*२४ . रामराज्याचे स्वागत*
प्रार्थनाप्रेमी बंधू भगिनींनो ,
स्वराज्या मिळवितांना किती मोठ्या कल्पना देशासमोर होत्या ! गरीबी , रोगराई इत्यादी रोग देशाच्या शरीराला लागलेले राहणार तर नव्हतेच पण
*रामराज्य बैठे तिहूँ लोका
हर्षित भये गये सब शोका*
अशी रामराज्याची मोठी सुंदर कल्पना समोर होती . पण आजच्या या दुःस्थितीत सामाजिक जीवन कसे उभे करावयाचे हा सर्वांचा प्रश्न आहे . सरकार , संप्रदाय , संस्था , पंथ आणि पक्ष हे सर्वच रामराज्याच्या कल्पना बोलतात पण अशा समाजाचे प्रत्यक्ष दर्शन कोठे घडत नाही . याचे उत्तर निश्चितपणे देता येत नाही .
अशा नवीन मानवयुक्त समाज - पुरुषाचे प्रत्यक्ष दर्शन जेथे घडत असेल त्याला आम्ही तीर्थ म्हणू . परंतु असा रामराज्याचा देखावा नुसत्या गप्पा मारुन उभा होणार नाही . त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगच करायला पाहिजे . असा प्रयोग करण्यासाठी आम्ही प्रार्थनेचे माध्यम स्विकारले आहे . आम्ही केवळ प्रार्थना करुन थांबत नाही . नवा समाज निर्माण करण्याची साधना करीत असतो . प्रार्थना हा एक नकाशा आहे . याची कल्पना करता येते पण प्रत्यक्ष दर्शनासाठी तिथे प्रत्यक्षपणे दर्शन घ्यावे लागते . नेमकी हीच गोष्ट स्वराज्याच्या कल्पनेलाही लागू आहे . त्यासाठी त्रास घ्यावा लागेल . एकेक माणूस तयार करावा लागेल . अशा प्रकारे एका व्यक्तीचे जीवन उन्नत झाले की त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होईल . कुटुंबाचा गावावर होईल , अशा प्रकारे ही संस्कारगंगा वाढत वाढत विश्वापर्यंत पोचेल . असा हा रामराज्याचा प्रवास आहे . हे सर्व प्रार्थनेतूनच साध्य होऊ शकते . परंतु जर का प्रार्थनेतला प्राण
निघून गेला तर तिची गत जुन्या संप्रदायासारखी होऊन बसेल . एकदा भोगवृति संप्रदायात शिरली की त्या संप्रदायाचा प्राण निघून जात असतो
*सर्वांचा उदय म्हणजे रामराज्य*
आपल्या सध्याच्या प्रार्थनेत लहानशा अशा प्रकारच्या नव्या समाजाचे दर्शन घडते . ही भावना व पद्धती जितकी व्यापक होईल तितक्या प्रमाणात रामराज्याला अनुकूल भूमि निर्माण झाली असे मानावे लागेल मित्रहो,रामराज्याची निर्मिती म्हणजे एखाद्या प्रचंड इमारतीच्या बांधकामासारखी आहे. या देशांत कोणी
मागासलेला , कोणी उद्योगहीन आणि कोणी दारिद्री, आंगठाछाप राहू नये हे जेव्हा शक्य होईल तेव्हाच सर्वाचा उदय सर्वोदय होईल आणि सर्वोदय म्हणजेच गांधीजीच्या कल्पनेतील रामराज्य.
*जीवनात काटकसर हवी*
आज देशात धान्य आणि इतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासत आहे . म्हणून आम्ही कमीतकमी वस्तूत आपली गरज भागविली पाहिजे जपानसारखा देश आपल्या वाट्याला येणारी चमचा - अर्धा चमचा साखर घेऊन राहतो . कोणत्याही गरजेसाठी देशातला पैसा तो बाहेर जाऊ देत नाही . परंतु
आमच्यात ही वृत्ति आहे काय ? जपानसारख्या देशाची ही भावना घराघरात पोहचली पाहिजे . देशांत कापड कमी तयार होत असेल तर सर्वांनी कमी कपडे वापरले पाहिजे . धान्य कमी पडत असेल तर त्यात काटकसर केली पाहि । वस्तुत : आज देशांत धान्याचा तुटवडा आहे पण दुसरीकडे हजारो एकरातून तंबाखू पेरलीच जात आहे . ही स्थिती जर देशाच्या नागरिकाला जाणव नसेल तर या देशाचे कसे होईल हे सांगणे कठीण नाही इतर देशात सुद दिवशी सर्व विद्यार्थी कामे करतात . आमच्या देशात मात्र उलट परिस्थिती आहे . ही प्रवृत्ती आम्ही समाजातून समूळ नष्ट केली नाही तर परमार्थ , प्रार्थना
आणि देशभक्ती या साऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत.
*दिव्यदृष्टी प्रत्येकाला आहे*
गीतेत अर्जुनाला भगवंतांनी विराट स्वरुपाचे दर्शन दिले . याबद्दल माझे मत असे की भगवंतांनी त्याला विश्वाच्या विशालतेचे दर्शन करुन दिले आणि निसर्गाच्या मर्यादा किती विशाल आहेत हे त्याला दाखवून दिले . आपला देहचा पहा . दुर्बिणीतून पाहिले तर रक्ताच्या एका थेंबात लाखो जिवंत पेशी फिरतांना दिसतात . ही कथा एका थेंबभर रक्ताची तर मग विशाल विश्वाची काय अवस्था असेल ? अर्जुनाला भगवंताने याच गोष्टीचे ज्ञान करुन दिले .
बंधुंनो , ही विशाल दृष्टी तुमच्यातही आहे . परंतु तुमची दृष्टी स्त्री - पुत्र इत्यादिकांतच गुंतलेली आहे . त्या पलीकडे ती गेली नाही . गेली ती विश्वापर्यंत जाऊ शकेल . विशाल मानवतेचे दर्शन होण्याची जी दृष्टी तीच दिव्यदृष्टी होय . तिच्या प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो . पण केवळ प्रार्थनेत बसल्यानेच जमणार नाही . त्यासाठी आणखीही प्रयत्न केले पाहिजेत . आपणा सर्वांना ती दृष्टी प्राप्त होवो आणि तुमच्या आमच्या प्रयत्नाने रामराज्याची कल्पना साकार होवो अशी देवाजवळ प्रार्थना आहे .
सायंकाळ
३ - ९ - ५८