अध्याय सातवा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
पंचभूतमय देही जाण । असती दश इंद्रिये पूर्ण ।
येचि विषयी कथन । करुनी दावू श्रोतया ।।१।।
तरी प्रथम त्वचा नेत्र । रसना घ्राण तैसे श्रोत्र ।
तयांसीच ज्ञानेंद्रिये सर्वत्र । म्हणती ज्ञाते जाणपा ।।२।।
आकाशतत्वापासूनि । श्रोत्राची उभारणी ।
तयास कर्ण ऐसे जनी । म्हणती ज्ञाते जाणपा ।।३।।
सत्य वायूचेनि गुणे । स्पर्शेद्रिंय उद्भवणे ।
शरीरा वेष्ठुनी राहणे । त्वचा तेचि जाणपा ।।४।।
तेज शुद्धगुणी जाण । प्रगटे नेत्रेंद्रिय तेथून ।
तयासीच चक्षू प्रमाण । म्हणती जाण योंगी ते ।।५।।
उदक ते सत्वगुणाधिक । झाली रसना अमोलिक।
रुची तये जिव्हे नि:शंक । कळो येई उत्थाने ।।६।।


आत्मप्रभाव
क्षितिसत्वे झाले घ्राण । वस्तुगंध कळे पूर्ण ।
सुगंध-दुर्गंधाचे जाणपण । ते ते नाकी होतसे ।।७।।
यांसी म्हणती ज्ञानेंद्रिये । विषयांसह जाणसी स्वये ।
म्हणोनि ते तू नव्हे । निश्चयेसी जाणपा ।।८।।
आता ऐक कर्मेंद्रिये । कैसे झालेति द्वितीय |
कोण कोणे स्थानी सक्रिय । राहती ते जाणपा ।।९।।
वाचाहस्तपादादिक । पायू आणि उपस्थ देख ।
ऐसे कर्मेद्रियपंचक । जाहले ते जाणपा ।।१०।।
आकाश-रजांशापासूनी । झाली वाचेची प्रगटणी ।
जये स्थानी जिव्हिणी । वास करी तये स्थानी ।।११।।
वायु-रजांशाचेनि गुणे करे । करूनि कार्यं करणे।
तेचि हस्तेंद्रिय पाहणे ।ज्ञातेजनी ।।१२।।
तेज-रजांशेकरूनि । झाली गती उत्पन्न चरणी ।
तया पादेंद्रिय म्हणोनि । म्हणती राया! ।।१३।।
वायू उदक-रजांशे निर्मिला । गुदाइंद्रिय म्हणती त्याला ।
विष्टाविसर्जन कार्याला । साधन हेचि जाहले ।।१४।।
पृथ्वीरजांशे उपस्थ । विषयसेवन मूत्र -त्यागार्थ ।
हे तो शिश्नइंद्रिय प्राप्त । ऐसे योगी बोलती ।।१५।।
हीच पंचकर्मेद्रिंये जाण । झाली स्थूली ती निर्माण ।
तू सर्वाचा जाणता म्हणोन । इंद्रिये न होसी सर्वथा ।।१६।।
न लागे इंद्रियांची वार्ता । तव कोठे पंचप्राण-कथा? ।
तयांचीही साक्षरता । दावितो तुज ।।१७।।


आत्मप्रभाव
प्राण, अपान, व्यान । समान अधिक उदान ।
ऐसे जाण पंचप्राण । देही असती सर्वदा ।।१८।।
पृथ्वी, आप, तेजादिकी । वायू, आकाश सम्यकी ।
इयांच्या रजांशे की । जाहला तो प्राणसंच ।।१९ ।।
वृत्ती अनेक तैसे गुण । भासती ते भिन्न भिन्न ।
तयांचे पंचप्रकार जाण । जाहले या देहस्थिती ।।२०।।
हृदयी तो राही स्वामी प्राण । गुदद्वारी तो अपान ।
समरसी शरीरी व्यान । ऐसे स्थान तयाचे ।।२१।।
उदान तो कंठी राही । समान नाभीस्नि पाही ।
ऐसे पंचप्राण सर्वही । तयांसी तू जाणता ।।२२।।
आता स्थूल-सूक्ष्म-कारण । चौथा देह महाकारण ।
ययांचेही जाण ज्ञान । दावू उकलोन सर्वथा ।।२३।।
ज्ञानेद्रिंय कर्मेद्रिंय । पंचप्राणादि सहाय ।
मनबुद्धी हा समुदाय । सूक्ष्म देह शक्तिरूप ।।२४।।
तयासी म्हणती लिंगशरीर । नक्कापासूनि मोक्षपथावर ।
सुखदुःखादि भाग साचार । याच देही होतसे ।।२५।।
ययासी तूचि जाणता पूर्ण । म्हणोनि देह नव्हेसि जाण ।
सर्व पाहसी साक्षी होऊन । देह इंद्रिय प्रारब्धासी ।।२६।।
बारे ! सोडूनि आपुले भान । घेसी लिंगाचा अभिमान ।
म्हणोनि व्यष्टी नाम जाण । प्राप्त केले सर्वथा ।।२७।।


आत्मप्रभाव
तव शिष्ये आक्षेप केला । नेत्री अश्रुपूर दाटला।
म्हणे मायी भूललो याला । मार्ग दावी माते वो!।।२८।।
कैसा जाणेन आपूलेपण? समष्टिरूपी कैसा मिळेन ? ।
लिंग-अभियान जाळोन। साक्षी होऊन राही कैसा ? ।।२९।।
तव बोले सद्गुरुराज । तो तू नव्हेसि मायासाज ।
ऐक सांगेन आत्मगुज । प्राप्त कैसे करावे? ।।३०।।
कोणे पंथे जाऊन मिळशी? काय मार्ग तो तयासी? ।
पुढिलिये निरूपणी पावसी । वाद मिटेल सर्व हो ।।३१।।
इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार संमत।
तुकड्यादास-विरचित । सप्तमाध्याय गोड हो ।।३२।।
0 सद्गुरुनाथ महाराज की जय ! 0