*६ . आत्मशक्तीचा संचय*
माझ्या प्रिय बंधुनो , प्रचारकांनो आणि भगिनींनो ,
ज्यावेळी शक्ती विकेंद्रित होते त्यावेळी कामात सफलता प्राप्त शकत नाही हे आता संशोधकांनी सिद्ध करून ठेवले आहे एका ठिकाणी संपुर्ण शक्ती लावली तर ती शक्ती कारणी लागते . शक्तीचे केन्द्रीकरण म्हणजे ध्येसिद्धी शरीरात कान , डोळे इत्यादी इंद्रिये आहेत . त्यांची शक्तीसुध्दा अलग अलग आहे . मनाची शक्ती या इंद्रियाद्वारा काम करीत असते हे खरे आहे . परंतु विशिष्ट क्षणी ती विशिष्ट इंद्रियाच्याद्वारा प्रकट होत असते . जेव्हा आपण डोळयांनी पाहण्याचे काम करतो तेव्हा मनाची शक्ती डोळ्यांनी काम करीत असते . पण त्यावेळी आपण ऐकण्याचे काम तितक्या चांगल्या प्रकारे करू शकत नसतो.कारण यावेळी मनाची शक्ती डोळ्यात केंद्रित झालेली असते . भागवत - ग्रंथात एक कथा आहे . एक लोहार बाण तयार करत असे . रस्त्याच्या काठाला त्याचे दुकान होते . त्या दुकानात तो रोज सकाळ - पासून सायंकाळपर्यंत बाणांची टोके बनवीत बसायचा . हे काम फारच काळजीपूर्वक करावे लागत असल्यामूळ तो एकाग्र चित्ताने आपले काम करी . एक दिवस त्या रस्त्यावरून राजाच्या लग्नाची वरात वाजतगाजत निघून गेली . काही वेळानंतर रस्त्यावरून एक माणूस आला आणि वरात कोणत्या दिशेने गेली हे विचारू लागला . लोहार आपल्या कामात इतका रंगला होता की वरात केव्हा आली , कुठे गेली याचे त्याला भान नव्हते . तो त्या माणसाला म्हणाला
*मी सकाळपासून इथेच बसलो आहे . परंतु माझ्यासमोर वरात गेलेली मी पाहिली नाही *
इतका गाजावाजा करीत वरात गेली . पण लोहाराला तिचा पत्ता नव्हता . याचा अर्थ एवढाच की जेव्हा आपली शक्ती एखाद्या ठिकाणी आपण केंद्रित करतो तेव्हा दुसऱ्या ठिकाणी ती शक्ती निरूपयोगी असते .
माणसाच्या जीवनातसुध्दा हाच अनुभव येतो . ज्या कुणाला आम्ही आमचे मन देतो तेव्हा त्याचे होत असतो . जो माणूस आपले सर्वस्व स्त्रीला अर्पण करतो तो ईश्वराकडे लक्ष देऊ शकत नाही . ज्याचे मन सतेने , वित्ताने हिसकावून घेतलेले असते तो समाजाच्या बऱ्यावाईटाकडे कधी लक्ष देवु शकत नाही . सारांश एवढाच की आम्ही आमचे सर्वस्व ज्याला अर्पण करीत असतो त्याचे आम्ही गुलाम बनत असतो .
मी सर्वधर्म परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये गेलो होतो . तिथे पंचशील तत्वाला मान्यता देण्याचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा इतर देशाचे प्रतिनिधी मनात जळफळू लागले . या निमित्ताने होणारा भारताचा गौरव त्यांना स्वस्थ बसू देईना . प्रत्येक प्रतिनिधीच्या डोक्यात आपापल्या राष्ट्रवादाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की दुसऱ्याच्या देशाची वाढलेली प्रतिष्ठा तो पाहुच शकत नव्हता . प्रत्येकाने आपले सर्वस्व आपल्या देशाला दिल्याचा हा परिणाम होता . धर्मपरिषदेत विश्वशांतीचा पुरस्कार हे त्याचे ढोंग होते . मी त्या ठिकाणी म्हटले
* आम्ही कोणा एका देशाचे नसून साऱ्या विश्वाचे आहोत . जिथे जिथे म्हणून चांगली भावना , चांगल्या वस्तू असतील ते आपण मन पूर्वक स्विकारल्या पाहिजेत . राजकारणी पुरुषांनी केलेला विरोध मी समजू शकतो . परंतु आपण सारे धर्म कारणी आहो , विश्व - हिताचा विचार आपल्यासमोर आहे . *तेव्हा कुठे सर्वानी खोल विचार केला , आणि पंचशील मान्य झाले .
