अध्याय पाचवा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।
पाहोनि दासाचा प्रेम-पाझर । आनंदला कृपाकर ।
ज्ञान-अज्ञान सारासार । अनुवाद कथियेला ।।१।।
ज्ञान हा तो सूर्य जाण । अज्ञान मृगजलासमान ।
त्याचे तोडावया भान । घ्यावे ज्ञान साधके ।।२।।
ज्ञान नव्हे काही कळा । ज्ञान नव्हे विद्या सकळ ।
चातुर्ये कोशल्ये आगळा । येथे न चले कदापि ।।३।।


आत्मप्रभाव
ज्ञान नव्हे ग्रंथ पठन । ज्ञान नव्हे शहाणपण ।
ज्ञान नव्हे लिप्तपण । शोधकांचे अपूर्व ।।४।।
ज्ञान नव्हे शब्दपाठ । ज्ञान नव्हे कर्म अचाट ।
ज्ञान नव्हे साधुत्व थाट । जमवी अंगी आपुलिया ।।५ ।।
ज्ञान नोहे ध्यान धरणे । ज्ञान नोहे जप करणे ।
ज्ञान म्हणजे मूळ स्मरणे । आपुलिया स्वरूपाचे ।।६।।
मी तो कैसा असे कोण? होतो भिन्न की अभिन्न? ।
हेचि शोधावे आपुलेपण । यासी ज्ञान म्हणावे ।।७।।
दृश्य, दृष्टी की जाणता? । हेचि आकळावी वार्ता ।
साधक, साधन किंवा कर्ता ? ओळखावे ज्ञानिये ।।८।।
मी तो अशुध्द किंवा शुध्द? हाचि कळावया भेद ।
करावा पूर्ण सुखसंवाद । ज्ञानियासी ।।९।।
कळावया आत्मरुप । आधी पाजळावा वैराग्य दीप ।
जाळोनिया मायिक धूप । वृत्यांचिया साक्षित्वे ।।१०।।
दृश्य मी की द्रष्टा पूर्ण? हे ओळखणे हेचि ज्ञान ।
जाणावे आपुले आपण । या नाव ज्ञान ।।११।।
सांडोनिया प्रवृत्तिपंथ । धरावा निवृत्तीचा हस्त ।
जव जावे अदृश्य गगनात । या नाव ज्ञान ।।१२।।
असार ते सर्व सांडावे । सुखदुःखासं ओलांडावे ।
सारतत्व ते चिंतावे । या नाव ज्ञान ।।१३।।


आत्मप्रभाव
सोडोनिया आपपर । पाहावा सत्याचा विचार ।
निर्भय होऊनि घ्यावे सार । यासी ज्ञान म्हणावे ।।१४।।
ज्ञाननेत्र नाही उज्ज्वल । तरि तो मायिकदृष्टी बोल ।
ज्ञान अमंगळासी निर्मल । करी अंतरंगे पाहता ।।१५।।
मी तो एक की दुसरा? पुसावे जाऊनि पैलघरा ।
मग फिरताति त्या माघारा । परा-पश्यंति-मध्यमा  ।।१६।।
वैखरीची वाचा खुंटली । वृत्ती दुजेपणासी विटली।
स्वरुपी जाऊनि दाटली । जये ज्ञाने ।।१७ ।।
त्याविण भुलले शब्दज्ञाने । पळती ज्ञानी आडराने ।
ठावे नाही मुक्त जिणे । सत्यवंता वाचूनिया ।।१८।।
मानसी निर्मळता फुलली । शरीरी सत्यता दाटली ।
अभाविकता लया गेली । जया ज्ञान ।।१९।।
ते ज्ञान म्हणजे नित्यवस्तु कळणे। अपरोक्ष अनुभवे वळणे ।
सांडोनिया भिन्न भाने । एक सर्वी सर्वचि  ।।२० ।।
येथे अधिकाराचेनि गुणे । घ्यावे वागणे तैसे जाणणे ।
निव्वळ काही शब्द ज्ञाने । ज्ञान नोहे सर्वथा ।।२१ ।।
म्हणशी ज्ञान झाले आता । नाही अनुभवाचा पत्ता ।
तरी हे जाईल सर्व वृथा । वाचिक ज्ञान  ।।२।।
कितीही करील श्रवण । मननाचे विसरे अनुपान ।
तरी ऐकले ते श्रवणज्ञान । कामी पडेना  ।।२३।।


आत्मप्रभाव
न झालिया श्रवण वाया जिणे । श्रवणा मनने उभारणे ।
न झालिया तै निजध्यास खुणे। साक्षात्कार कैसा होय? ।।२४।।
अज्ञानभास ज्ञानभास । न लाभे भासाने प्रकाश ।
अंगी होऊनि उदास । ज्ञानसार शोधावे ।।२५।।
स्वये वागलिया वाचोन । कैसे आतुडे अनुभवजन्य ? ।
परोक्ष तो शिकोन । अपरोक्ष अंतरंगी जाणावे ।।२६।।
तव दासे नमस्कार घातला। काय करावे या कर्माला? ।
एकाएकी आडवा आला । कर्मभोग स्वामिया! ।।२७।।
मजी! सत्याचिये ज्ञाना । लोकी आत्मसात करवेना ।
कर्मबंध न तुटे जाणा । गहन गहन कर्मगती ।।२८।।
मी तो प्रारब्धाआधीन । कैसे आवरेल प्रारब्ध कठीण?।
एके जन्मीच हे अनुभवून । कैसे काढू स्वामिया? ।।२९।।
तव बोले सद्गुरु दयाळ। अज्ञानरूपे गड्या रे! ।
प्रारब्ध म्हणोन घेतो कपाळ । अज्ञानरूपे गड्या रे! ।।३०।।
या विषयाचे विवरण । होईल पुढिले निरूपणी जाण ।
या शंकेचे निरसन । प्रेमे करिती सद्गुरु ।।३१।।
इतिश्री वेदान्त सारसंमत । दास तुकड्या विरचित ।
आत्मप्रभाव ग्रंथ । पंचमाध्याय कथियेला ।।३२।।
0 सद्गुरुनाथ महाराजकी जय! 0