अध्याय आठवा
।। श्रीगुरुदेवाय नमः ।।
सद्गुरो ! तुझियासारखा । असता मज पाठीराखा ।
आता कवणाचा करू लेखा? कासया स्वामी !।।१।।
मज चातकाची तहान । पुरविसी तूचि अमृतघन ।
करी मायानिवारण । आत्मगुज दाखवी ।।२।।
म्हणोनि पुढतपुढती चरणी। आर्तपणे शिष्य घे लोळणी । संबोखी सद्गुरु कृपादानी । वरद हस्ते ।।३।।


आत्मप्रभाव
म्हणे ऐकपा शिष्यराया! असे कुठली कोण माया? ।
ही तव कल्पनेचीच छाया । नशी विलया तूच की ।।४।।
आणि आत्मा काय अप्राप्त? अरे तूचि तो निभ्रांत ।
काय तळमळसी व्यर्थ । शब्द जंजाळी गुंतोनि? ।।५।।
एकाचे दुसरेच भास । तया नाव माया असे ।
हे तरी कल्पनेचेचि पिसे । उगाचि भास विपरीत ।।६ ।।
गडके गाडगे रांजण परळ । ती तर माती केवळ |
रूपाकारे नामे सकळ । वेगळी भासती ।।७।।
तैसीच भूतभौतिक सृष्टी । असो व्यष्टी की समपष्टी ।
मुळी पाहता तत्वदृष्टी । एकमय सारे।।८।।
निवांत सच्चिदानंद ब्रम्ही । बहु व्हावे ही स्फुरली ऊर्मी । ती साकारली साउमी । विश्वरूपाने ।।९।।
भिन्न भिन्न सारी रूपे नामे । तेणे भिन्नत्व भासे भ्रमे ।
मुळी पाहता एकेचि ब्रह्मे । व्याप्त हे सारे ।।१०।।
शेला सदरा धोतर लुगडे । पाहता सूतचि ते उघडे ।
भेद व्यवहारी, तत्वी न घडे । तैसे विश्व ब्रम्ह ।।११।।
कैची व्यष्टी कैची समष्टी ? एकचि व्यापक परमेष्टी ।
व्याघ्र-गाय ही सारखेची सृष्टी । एक गोडीच साकारली ।।१२।।
भिन्न रूपमाने इतुकीच माया। ती मिथ्याम्हणोनि मोह सोडी राया ।
शोधी मूळच्या तत्वठाया । ज्ञानदृष्टी उघडूनि ।।१३।।
दोर सर्प नाहीच झाला । तो भ्रमेचि भासला ।
दुःखदायी भयकंप उपजला । आपुल्याच भावे ।।१४।।


आत्मप्रभाव
तैसे विश्वाचिया नामरूपे । आसक्तिद्वेषादि वाढली पापे ।
जीव पोळला विविध तापे । स्वप्नसृष्टीपरी ।।१५।।
मुळी तू सच्चिदानंदरूप । बिंव परब्रह्मस्वरूप ।
जाणोनि घेता हरशील ताप  । आपणचि की ।।१६।।
सोह तत्वमसि अयं आत्मा ब्रम्ह। हाच श्रुतीचा मंत्र परम ।
साधुसंतही वाजविती डिंडिम। जीव तो शिव म्हणोनि ।।१७।।
स्थूल-सूक्ष्म-कारण-महाकारण। पंचकोश तनु-मन-प्राण ।
यांचा सोडूनि दे अभिमान । अधिष्ठान यांचे तू ।।१८।।
तुझे साक्षित्व जिवी पटले । अभ्यासे ते दृढावले ।
तरी हे अभिमान सर्व गेले । आपैसेचि ।।१९।।
आणि अभिमानांच्या आधारे। लिंगदेही भरले वासना -वारे ।
तेही मग केवी उरे ? एक तूचि शुद्धबुद्ध ।।२०।।
महावाक्याचे हेचि वर्म । स्वये तुचि शुद्ध ब्रह्म ।
अहं ब्रम्हास्मि  घोष उत्तम । ब्रम्हांडी घुमूदे ।।२१।।
परी मी एक साक्षी ब्रम्ह । अभिमानही असे भ्रम ।
त्याचाही देखणा आत्माराम । स्वये तूचि ।।२२।।
स्वये अपुला अनुभव घेई। परी अनुभविता भिन्न न होई ।
जाणत्यासी जाणता ठायीचे ठायी । मौनत्व लाभे ।।२३।।
ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान त्रिपुटी । भिन्न करूनि न होई हिंपुटी ।
आपुल्यातचि होऊ दे आटी । पाहतेपणाची ।।२४।।


आत्माप्रभाव
दुजेपणासह एकपणा । विरू दे आपणात आपला ।
स्वसंवेद्य नू निरंजना । स्वस्थ राही ।।२५
स्वस्थ तरी मुळीच आहे । वृत्त्यादि उठती विरती पाहे ।
विचलित न हो त्यांच्या प्रवाहे। होवो जावो काही किती ।।२६।।
तू तो केवळ तूचि होई । देहादि भाव झुगारी सर्वही ।
मग व्यष्टिपण मिळे हेही । समष्टीमाजी ।।२७।।
समष्टी तरी वेगळी कैची ? सारे विश्व रूप तुझेचि ।
उपाधी पिंड-ब्रम्हांडाची । कल्पनारूप ।।२८।।
एरवी पाहता कणोकणी । चराचरी चतुर्दश भुवनी ।
नाही स्वरूपावाचूनि । वेगळी वस्तू ।।२९।।
वेगळा भास ते अन्यथा भान । मुळी तू एक चैतन्यघन ।
सागरामाजी बर्फासमान । अद्वैत सारे ।।३०।।
दागिना असताचि सुवर्ण बघावे । तैसे जगी ब्रम्ह ओळखावे । जगासी त्यागोनि पळावे । नलगे काही ।।३।।
नाही वनगमनाचे काम । नलगे धूंडावे तीर्थधाम ।
नको कायाक्लेशादि तपसंभ्रम । लाभे सार संसारी ।।३२।।
देह करो का प्रपंची काम । मनी परोपकारी प्रेम ।
हृदयी अनुभवी आत्माराम । पंथ हाचि सर्वोत्तम ।।३३।।
इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्त-सार-संमत ।।
तुकड्यादास विरचित । अष्टमाध्याय अमोलिक I।३४।।
|  सट्गुरुनाथ महाराज की जय !