*१७. अमर जीवन* 

बंधूनो आणि भगिनींनो,
कोणत्या मार्गाने कोणाच्या डोक्यावर कीर्तीची ध्वजा फडकेल हे
सांगता येत नाही. के. डावरे जर गावाच्या तलावात बुडून मेला नसता तर
त्याच्या बद्दलच्या शोकाला इतकी वाचा फुटली नसती. परंतु डावरे यांनी सात्त्विक
सेवेला वाहून घेतल्यामुळे त्यांचे मरण अनेकांना शोकदायक ठरले. त्यांचे सुक्रुतच
असे बलशाली होते की, फारच थोड्या दिवसात त्याने जीवनाची सफलता
प्राप्त करून घेतली. मरणानंतर लोक रडतात ते आपल्या स्वार्थासाठी. काही
मर्यादपर्यंत ते स्वाभाविक आहे. परंतु मरण ही दुःख करण्याची वस्तू नाही.
माणूस मरतो तेव्हा त्याचा जीवन प्रवाह एका महान शक्तीत विलीन होत असतो.
तिथून आपल्या बऱ्यावाईट कर्मानुसार ते दुसरा जन्म मिळवितात.
मरणानंतर पहिला आवाज असा बाहेर येतो की, माणूस कोणत्या
निमित्ताने मेला. दुसरा आवाज त्याच्या बऱ्यावाईट कर्माचा उठतो. तो माणूस
कसा होता असे विचारले जाते. त्याचे बरेवाईट कर्म हे त्याचे प्रमाणपत्र ठरते.
परंतु हेच केवळ त्याच्या वास्तविक स्थितीचे निदर्शक मानता येणार नाही.
जीवनावर कोणती अविद्यात्मक प्रक्रिया घडली, त्याचे अंतरंग कोणत्या भावनांनी
भरलेल होते, तो किती सात्त्विक होता, त्याने किती जीवांचे कल्याण केले,
त्याच्या आत्म्याची उंची किती होती हे त्याचे खरे प्रमाणपत्र. हीच त्याची खरी
संपत्ती. त्याचप्रमाणे मरणसमयी जो विचार त्याच्या अंत:करणात असेल हे
सुद्धा त्याचे एक प्रमाणपत्र ठरते. अशा प्रमाणपत्रांचा गठ्ठा हातात घेऊन आपल्या
कर्तृत्वानुसार जीवन दुसऱ्या जन्मांत प्रवेश करीत असतो.
गुरू, शास्त्र आणि आत्मप्रचीति ह्या या गोष्टीची साक्ष देतात. अनेक
जन्मांचे जे संस्कार असतात. जी सेवा हातून घडत असते ते संस्कार पुसले
जात नसतात. यामुळेच साऱ्या जीवांची स्थिती सारखी नसते. कोणी
लहानपणापासूनच ज्ञानी होतो, कोणी लहान पनीच सुंदर गातात, आणि कोणी


मोठेपणीही बोलू शकत नाही.
याबद्दलची अनेक वचने प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम म्हणतात -तु
राम होतास तेव्हा आम्ही माकडे होतो. तू कृष्ण होतास तेव्हा आम्ही गोपाल
होतो. तू भगवान होतास तेव्हा आम्ही तुझे भक्त होतो. ते भगवंताला प्रेमयुक्त
अधिकार वाणीने म्हणतात, 
हा *घे आशिर्वाद अमुचाअमुच्या भाग्याने* 
ही जी उदाहरणे सापडतात त्यावरून पुनर्जन्म, संस्कार, संचित
इत्यादी गोष्टींचा अर्थ लागतो. मरण तर सर्वांनाच आहे. परंतु
       "याचसाठी केला    होता अट्टहास
शेवटचा दीवस गोड व्हावा"

मरणसमयी आपले चित्त देवाकडे असावे असा नेहमी प्रयत्न असला
पाहिजे. मरणासाठी घाबरण्याची काय आवश्यकता ? मरण हे तर आपल्या
मित्रासारखे आहे ! त्याच्या प्राप्तीने नव जन्म प्राप्त होतो. जे लोक स्वार्थी असतात
त्यांना मरणाची भीती असते. रडणे, दुःख करणे ही मायेचीच रूपे आहेत.
मुसलमान मरेपर्यंत रडतात. परंतु मरणानंतर रडणे बंद करतात. ते असे मानतात
की, देवाजवळ जीव जात असतांना दुःख करण्याची काय आश्यकता ? मायेमुळे,
मोहामूळे, दु:ख मोठमोठ्यांना होत असते. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर
श्रीरामचंद्रसुद्धा विलाप करू लागले याचा अर्थ हाच की तेव्हा ते मायावश झाले
होते. परंतु जेव्हा ते ध्येयशक्तीवर आरूढ झाले होते तेव्हा हजारो शत्रूचा वध
करीत होते. अशी एकेका अवस्थेची स्थिती असते. म्हणून मृत्यूबद्दल खेद
करणे योग्य नाही. जे कार्य करून ठेवायचे असेल ते मृत्यूपूर्वी करून ठेवावे
म्हणजे झाले. त्यामुळे मरणसमयीसुद्धा समाधान लाभू शकते.
३०-०८-५८
सकाळ