अध्याय चौथा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
स्वामी! मी तो जाहलो धन्य। पावलो तुमचे कृपानिधान ।
वैराग्य झालिया मनन । काय कैसे करावे? ।।१।।
तव बोले श्रीगुरु साक्षी । जो का कामदिकांचा भक्षी ।
निरिच्छ निर्मल हंसपक्षी । पदवी जया न लागे ।।२।।
आत्मप्रभाव
ऐक जीवाचे शरीर । तया तीन अवस्थांतर ।
स्थूल-सुक्ष्म-कारण घर । तया जीवासी जाणिजे ।।१३।।
स्थूलाआत सृक्ष्म घट । सूक्ष्माही आतकारणमठ ।
जीव अभिमानियाचे पीठ । निश्चयेसी जाणावे ।।१४।।
तया जीवास घटाभिमान । म्हणोनि तो देहाभिमानी पूर्ण । विश्व-तैजस-प्राज्ञ । नामाभिधान तयासी ।।१५।।
जीवासी घटीचा अभिमान । ईश्वर सांभाळी विश्वजन ।
तयास हिरण्यागर्भादि भान । पाळावे लागे सर्वदा ।।१६।।
चौथा देह महाकारण । जेथे न राहीच अज्ञान ।
कूटस्थ ईश्वर मुक्त चैतन्य । दृश्यातीत ।।१७।।
जीव तरी घटाभिमानी । म्हणोनि फिरतसे बहु योनी ।
तया बुध्दी मलीनपणी । संगे फिरवी सर्वदा ।।१८।।
बुध्दी ही तो जडचि जाण । जीवात्मा तो असंगी पूर्ण ।
परी सुखदुःखाचे अवघटन । भोगावे लागे संमेलनी ।।१९।।
तयाचे मुकावया भोगतेपण। चुकवावया दु:खादि दारुण ।
म्हणोनि वैराग्य हे साधन । धरणे लागे तयासी ।।२०।।
अवघी सृष्टी भासिक जाणे । नैसर्गिक पथे निर्वाहणे ।
नातरी विनाश अभिमाने । भासरुप जीवाचा ।।२१।।
तयाचे तोडावया भासरुप । पाजळावया आत्मप्रदीप ।
वैराग्यादि साधने अमूप । करणे लागे सायासे ।।२२।।
आत्मप्रभाव
वैराग्य ते कासयासी । करावे होऊनि सायासी? ।
हेचि बोलणे अनायासी । बोलू आता निश्चये ।।३।।
जीव तो अविद्येत बुडाला । षड्विकारे गुंडाळला ।
रजतमाने वेष्टिला । मागेपुढे ।।४।।
तव शिष्य आक्षेपी भला। ईश्वरांश अज्ञानी का ठरला ? ।
हे तो स्वामी ! मला । कृपा करुन सांगावे ।।५।।
तव बोले सद्गुरु वचन । जे का भानूचे उजेडपण ।
ते आरशात प्रतिबिंव जाण । तेजरुन दावीतसे ।।६।।
तैसाचि येथीचा प्रकार । मायादर्पणी सुंदर ।
चैतन्यसूर्य निर्विकार । उजेड दावी आपुला ।।७।।
चिदात्मा तो विद्यारुप । धरी जीवाचे स्वरुप ।
अविद्येत प्रतिबिंबी अमूप । म्हणोनिया ।।८।।
चिदात्मा अविद्येत गुंगला । म्हणोनि विकारा पावला ।
तयासी जीव ऐसे बोलिला । श्रृतिवाद । ९ ।।
रजोतमादिक गुणेकरुन । अविद्या चंचलत्व पावे जाण।
म्हणोन जीव द्वैत भान । अंगी बाणवून घेतसे ।।१०।।
सोडिनिया शुध्दात्मभाव । करी अनंतरंगी लाघव ।
म्हणोन अविद्यागुणे जीव । ऐसे नाव ठेविले ।।११।।
तव शिष्य आनंदून । श्रीगुरुसी करी कथन ।
स्वामी ! जीवाचे स्थानमान । कोणे ठायी वदावे ।।१२।।
आत्मप्रभाव
जीव शुध्दरूपा आला । शुध्द आत्मबिंबी मिळाला ।
म्हणजे जन्ममरणादि गलबला । भोगावा न लागे ।।२३।।
यासी पाहिजे वैराग्य साधन । प्रथम सत्वगुणी जीवन ।
रजतमादि लोपून । शुध्दसत्व मिळावया ।।२४।।
चित्तशुध्दी प्रगटली पूर्ण । मग शोधावे ज्ञान- अज्ञान ।
साक्षीरूप काय ते जाणोन । तयारूपी मिळावे ।।२५।।
आता पुढिलिये निरूपणी । ज्ञान-अज्ञान उभारणी ।
कळवू विशद करूनी । जाणावया साधका ।।२६।।
इतिश्री वेदान्तसार संमत । तुकड्यादास-विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । चतुर्थोऽध्याय गोड हा ।।२७।।
0 सद्गुरुनाथ महाराजकी जय ! ०