*१२ . आदर्श जीवनाचा सक्रीय पाठ* 
मित्रांनो आणि भगिनींनो ,
रोज या ठिकाणी जो बौद्धिकवर्ग घेतला जातो तो इथले विचार जीवनात उतरावे एवढ्यासाठी आहे . पांडित्यपूर्ण ज्ञान ऐकवावे हा इथे उद्देश नाही . जीवनाला झेपेल , पचेल इतकेच ज्ञान इथे आवश्यक मानले आहे आतापर्यंत आम्ही पुराणे , आध्यात्मिक कथाप्रवचने ऐकत आलो त्यामागे मरणानंतर मोक्ष मिळावा अशी आमची इच्छा होती परंतु आम्ही केवळ ऐकतच आहो . कृती करायचे जाणून बुजून सोडून दिले . अशाने मोक्ष कसा मिळेल आज पारमार्थिक चर्चा करणारांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे . आजचा समाज कुठे आहे , त्याच्या विकासाच्या मर्यादा कोणत्या , त्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्यासाठी हा बौद्धिक वर्ग आहे .
* अर्भकाचेसाठी
पंते हाती धरिली काठी लहान मुलाला शिकवण्यासाठी ज्याप्रमाणे आपले आपण मोठवेषण
विसरतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी करावे , यासाठी हे ज्ञानचर्चासत्र आहे . आम्ही जीवनाच्या काही पैलूवर प्रकाश टाकू इच्छितो . काम न करणाऱ्या पंडितांची आम्ही अपेक्षा करीत नाही . आध्यात्मिकता हे भारताचे भूषण आहे . परंतु केवळ अध्यात्म - चर्चेने आमचे भले होणार नाही . ऐकलेले अध्यात्म व्यवहारांत उतरविण्याची आता गरज आहे . 
*प्रचारक आरोग्यशील आणि चारित्र्यवान हवा* 
ज्या गोष्टी लोकांनी *कराव्या असे आपणास वाटत असेल त्या आधी प्रचारकांनी अमलात आणल्या पाहिजेत . त्याचा प्रभाव जनमनावर त्यांच्या कृतीतून पडला पाहिजे . आपलेकडे कृश शरीराच्या माणसाला तपस्वी मानतात . मी काही मर्यादेपर्यंतच या स्थितीला महत्त्व देतो . स्थूल शरीरसुद्धा निकोप


आरोग्याचा नमुना मानता येणार नाही . शरिराचे सर्व अंगप्रत्यंग सुडौल आणि तेजस्वी आहेत , खूप काम केल्यानंतरसुद्धा ज्या शरीराला थकवा येत नाही तेच शरीर निरोगी मानले पाहिजे . प्रचारकांनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे , त्याला पाहाताच आरोग्यशील पुरूषाचे दर्शन घडले पाहिजे . त्यासाड़ी व्यायाम , मिताहार या गोष्टी आवश्यक आहेत . प्रचारकाचे सर्वांगीण जीवन समृद्ध
असले पाहिजे .
शरीराच्या आरोग्य - शीलतेसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व प्रचारकाने प्रार्थना समजून केल्या पाहिजेत . जीवनसत्वयुक्त पदार्थ त्याने सेवन केले पाहिजेत , गरीब आणि श्रीमंत यांच्या आहारांत भरपूर तफावत असते . परंतु व्यवस्थित प्रयत्न केल्यास गरिबाच्या भोजनातही भरपूर जीवनसत्वे सापडू शकतात . कोंडयुक्त धान्य , भाज्या , मोड असलेली कडधान्ये यात जीवनसत्वे अधिक असतात या गोष्टीचे ज्ञान प्रचारकात असणे आवश्यक आहे . अशा प्रकारचा आहार कमी घेऊन सुद्धा भरपूर पोषण मिळू शकते . विनोबाजींचा आहार दही , गूळ , सहद आणि काही फळे एवढाच आहे . तेवढ्यावरच ते या वयातही १० - १२ मैल पदयात्रा करतात . दिवसभर भरपूर काम करतात . या साऱ्यांचा अभ्यास प्रचारकाने मन : पूर्वक केला पाहिजे .
शरीर आरोग्यशील बनविण्याचे ज्ञान आणि कवायत या दोन गोष्टी प्रत्येक प्रचारकाला आल्या पाहिजेत . त्याचे जीवन आळशी आणि सुस्त नको . निसर्गातल्या सर्व वस्तुनचा सौंदर्यात्मक अभिरुचीने आस्वाद त्याला घेता आला पाहिजे . थोड्या वेळेपुरते स्नो - पावडर लावून शरीर चांगले दाखविता येईल . पण शरीराचे व मनाचे आरोग्य आणि सौंदर्य केवळ या बाह्य प्रसाधनांनी साधत नाही . त्यासाठी अंगात हिंमत यावी लागते . संकटात जीवाची पर्वा न करता उडी घ्यावी लागते . दीनदुबळ्यांच्या मदतीसाठी धावून जावे लागते . निसर्गावर ताबा मिळविण्यासाठी : आपल्या अध्यातमीक विकासासाठी आणि जगात सेवा कार्य करण्यासाठी उत्तम शरीराची नितांत आवश्यकता आहे. मनुष्याच्या


सवयी उत्तम असाव्या . त्याची वाणी शुद्ध असावी , राहणी सात्त्विक , वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत जीवनाचा प्रवाह आमच्यात वहात असावा, अशा चांगल्या शरीरांची कामेसुद्धा चांगलीच असतात . त्याचा समाजाला उपद्रव होणार नाही .
 *दिनचर्या* 

शरीराला सुडौल आणि आरोग्यशील बनविण्याची जितकी आवश्यकता आहे तितकीच कष्ट करण्याचीही आहे . आमच्या दिनचर्येतून आमच्या हिताबरोबर समाजाचेही हित साधले पाहिजे . जीवनांत नियमितपणा असावा . संयम असावा . चुका सर्वच करतात . परंतु त्या वेळीच दुरूस्त केल्या
पाहिजेत . मन चांगल्या कामात रमावे म्हणून शुभ कामाचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला पाहिजे . प्रत्येक कामात शिस्त असली पाहिजे . असे केल्याशिवाय आम्ही समाजावर प्रभाव पाडू शकणार नाही . प्रचारकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे .
२० - ८ - ५८
सकाळ