राष्ट्रसंतांची प्रवचने 
 १ . चातुर्मास्य वर्गाची परंपरा आणि उद्देश
चातुर्मास्य वर्गासाठी जमलेल्या मित्रांनो ,
आज आपण चातुर्मास्य वर्गाच्या निमित्ताने येथे जमला आहात . वर्षातून एक महिना कोठेतरी संप्रदायाच्या प्रचारकांनी , विचारकांनी एकत्र जमून वर्षभराच्या कामाचा आढावा घ्यावा , मनमोकळी चर्चा करावी , चालू परिस्थितीला अनुसरून आपल्या कार्याची दिशा ठरवावी याकरिता अशा एकांतस्थळी आत्मचिंतनाची आवश्यकता असते . ही प्रथा नवी नाही . पूर्वीचे साधूसंतही या महिन्यात एकत्र येऊन भजन - पूजनाव्दारे समाजात सद्भावनांची लाट निर्माण करीत असत . समाजात ते ईश्वर - भक्तीची ज्योत पेटवीत . त्यांच्या विचारांना चालना देत . असा हा आत्मचिंतनाचा फार महत्वाचा भाग समजला जाई . आपण वर्षभरात काय शिकलो , ध्येयावरील आपली पकड किती मजबूत विंचा ढिली झाली याचे निवांतपणे आणि एकाग्र चित्ताने चिंतन - मनन करण्यासाठी ही सुंदर प्रथा त्यांनी निर्माण केली . .
कोणत्याही संप्रदायाला किंवा वैचारिक संघटनेला अशा सामुदायिक चर्चेची , चिंतनाची आवश्यक असते . संप्रदाय किंवा मंडळ ज्या ध्येयाकरिता निर्माण झाले असेल त्याची वाटचाल योग्य दिशेने होत आहे किंवा नाही हे पहायला पाहिजे . देशकाल - परिस्थितीला अनुसरून कोणते कार्यक्रम चालवावे , कोणते बंद ठेवावे याचा विचार जर झाला नाही तर संप्रदाय लोकांच्या दृष्टीने निरर्थक , टाकावू ठरेल ; व अशा संप्रदायांना किंवा मंडळाना समाज दूर फेकून देईल . या सर्व बाबींचा आणि परिस्थितीचा विचार करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.


*संप्रदायांनी नवी दृष्टी दिली पाहिजे*
 आज जगात अनेक घडामोडी घडत आहेत. क्रांत्या होत आहेत. प्रचारकांच्या जीवनातही क्रांती,उत्क्रांती सतत होत राहिली पाहिजे. कोणत्याही संप्रदाय वा  धर्म प्रचारकांवर टिकून असतो. आणि ज्यावेळी कशी आवश्यकता असेल तशी दृष्टी देता आली तरच तो धर्म आणि तो संप्रदाय जगात टिकून रहात असतो. पूर्वीच्या गोष्टी गतानुगतीकपणे चालविणारा संप्रदाय प्रतिगामी ठरत जगातअसतो. पुर्वीच्या साधुसंतांनी आचारलेल्या गोष्टी त्या वेळेच्या कालमानानुसार योग्य होत्या. आज त्यांचाच आपण उपयोग करू म्हटले तर देशाची थोडीसुद्धा उन्नती होऊ शकणार नाही. पूर्वीच्या चातुर्मास्यात फक्त धार्मिक बाबीच अंतर्भूत असत. पण कालमानानुसार परिस्थिती बदलत राहते. आज मनुष्याच्या जीवनात केवळ धार्मिक तेलाच स्थान राहिलेले नसून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा कितीतरी बाबीशी त्यांच्या घनिष्ठ संबंध आलेला आहे.एवढेच नव्हे तर या सर्व अंगांचा विचार करणे अत्यंत आवश्यक होऊन बसले आहे. आम्ही तसे न करता केवळ धर्मवर्म घेऊन बसू तर ती चर्चा अपुरीआणि अप्रस्तुत ठरते. आज देशाला धान्योत्पादनाची गरज आहे.देशात लोक किती? उत्पादन कमी होण्याची कारणे काय आहेत?ते कसे वाढविता येईल?जास्तीचे कसे निर्माण करावे?याचेही ज्ञान समाजाला होणे आवश्यक आहे ती करण्याची साऱ्या संप्रदायांनी आता कंबर कसली पाहिजे. या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठीच येथे हा चातुर्मास्य वर्ग घेतला आहे.
   *सेवा मंडळाचीकार्यप्रणाली* श्रीगुरुदेव सेवा मंडळ देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहे असे आपण म्हणतो. तेव्हा त्याची प्रगती बरोबर चालू आहे किंवा नाही, देशाच्या आजच्या गरजेप्रमाणे आम्ही जनतेच्या पायी आमची सेवा रुजू करतो आहोत.


किंवा नाही हे तपासून पाहणे अत्यंत जरूरीचे आहे .
साधारणत : अशा प्रकारच्या कार्यक्रमात नेहमीच धागडधिंगा आणि अव्यवस्थितपणा चालत असतो . पण या ठिकाणी नियोजित पध्दतीनुसार कार्यक्रम चालतील . यात प्रचारकांना सहा तास शिक्षण मिळेल , यावेळी इतरांना प्रवेश राहणारा नाही . कारण या ठिकाणी मंडळाच्या प्रचारकांसाठीच चर्चा व बौध्दिके चालतील . प्रचारकांचे अनुभव त्यांच्या मार्गात आलेल्या अडचणी , पुढील धोरण इत्यादी बाबींचा केवळ प्रचारकांच्याच जीवनाशी संबंध असल्यामुळे आणि त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून या कार्यक्रमात इतरांना प्रवेश राहणार नाही .
काही कार्यक्रम सर्वसाधारण जनतेसाठीही राहतील . उदाहरणार्थ ध्यान व सकाळ - सांयकाळचे बौध्दिक यांचा फायदा जनतेने घ्यावा . या शिवाय शेवटच्या आठवड्यात एक सम्मेलन घेण्यात येईल . त्यावेळी अनेक देशभक्तांच्या व विचारवंतांच्या ज्ञानाचा आपणास फायदा मिळेल .
या वर्गाची येथेच ( ब्रम्हपुरी ) योजना व्हायला मंडळाचे प्रेमी श्रीमान मदनगोपालजी भैय्या यांची प्रबळ इच्छा कारणीभूत आहे . येथे एक शिक्षणसंस्थाही आहे . तिला सेवामंडळाच्या जीवन पध्दतीचा लाभ व्हावा अशी त्यांची इच्छा होती . त्या प्रबळ इच्छेमुळे आणि त्यांच्या आमच्यावरील प्रेमामुळे हा सुयोग घडून आला आहे .
या वर्गात एक महिनाभर विचारमंथन चालेल . येथून सेवामंडळाचे प्रचारक पुन्हा नवी दृष्टी घेऊन आपल्या क्षेत्रात कामाला लागतील . आर्थिक , नैतिक आणि धार्मिक या सर्व विषयांसंबंधीचा सेवामंडळाचा दृष्टीकोन ते जनतेला पटवून देतील . आणि देशात नवीन विचारांची प्रेरणा निर्माण करतील . ईश्वर त्यांच्या हातून हे जागृतीचे कार्य घडवून आणो. १३ - ८ - ५८
सायंकाळ