*९. धर्म, भक्ती आणि प्रार्थना*
प्रिय मित्रांनो आणि भगिनींनो,
कठीण रस्त्याने प्रवास करणे मनुष्य- स्वभावाला आवडत नाही.
परंतु जे कोणी अशा बिकट वाटेने गेले त्यांना ती वाट सुखावह वाटली.
किंबहुना त्यांना तसे वाटले म्हणूनच ते या वाटेने गेले. लोक म्हणतात -
*कठीण वाट आपलीशी केली पाहिजे.* माझ्या दृष्टीने ही अज्ञानजनक आणि
अनुभवरहीत बाब आहे. ज्यांनी देवाच्या नावावर स्वत:चे बलीदान केले त्या
बलिदानात त्यांना सर्वस्व मिळाल्याचा आनंद होता. म्हणून त्यांनी तसे केले.
कठीण तपश्चर्येच्या मागे महान असे सुख लपलेले असते. जर आपल्या
ध्येयसिद्धीस्तव चालणाराला आनंद होणार नाही तर असे द्राविडी प्राणायम
कोण करील? आणि कशाकरिता करील? कोणताही माणस परमेश्वराची
भक्ती सुखाच्या प्राप्तीसाठी करीत असतो. लोक म्हणतात, दुःखाशिवाय सुखाची
प्राप्ती होत नसते. परंतु या बाबतीत हा अनुभव खोटा आहे. इथे साधकाला
आपल्या साधनेचा आनंद प्राप्त होत असतो. गंगा वाहता वाहता समुद्रमीलनाचे
सुख अनुभवीत असते. वाटेत आलेल्या अनंत अडचणी दूर करण्यात आणि
सागराला मिळण्यात ती एकच एक आनंद लुटत असते. भक्तीची सुद्धा हीच
तन्हा आहे. परमेश्वराच्या प्रेमाचा महापूर भक्ताच्या हृदयातून वाहत असतो.
त्यामुळे खडतर तपश्चर्येतही त्याला आनंदच आनंद मिळत असतो.
*भक्तीला रिते अंत:करण हवे*
पुष्कळ लोकांना भक्तीची आवड नसते, ती त्यांची चूक नाही. त्यांच्या
अंत:करणावर दुसऱ्या गोष्टीचा प्रभाव अधिक आहे असा याचा अर्थ आहे.
त्यांना परमेश्वराच्या प्रेमाचे भक्तीचे अमृत पाजणारा अजून कोणी भेटला
नाही. माशीला मळावर बसण्याचा आनंद असतो हे खरे आहे. परंतु तिला एकदा गुळाचे दर्शन झाल्यावर ती मळाला स्पर्श करीत नाही. तसेच माणसाचे
आहे सुखाकडे धावणे ही मनुष्य स्वभावाची वृत्ती आहे. सुखाचा मार्ग शोधण्याची
मात्र आवश्यकता असते. जोपर्यंत परमेश्वराचे भक्तीत माणसाचे, मन रमत नाही. तो पर्यंत प्रार्थना, भक्ती, जपतप हे त्याला भाररुप वाटतात परंतु तो एकदा मार्गाला लागला की मग त्याच्या तन्मयतेत कोणीही व्यत्यय आणु शकणारनाही.
*प्रार्थना म्हणजे विश्व कुटूंबत्वाची जाणीव*
सामुदायिक प्रार्थनेची पूर्णता दुसऱ्याला आपला मानण्यात आहे.
भगवान जळीस्थळी भरला आहे. अशी ज्याक्षणी आमची धारणा होते. त्याक्षणी
अवघे विश्व एक कुटूंब आहे असे वाटू लागते. आम्ही एका देवाची लेकर
आहोत. उत्तरोत्तर विश्व-व्यापी होत जाणे हा आमचा स्वभाव आहे. परंतु
त्या विराट विश्व- यंत्रात बसण्यासाठी मला काहीतरी तयारी केली पाहिजे
मोठ्या यंत्रात अनेक लहान यंत्रे असतात. ते परस्परांना मदतरुप असतात.
तसेच या मानव -समूहाचेही होणे आवश्यक असते. मोठ्या यंत्राचा एखादा
भाग बिघडताच सारे यंत्रच निकामी होते. तोच न्याय येथेही लागू पडतो. मानव
विराट विश्वयंत्राचा घटक म्हणून सुव्यवस्थितपणे चालणार नाही तर सगळीकडे
दुर्दशा निर्माण होईल आपण रेडिओ ऐकतो. त्यात बोलणाऱ्या माणसाच्या वाणीचा
प्रत्येक गुणदोष आपल्यापर्यंत येऊन आदळतो. तसेच आपले दुर्गुणसुद्धा आणि
सदगुणसुद्धा विश्व-व्यापक होत असतात. दुर्गुण विश्वव्यापक झाले तर
अधोगति होईल. सद्गुण वाढीस लागेल तर ती परागती ठरेल. हे कार्य आंतरिक ।
श्रद्धेतून आणि प्रार्थनेतून आपण करु शकू.
- अलिकडे आमचा दृष्टिकोण अतिशय संकुचित झाला आहे. आम्ही
फक्त सामुदायिक प्रार्थना आणि मंदिरे एवढ्याच जागा पवित्र मानतो. परंतु
आता ही भावना व्यापक बनविली पाहिजे. रस्त्यात उभा असलेला मानुस सुध्दा प्रेम मुर्ती आहे, पवित्र आहे,तो व मी एकाच विश्व-यंत्राचे घटक आहेत.
अशी आपली भावना वाढत गेली पाहिजे.
समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि परस्पर सहकार्याची
व सहानुभूतीची भावना प्रस्तुत करणे हे धर्माचे एकमेव कार्य आहे. हे उद्देश जर
साध्य होत नसतील तर धर्म मेला असेच मानावे लागेल. एखादा मुलगा बारा
वर्षाचा होईतोवर एकाच वर्गात राहणार असेल तर त्या ठिकाणी शाळेची
शिक्षणपद्धती सदोष आहे यात शंका नाही. आमच्या पूर्वजांनी सामाजिक
प्रतिष्ठापनेसाठी या साऱ्या यंत्रणा निर्माण केल्या आहेत. काही घरांना आदर्श
रुप देण्यासाठी मंदिर काही गावांसाठी तीर्थ अशा उत्तोरोत्तर वाढत्या यंत्रणा
आहेत. परंतु आज या सर्वामागचा शुद्ध हेतू नाहीसा झाला आहे. आमच्यात
विश्वव्यापी दृष्टिकोण यावा यासाठी वेदातील ऋषींनी *सर्वेत्र सुखिन:सन्तु
अशी प्रार्थना करुन ठेवली. आपल्याला हेच काम सामुदायिक प्रार्थनेच्याद्वारा
नव्या धर्मपद्धतीच्या द्वारा करावयाचे आहे.
१८ - ८ - ५८
सकाळ