यासाठी चिताची शक्ती विकेंद्रित व्हायला नको . दहा इंद्रियातून प्रगट होणारी शक्ती जेव्हा एका विविक्षित ठिकाणी केंद्रित होते तेव्हा समाधी होते . आपल्या ध्येयासाठी जेव्हा माणूस धुंद होतो तेव्हा फार मोठी शक्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते . प्रचारक जर आपली शक्ती स्त्री , धन , सत्ता या वर केंद्रित करील तर त्याचे काम तिथेच संपेल अशा लाख प्रचारकातून मग एखादाही विवेकानदं प्रकट होऊ शकरणार नाही.
*स्थिरचित्त पुरुष युद्धप्रसंगी अविचल राहतो*
प्रत्येकाच्या जीवनात मोहाचे क्षण येत असतात. अर्जुन सुद्धा भारतीय युध्दाच्या सुरुवातीला मोहग्रस्त झाला होता. परंतु त्याला भगवान श्रीकृष्णाने समाधी अवस्था देऊन युद्धाला तयार केले .
*अर्जुना देऊनी समाधी , सवेचि घालता महायुध्दी I*
समाधी म्हणजे शक्तीचे केंद्रिकरण , असा समाधिस्थ पुरुष युध्दातही अविचल राहु शकतो . ध्येयावर लक्ष केंद्रित झाल्यावर या गोष्टी आपोआप प्राप्त होत असतात . विदेही जनक राजा राज्य करायचा . त्याचा एक पाय अग्नीत असायचा असे म्हणतात . या रुपकाचा अर्थ एवढाच की राज्य संगोपनाची जबाबदारी आणि विलास या दोन्ही गोष्टीचा परिणाम जनक राजावर होत नसे त्याच्या मनाची स्थिती , अविचल , विदेही राहत असे . महाभारतात एक सुंदर प्रसंग आहे . एकदा शुकमुनी जनक राजाच्या भेटीस गेले . आपण मायेच्या आहारी जाऊ नये अशी त्यांची प्रखर इच्छा होती . जनकराजाने शुक्राचार्याची परीक्षा घेण्याचे ठरविले . जेवायला बसल्यावर जनक राजाने म्हटले .
*अरे , शुकाचार्याच्या डोक्यावर केसाने बांधलेली ही तलवार का टांगली ? *
हे ऐकताच शुकमुनीचे लक्ष जेवणातून उडाले . भोजनानंतर राजाने विचारले .
*महाराज * आपण कोणत्या पदार्थाच आज सेवन केले ? शुकमुनी लज्जित झाले आणि म्हणाले . *माफ करा माझे सारे लक्ष त्या तलवारीवर होते .
बघा . एका ब्रह्मचारी , तपस्वी , ब्रह्मनिष्ठ वैराग्याची अवस्था जर चित विचलित होताक्षणीच अशी झाली तर आपल्यासारख्या सामान्य माणसाच काय होईल ? याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांनी संन्यासी बनलो
पाहिजे . संन्यासातसुध्दा धोका आहे . प्रचारक गृहस्थाश्रमात राहूनही आपल्या ध्येयावर अविचल राहू शकतो . यासाठी घरदार , बायको सोडण्याची आवश्यकता नाही. फक्त आपले लक्ष ध्येयावरुन विचलित न होऊ देण्याची आवश्यकता आहे. हे करीत असतांना जिथेजिथे म्हणून धोका दिसेल तिथून आपण आपले मन व इंद्रिये बाहेर काढला पाहिजेत . ज्याप्रमाणे कासव धोक्याच्या ठिकाणी आपली इंद्रिये आवरुन घेतो आणि सुरक्षित स्थळी मोकळी सोडतो त्याप्रमाणे .
*आत्मचिंतन हे चित्त निर्मल करण्याची प्रक्रिया*
आपल्या ध्येयावर चित्त स्थिर राहण्यासाठी जी शक्ती हवी असते . ती प्राप्त करण्यासाठी आत्मचिंतनाची व प्रार्थनेची आवश्यकता असते . माणसाकडून चूका घडतच असतात . अनेकदा तो ध्येयापासून विचलितही होत असतो . परंतु पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी त्याला आत्मचिंतनाची आवश्यकता असते . चूक झाल्यावर माणसाने मन : पूर्वक प्रार्थना केली पाहिजे .
