*१५. सुसंस्कारीपणा म्हणजे मानवपण* 
प्रार्थनेसाठी जमलेल्या प्रेमी बंधू-भगिनींनो,
माणसाच्या रोजच्या जीवनात काही कार्यक्रम नियमितपणे पाळले
गेले की माणसाचे जीवन सुंदर होते. रोजचे जेवण घेतले की दिवसभराचे सर्व
कार्यक्रम करण्याची स्फूर्ति येते. रोजच्या स्नानामुळे वृत्ती प्रसन्न राहते. रोज
व्यवस्थित झोप मिळाली नाही तर माणूस पागल होतो ह्या सर्व बाह्य गोष्टी ।
झाल्या, अशाच काही आणखी गोष्टी असतात. सदाचार स्वाध्याय त्यापैकी
होत. केवळ किंमती वस्त्रे आणि हातात सोन्याचे कडे घालून रस्त्याने जाणाऱ्या
माणसाला कोणी अक्कलवान मानणार नाही. एखादा माणूस शरिराने पहिलवान
आहे पण डोक्याने रिकामा असला तर त्याला कोणी फारसे विचारीत नाही.
यापैकी एकही थाटा-माटाची गोष्ट जवळ नसलेला एखादा लंगोटी बहाद्दर ।
लोकांना आदरणीय होतो. सारांश हा की माणसाला जेवढी गरज स्नान, भोजन,
सुंदर कपडे, याची असते त्यापेक्षा अधिक गरज बुद्धिमत्तेची आणि चांगल्या
आचरणाची असते.
 *मुलावर प्रार्थनेने संस्कार करा* 
बुद्धी, विचार अध्यात्मभावना या गोष्टी सामुदायिक प्रार्थनेत, सद्वर्तनी
लोकांच्या मेळाव्यात किंवा ग्रंथालयात मिळत असतात. जेथे सद्विचारांना
चालना मिळत असेल ते स्थान प्रार्थनास्थान मानले पाहिजे. आपल्या घरात
आपल्या कुटूंबापुरतेच ज्ञान मिळते. हे ज्ञान डुकरा- कोंबड्यानाही शक्य
आहे. पण जेव्हा लहान मोठे गरीब श्रीमंत एकत्र बसलेले आपण पाहतो तेव्हा
आपल्याला विश्व कुटूंबाचे दर्शन होते. पण अशा सामुदयिक प्रार्थनेत ज्या
दिवशी तुम्ही येऊ शकणार नाही त्या दिवशी आपल्या इष्ट देवतेची घरीच
आपल्या मुला-बाळांना घेऊन प्रार्थना करा. त्यामुळे त्यांच्यातही सद्भावना निर्मान होतील, असे सुसंस्कार निर्माण केल्याने चांगली बुद्धी आणि समाजोपयोगी


विचार यांचा आपोआप विकास होईल, असे सुसंस्कार प्रार्थनच्याद्वारे आपल्या
मुलांबाळांवर होऊ द्या. आज आपण नुसतेच मुलांचे लाड करतो आणि त्याचे
परिणाम म्हातारपणी भोगत बसतो, असे करणारांची फार वाईट स्थिती होते.
ते घराचेही रहात नाहीत आणि समाजाचेही रहात नाहीत. .
 *प्रार्थनेची प्रथा भारतभर पसरावी* 

प्रार्थनेत आम्ही ईश्वराचे ध्यान का करतो? तर तो सर्वांचे पोषण
करतो, सर्वांच्या अंतर्यामी वास करतो म्हणून. पण ज्यांनी मानवजातीवर महान
उपकार केले त्यांचीही आम्ही पूजा करतो. आठवण रहावी म्हणून आम्ही त्यांच्या
मूर्तीचे ध्यान करतो. या पूजेबरोबरच त्या महापुरुषाच्या कर्तृत्वाचेही ज्ञान
आम्हाला होते. हळूहळू त्यांच्या गुणांचा परिणाम आमच्या मनावर होतो. असे
गुणांचे पुतळे या प्रार्थनेतून निर्माण झाले तर समाजाची खरोखर उन्नति होईल.
पूर्वी देवाची कल्पना भीतीवर आधारली होती. जो भिववितो तो देव.
माणूस कोणाला डरे ? वाघाला डरे, नागाला डरे अशी पूर्वीची कल्पना होती.
म्हणून वाघदेव, नागदेव असा रिवाज पडला. परंतु ती कल्पना जाऊन आज
आम्ही जगच्चालक, सर्वशक्तिमान अशा सर्वाभूती भरुन असणाऱ्या देवाची
कल्पना करतो.
मित्रांनो, आपला आत्मा जागृत करा. निश्चयाने प्रार्थना करा. इतर
धर्मियांकडे जरा पाहिले तरी त्यांच्या प्रार्थना-विषयक विधीची कल्पना येईल.
मुसलमान लोक आपला केवढाही मोठा व्यवहार बाजूला सारुन प्रार्थनेला मशिदीत
जातात. तसे हिंदूचे नाही. याचे कारण निश्चयाचा अभाव, आज आपला पन्नास
कोटींचा भारत जणु झोपेत आहे. हा त्याचाच तेवढा दोष नाही. आज हे कार्य
आपण आपल्या शिरावर घ्या. यात तुमचे आणि तुमच्या देशाचे कल्याण आहे.
२१ - ५ - ५८
सायंकाळ