*१६. सुशिक्षित मन आणि देशनिर्मिती*
बंधुभगिनींनो,
आजचा माणूस इतका नाजूक झाला आहे की त्याला ऊन, थंडी
काहीच सहन होत नाही. त्यांच्याकडून शेतीत आणि कारखान्यात कुठेच श्रम
होत नाहीत. हा पंगुपणा घालविण्यासाठी काय करता येईल ही एक महान
समस्या आहे. आज आपल्या देशात ३० कोटी एकर जमीन आणि ५० कोटी
लोक आहेत. हा सारा जनसागर व्यवस्थितपणे कामाला लागेल तर सोयीचे
होईल. परंतु शेतीवर काम करण्याची संख्या घटू लागली आहे. अशा लोकांना
शेतीसाठी, आपले गाव आदर्श करण्यासाठी व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी
आणि कामाला लावण्यासाठी खूप आवश्यकता आहे. त्याशिवाय आम्हाला
जगता येणार नाही. परिस्थिती अशी आहे की जेवढे म्हणून शिकलेले लोक
आहेत तेवढे शेतीकामापासून दूर आहेत. माणसे जसजशी शिक्षित होत आहेत.
तसतशी ती बाबूगिरी फैलवीत आहेत. आणि देशात लकीर की फकिरांची
संख्या वाढून राहीली आहे.
या देशात बाहेर देशाचे नागरिक आले. त्यांना पाहून त्यांचे पोषाखी
अनुकरण करण्याची प्रवृत्ति येथे बळावली. परंतु बाहेरील देशाचे परिशीलन
केल्यावर कळून येते की तेथील लोक शिकलेले असूनही आमच्यापेक्षा कितीतरी
अधिक काम करीत असतात. आमच्या येथे नेमकी त्याउलट स्थिती आहे.
लिहिण्यावाचण्यात काही प्रगति झाल्यासारखी वाटते. परंतु देशाच्या उत्थानात
या प्रगतीने काहीच वाटा उचललेला नाही. यावरून अशी भीति वाटू लागते की
जरा सारा देशच शिकून सवरून तयार झाला तर काय अनावस्था ओढवेल ?
शारीरिक परिश्रम कोण करील ? *तू राणी मी राणी मग पाणी कोण आणी ?"
अशी स्थिती होईल. सारे पुढारी होतील तर पोलिसाचे काम कोणी करावे,
चपराशी कोणी व्हावे? शेतात कोणी खपावे? शेती काही कष्टांशिवाय पिकणार
नाही. आजच्या आपल्या शिक्षणाने एक समस्या समोर उभी केली आहे ती ही.
लोकांनी शिकू नये असे मला म्हणायचे नाही. घराघरात इंजिनीअर
व्हावेत, प्रोफेसर असावेत, कलाकार असावेत. परंतु ते निकामी निघू नयेत.
परदेशी लोक पदवीधर असतांनाही आपल्याकडील मजुरांपेक्षा अधिक काम
करतात. कामाच्या वेळी ते मजूर असतात. इतर वेळेला बादशहासारखे राहतात.
येथे सुद्धा असे होईल तर देश खरोखर उन्नत होईल, आम्ही संख्येने अधिक
असूनही अमेरिकेसारख्या अल्पसंख्य देशावर अन्नासाठी अवलंबून राहतो.
आम्ही दुसऱ्याला अन्न देऊ शकणार नाही परंतु संकटकाळी स्वत: स्वयंपूर्ण
होण्याचा निर्धार आपण केलाच पाहिजे. आमची नैतिक पातळीसुद्धा इतकी
खालावली आहे की परदेशातून भेटीदाखल आलेल्या वस्तू आम्ही काळा बाजार
करून विकायला लागलो आहोत.
*शिक्षणासोबत कार्यक्षमता वाढावी*
अखेर आम्हाला करायचे काय आहे? आजच्या शिक्षणाच्या सर्व
व्यवस्था आपणास बदलून घ्याव्या लागतील. जर देशात अन्न-वस्त्रादी साधन
सामुग्री नसेल, देश सुखी आणि स्वस्थ नसेल तर साधू काहीएक करू शकणार
नाही. प्रत्यक्ष राम, कृष्ण, बुद्ध आणि पैगंबर होऊनही काम करू शकणार
नाहीत. यासाठी ही सारी व्यवस्था बदलवून घ्यावी लागेल. समाजाला
चारित्र्याची, त्यागाची सक्रिय साधना शिकवावी असे साधूंना आव्हान करावे
लागेल. व्यापाऱ्यांना आपले व्यवहार प्रामाणिकपणे करायला शिकावे लागेल.
तांदुळात खडे मिसळले जाणार नाहीत अशी व्यवस्था करावी लागेल. शाळेत
पुस्तकी शिक्षणाबरोबरच हस्तव्यवसाय, श्रमदान चालेल. सारांश असा की,
समाजाची रचना शुद्ध तत्त्वांवर उभारावी लागेल. प्रत्येक माणसाला आपला
विकास करायला संधी निर्माण करून द्यावी लागेल.
देशात शिक्षण वाढावे हे राष्ट्राचे ध्येय आहे, परंतु मुलांनी घरचे,
समाजाचे, देशाचे काम करण्यासाठी समर्थ होणे हा त्यातला प्रमुख भाग आहे.
त्यासाठी शरीर बलवान होण्याची आवश्यकता आहे. शरीरासारखी मुल्यवान
वस्तू जगात दुसरी नाही. प्राणायामाद्वारे माणूस इंजिनसुद्धा छातीवर घेऊ
शकतो. आपल्या येथील कितीतरी साधू वैशाखाच्या कडक उन्हात चहुभोवताल
आग पेटवून मधोमध बसून तपस्या करतात.
मित्रहो, तुम्ही देशाचे आधार आहात. तुम्ही मनावर घ्याल ते होऊ
शकेल. आमच्या येथे काय कमी आहे ? भारताजवळ धन आहे. खनिज संपत्ति
आहे. कापूस, अन्न सारे काही येथे होऊ शकते. असे असूनही अशी परिस्थिती
का? याचे कारण असे की, देशाला आळसाने खाऊन टाकले आहे. ही गोष्ट
आधी दुरूस्त केली पाहिजे. त्यासाठी सेवक लागतील, संघटना लागेल. आपण
पुढे या, अशा शुभ कामाचे व्रत घ्या देशाची परिस्थिती दुरूस्त करा. भारतमाता
आपली वाट पहात आहे.
२२-८-५८
सकाळ