एकांतात देवाला आपला अपराध सांगीतला पाहिजे . अशा प्रकारची आर्त भावनेने देवाजवळ मागितलेली क्षमा म्हणजे प्रार्थना होय . प्रार्थनेच्या निमित्ताने केलेला देवाचा धावा भावनेच्या उत्कटपणामुळे देवाजवळ पोहचला पाहिजे . ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईला बिलगून रडत असते त्याप्रमाणे आपण देवाजवळ रडले पाहिजे . त्यामुळे आमचे अंत : करण स्वच्छ होईल . आचार - विचारात कमीत कमी चुका होतील . भक्त मीरा आपल्या देवाजवळ श्रीकृष्ण प्रभूजवळ असाच आर्त सुसंवाद करीत असे . राजाला दुसरी शंका येई . कोणीतरी परका पुरुष मीरेच्या महालात येतो असे त्याला वाटे पहारेदार डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीत परंतु कुणालाच काही दिसत नसे . मीराबाई आपल्या एका भजनात म्हणते .
*अब तो बात फैलगयी जाने तो कोई । मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोई । ।*
मीराबाईंचा हा सुसंवाद तिच्या देवाजवळ होत असे . असा अभ्यास केला तर आम्हालाही ध्येयापासून कोणी विचलित करु शकत नाही . ध्यान आणि प्रार्थना हे केवळ बाह्य अनुशासनाचे प्रकार आहेत . जेव्हा आम्ही देवाशी सरळ नाते निर्माण करुन आमची सुख : दुखे त्याला निवेदन करु तर आमचे सारेच व्यवहार पवित्र होतील . आमची बरीवाईट कर्मे देवाला परिचित राहतील . त्यामुळे आमची जीवन गाथा शुद्ध स्वरुपात आमच्यासमोर राहील . जीवन हा एक महान ग्रंथ आहे . जीवन ग्रंथाच्या वाचनातून आत्मज्ञान हाती लागेल . सोनेसुद्धा गंजल्यावर वाईट दिसते आणि लोखंड स्वच्छ असेल की मन मोहुन घेते . तशीच मनाची गत आहे . त्याला नेहमी स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असते . चित्त स्थिर व निर्मल करण्याची ही सर्वश्रेष्ठ प्रक्रिया आहे . असे झाल्यावर माणसाला कशाची उणीव राहत नाही . ही अवस्था साधूअथवा गुरु देत असतात हा भ्रम आहे गुरु किंवा साधू केवळ मार्गदर्शन करीत असतात . रस्ता आपला आपल्यालाच पार करावा लागतो .
१६ - ८ - ५८
सकाळ
मीराबाईंचा हा सुसंवाद तिच्या देवाजवळ होत असे . असा अभ्यास केला तर आम्हालाही ध्येयापासून कोणी विचलित करु शकत नाही . ध्यान आणि प्रार्थना हे केवळ बाह्य अनुशासनाचे प्रकार आहेत . जेव्हा आम्ही देवाशी सरळ नाते निर्माण करुन आमची सुख : दुखे त्याला निवेदन करु तर आमचे सारेच व्यवहार पवित्र होतील . आमची बरीवाईट कर्मे देवाला परिचित राहतील . त्यामुळे आमची जीवन गाथा शुद्ध स्वरुपात आमच्यासमोर राहील . जीवन हा एक महान ग्रंथ आहे . जीवन ग्रंथाच्या वाचनातून आत्मज्ञान हाती लागेल . सोनेसुद्धा गंजल्यावर वाईट दिसते आणि लोखंड स्वच्छ असेल की मन मोहुन घेते . तशीच मनाची गत आहे . त्याला नेहमी स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असते . चित्त स्थिर व निर्मल करण्याची ही सर्वश्रेष्ठ प्रक्रिया आहे . असे झाल्यावर माणसाला कशाची उणीव राहत नाही . ही अवस्था साधूअथवा गुरु देत असतात हा भ्रम आहे गुरु किंवा साधू केवळ मार्गदर्शन करीत असतात . रस्ता आपला आपल्यालाच पार करावा लागतो .
१६ - ८ - ५८
सकाळ