*३०.कृषिसंस्कृति आणि पोळा* 

प्रार्थनाप्रेमी बंधू-भगिनींनो,

            सण असो की इतर दिवस असो, आपण रोज प्रार्थना करतो.
जन्मदिनी, मृत्युदिनीही आमची प्रार्थना चालू असते. प्रार्थनमुळे आमचे मानसिक
धारिष्ट्य वाढते. आमची प्रार्थना पोळ्यानिमित्त आहे. हा दिवस बैलांच्या
प्रदर्शनाचा आहे. आजच्या दिवशी बैलांना स्नान घालून त्यांना महादेवाच्या नंदीच्या मूळ स्वरुपात पहावयाचे असते. आज म्हणे बैलाचा पोळा पहायला
महादेव येतो. पण तो कैलासातील नसून जनतारुपी महादेव आहे. बैलाची
सेवा कोणी चांगली केली, कोणी त्याला धष्टपुष्ट केले हे तो पाहतो. कोणत्या
शेतकयाने बैलाला मुलाच्या ममतेने वागविले ते येथे दिसते. बैलाला समानतेने
किंवा मायेने वागविणे याचा अर्थ त्याला पुरणपोळीचे जेवण देणे असा होत
नाही. तर त्याचेच खाद्य त्याला भरपूर देऊन त्याला धष्टपुष्ट करणे असा आहे.
त्याच्याच मेहनतीवर शेतकरी जगतो. शेतात दोघांचेही खाद्य निर्माण होते.
दाणा आणि चारा, आमच्यात सदाचाराची आणि बुद्धीची ताकद पाहिजे पण
बैलांच्या अंगात रग हवी. दोघांकरिता दोन प्रकारचे खाद्य भूमाता पुरविते.
शेतकरी त्याला पेंड, कडबा देऊन उत्तम बनवितो आणि बैलाला श्रृंगारुन
मैदानात उभा करतो. आणि मग अशा बैलांचे प्रदर्शन जनतारुपी महादेव पाहतो.
 *जनतेचे प्रमाणपत्र मोलाचे* 
            बैलांची जोपासना कशी करावी याचेही ज्ञान शेतकन्याला पाहिजे.
अशा सुंदर स्वरुपात आमचा पोळा साजरा झाला असता तर सरकारी
अधिकाऱ्यांना प्रदर्शने भरविण्याची काही आवश्यकता उरली नसती. आम्ही
आपल्या कार्यात चुकलो. काही मालक तर पोळ्यातही जात नाहीत. नोकरच
बैलांना आंघोळ घालतो, रंग लावतो आणि त्यांना तोरणात उभा करतो. त्यामुळेच


आमच्या या प्रदर्शनाची ही स्थिती झाली. ज्या गोष्टी समाजात आणायच्या
असतात त्याचे तत्वज्ञान अशा प्रसंगातून शिकायचे असते.
सामुदायिकतेत एक मोठी शक्ती वास करते, सामुदायिक आवाजही
एक मोठी शक्ती असते. एकदा एका गावी असतांना बाजारात अफवा ऐकू आली
की कोणा एका गृहस्थाच्या येथे पाच फण्यांचा भुजंग निघाला. आम्ही त्याला
पाहण्यास निघालो. गल्लीत आल्यावर एकच फणीचा साप आहे असे कळले.
घरापर्यंत जाई तो पर्यंत अंगठ्या एवढाच राहिला. आणि प्रत्यक्षात ती सापसळी
निघाली, पण बाजारात जाईपर्यंत ती भुजंग झाली. याचे नाव आवाज,
सत्कार्याचाही मोठा आवाज झाला तर समाजात त्याची मोठी वाहवा होते.
बैलांची चांगली जोपासना करुन त्याला मालकाने पोळ्याच्या दिवशी मैदानात
आणले पाहिजे. म्हणजे त्याच्या गौरवाचाही मोठा आवाज होईल,
 *सणामागचे तत्त्वज्ञान समजून घ्या* 
          आज आमच्या जुन्या प्रथेतील आणि सणातील तत्त्वज्ञान हरपले
आहे. आत्मा गेल्यावर शरीराची जशी अवस्था होते तशीच स्थिती या प्रथांची
झालेली आहे. भारतीय जीवनातील गोष्टीत आज पुन्हा ते तत्त्वज्ञान निर्माण
करण्याची जरुरी आहे. आज मनुष्य देवाचे नाव घेतो. पण बेईमानासारखा
वागतो. भक्ती करतो पण ज्याची तो भक्ती करतो त्याची आज्ञा मोडतो. हिंदुधर्माची
जय म्हणतो पण त्याचे विशाल तत्त्व विसरतो. धर्म जागवायचा असेल तर
तत्त्व विसरुन चालणार नाही. सेवामंडळ जगायचे असेल तर सेवेची भावना
जायला नको. तसेच सणवार खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असतील तर
त्यांच्या मागील तात्त्विक बैठक समजून घेतली पाहिजे. कारण आमच्या दैनिक
जीवनाशी या सर्वाचा फार निकटचा संबंध आहे. आमचे जीवन सुंदर व्हावे या
करिताच त्यांची निर्मिती आमच्या पूर्वजांनी केली आहे.
          दसऱ्याची भूमिका अशी की वर्षात ज्याचेशी शत्रुत्व आले असेल
स्याचेशी मैत्री करायची, या मैत्रीची साक्ष म्हणुन आम्ही वनस्पति हाती देतो.


पण आजवर पिढयानपिढ्या बदला घेऊ इच्छिणारे पुरुष समाजात आहेत.
असे का झाले तर आम्ही दसऱ्याचे तत्वज्ञान विसरलो. म्हणून दिवाळीत
आम्ही गोवर्धन करतो. गाईची पूजा करतो. परंतु आमच्या गाई जणू
कसाईखान्यातून सोडवून आणल्याप्रमाणे दिसतात. हत्तीसारखी गाय दिसली
पाहिजे. पण हे कोण करणार? आज तर गोरक्षणाच्या नावावर पोट भरण्याचा
धंदाच चाललेला आहे. वृंदावनाची गोष्ट आहे. मंदिरात गाय बांधलेली होती.
चर्चेत मी तेथील पुजाऱ्याला म्हणालो,
       "मंदिर तर खूप चांगले आहे मग गाय अशी कां?"
पुजारी म्हणाला,
"महाराज, मी  तिची दिवसातून तीनदा पूजा करतो."
परंतु चारा किती वेळा  दिला जातो हे त्या पुजान्याला माहीत नव्हते.
अशी आमच्या गोरक्षणाची स्थिती आहे. गाईचे
पूजन म्हणजे तिची बेलफुलांची
पूजा नव्हे. तिचा आहार तिला दिला पाहिजे. त्याचे नाव पूजा. ही परिस्थिती
लोकांच्या मतावर बिंबविण्याची आज जरूरीआहे. हे आम्ही करु तेव्हाच
आमचा गृहस्थाश्रम सुखाचा होईल.*
         मित्रह * ऐका किंवा ऐकू नका. परंतु मनुष्याच्या जीवनातील तत्त्वज्ञान
गेले की त्याची स्थिती माकडाप्रमाणे होईल. म्हणून हे तत्त्वज्ञान आपल्या
जीवनात उतरवा आणि निश्चयाने टिकवा पोळ्याच्या निमित्ताने एवढाच एक संदेश आहे.

सायंकाळ
१७-९-५८