
तुच्छ वाटेल देहाभिमान । अंगी बाणेल लीनता पूर्ण ।
अंतरी प्रगटेल ज्ञान । नित्यानित्य वस्तूचे ।।२४।।
तुच्छ दिसेल धनदारा । सर्वचि मायिक पसारा ।
मन ते फिरोनि माघारा । सत्यतत्वी धावेल ।।२५।।
अंगी प्रेमाचा पाझर । भक्ति-आनंद परिकर ।
तुच्छ वाटेल दृश्यभार । विवेक येता अंगी या ।।२६।।
बापा! स्वये वागलियावाचोन । कैसे विरेल कपटथान?।
न बाणेल शुद्धज्ञान । अनुभवा पावावयासी ।।२७।।
ऐसा बाणता विवेक । चित्तशुध्दी होय निःशंक ।
वैराग्यभाव अमोलिक । वाणे शरीरी प्राणिया ।।२८।।
विषयाची मुरेल मुरडी । कामना जळेल काळतोंडी ।
राहील नित्याची आवडी । सशंय न धरी यामाजी ।।२९।।


बाणता वैराग्य अंतरी । तव होय बंद वृत्ती विकारी ।
स्थिरावेल मन ते निर्धारी । निश्चयेसी जाणपा ।।३०।।
जोवरी स्वये न वागला । तोवरी पाखंडी ठरला ।
शुकमुखीचा गलबला । व्यर्थ जाय ।।३१।।
ऐकोनिया ऐसे वचन । दास बोले दीनवदन।
वैराग्यावरी साधन । काय करावे स्वामिया? ।।३२।।
ऐकोनी सद्-भाव-वचन । गुरु बोले प्रेमेकरुन ।
ऐक गड्या ! अकर्तेपण । कासयाने होतसे ।।३३।।
अवस्था-साक्षी झालियावाचुनी। अकर्ता न होयचि प्राणी ।
तोवरी त्या वाटणी । भोगावी लागे अज्ञाने ।।३४।।
इतिश्री वेदान्तसारसंमत । दास तुकड्या विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । तृतीयोध्याय निरुपण कथियले ।।३५।।
सट्गुरुनाथ महाराज की जय !