सुविचार-स्मरणी
(४३) मोठ्या गुन्हेगारांपैकी ते लोक असतात, जे आपल्या वडिलांची सत्य आज्ञाही मानीत नसतात आणि मोठ्यांची मने दुखवितात; खोटीच शपथ सदा घेतात नि खोटीच साक्ष लोभास्तव देतात.
(४४) मनुष्याचा स्वभाव एखाद्या प्रसंगानेच उघडा पडत असतो.
(४५) तेच लोक सज्जन असतात, ज्यांना उत्तम कामाविषयी खुशी आणि वाईट कामाचे दुःख होते.
(४६) खरा स्वयंसेवक तोच की, ज्यावर लोक आपली कौटुंबिक मालमत्ता सोपवण्याएवढा भरवसा ठेवू शकतात नि तसे करिताना नि:शंक राहतात.
(४७) मित्रांनो ! साधारणत: मनुष्याच्या स्वभावाची परीक्षा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ किंवा श्रद्धावान लोकांजवळ होत नसून, त्यांच्या आज्ञेत वागणारऱ्या आणि त्याहून कमी गणल्या जाणाऱ्या
लोकांच्या वागणुकीवरुन, तसेच त्या लोकांशी होत असलेल्या त्याच्या वागणुकीवरुनच यथार्थ होऊ शकते.
(४८) शस्त्रे घर्षणाने चमकतात आणि शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो.
(४९) धाडसाची तयारी प्रसंगांनीच लौकर वाढत असते, केवळ छाती मोठी करुन नव्हे.
(५०) लक्षावधी रुपये देत असताही जो लाचलुचपतीच्या मोहाने आपली न्यायबुद्धी गहाण ठेवून सत्य पक्ष विसरत नाही, तोच पुरुष वीरांच्या मालिकेत बसवण्यास योग्य असतो.
(५१) प्रयत्नशील व वीर पुरुषास हा समस्त संसार गुलाबाच्या फुलांच्या ताटव्यासारखा आल्हादकारक सुगंध देणारा वाटत असतो.
(५२) आपल्या सत्य आणि सरळ वृत्तीला विनाकारण कोणत्याही ऑफिसर किंवा सत्ताधीशासमोर नम्र करण्याचे कारण नसते. तेच लोक भीत असतात, जे लोकात पाप करून आपले वर्चस्व ठेवू इच्छितात आणि अधिकाऱ्यांची मुद्दाम हांजीहाजी करितात.