*२९. रामधून* 

        मित्रहो, आपल्या गावातील रामधून पाहून ज्यांना आंनद वाटला
नसेल ती माणसे अभागी समजली पाहिजेत. एवढ्या लहानशा गावात किती
सुंदर शोभा आणली आहे.
        कृष्णाच्या गोपाल काल्याचे वेळी ज्याप्रमाणे स्वर्गातील देव पृथ्वीवर
येण्याची इच्छा करीत होते तसे आजचे दृश्य शहरवासियांना वाटेल. काहीशी
त्याना लाजही वाटेल. तुम्ही श्रम करणारे आहात. पैसा खर्च न करता घराघरातून
तुम्ही सौंदर्य निर्माण केले आहे. गावात पाटर्या आहेत म्हणतात, पण नवबौध्दांचा मोहल्लाही सुंदर सजविलेला मला दिसला. धर्म कोणताही असो. परंतु गावधर्म
चालवावा लागतो. गावधर्मात सर्वाचा आदर राखला जातो. संस्कारांचे महत्व
फार आहे. एखादा गरीब मुलगा राजाच्या घरी दत्तक म्हणून दिला तर त्याला
राम्या न म्हणता रामाजी म्हणतात. तसेच मानव प्रगतीचे ज्यांचे विचार आहेत
त्यांनी गावात चांगले संस्कार निर्माण करावेत, त्यांनी गावाला चांगली चालना
द्यावी. तुम्ही या गावात पूर्वी अशी व्यवस्था पाहिली नसेल. पण गुरुदेव सेवामंडळ
येथे आले आणि गावात अशी क्रांती झाली. या भागावरून एखादे विमान उडत
गेले तर तुम्हाला पाहून एखादी फौजेची तुकडी बसलेली आहे असे त्यांना वाटेल. भक्ताला ही दिंडीची रचना दिसेल. असा नियम करा. यात गावातील
सारेच लोक भाग घेतील. या गावात सेवामंडळ आले. त्याचा तुम्ही फायदा
घेतला.आता विकासमंडळ येथे आले आहे. त्यांचाही फायदा घ्या. आणि येथे
व्यायाममंदिर, धान्यभांडार,गोरक्षण, शेतकरी मंडळ इत्यादी सेवामंडळाच्या
योजना चालू करा. म्हणजे हे तुमचे कार्य पहायला पुढारी, संत महात्मे येतील
काम करून दाखवा म्हणजे हे सर्व घडेल. देवसुध्दा केवळ टाळ कुटल्याने
मिळत नाही. तो कामानेच मिळतो. तुम्ही अशा योजना आखल्या तर तुमचे


मुलेबाळेही उन्नत होतील. सर्वत्र नवा देखावा दिसेल. मग देवसुध्दा तुम्हाला
धन्यवाद देतील.
___ मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. युध्दाचे रणवाद्य वाजल्याशिवाय जसा
सैनिकात उत्साह येत नाही तशी गावात काहीतरी नवीन गोष्ट घडल्याशिवाय
जनता जागृत होत नाही. या रामधूनद्वारे आम्ही लोकात चेतना निर्माण करतो.
यात धार्मिकता आहे. सहकार्य आहे. सेवेची वृत्ती त्यात आहे आणि संपूर्ण
गावाचे भले होण्याचे यात बीज आहे. रामधून तिच्या मूळ उद्देशासह चालविली
तर आपली आणि आपल्या गावाची उन्नती होईल यात शंका नाही.
सकाळ
१२-९-५८