*३१. अन्नोत्पादन हीच प्रार्थना* 

बंधू-भगिनींनो,
         आतापर्यंत आपण लहानसहान अनुभवापासून तो मोठा प्रयोगापर्यंत
शेतीविषयक विवरण ऐकले. शेतीचे उत्पादन वाढविले पाहिजे. नाहीतर भयंकर
धोका निर्माण होईल. कारण लोकसंख्या वाढत आहे. सेवामंडळ हे धार्मिकच
नव्हे तर आर्थिक विकासाचेही कार्य करणारे मंडळ आहे. ज्या देशात आपण
राहतो त्या देशात अन्न उत्पादन वाढले नाही तर प्रचारकांना कोण जेवू घालणार?
शेतीचे पिक चांगले येण्याकरिता खताचेही मार्ग शोधले पाहिजेत. जमिनीतन
अन्न आपण घेतो. पण खत मात्र नदीच्या मागनि समुद्रात जाते कंपोस्टखते.
सोनखत, मूत्रखत, शेणखत इत्यादी खते  कसे तयार करता येतील हे 
जिव्हाळ्याने लोकांनी
जाणून घेतले पाहिजे.
       जमीन आणि गोधन यांचे शास्त्र ओळखुन  ज्यांनी प्रयत्न केला ते
देव झाले. जमिनीच्या उत्पादनाचे अधिष्ठान नसेल तर माणसांना देवत्व प्राप्त होत नाही हे देवही जाणत होते. श्रीकृष्णाचे गायीवर प्रेम होते. दत्ताने गाईला गुरू केले.महादेवाचे वाहन नंदी होते. आज लोकसंख्या वाढत आहे प्रत्येकाच्या
वाट्याला एक एकरही जमीन येऊ शकत नाही. प्रचारकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रत्येक खेड्यात  शेतकी मंडळ सुरु केले पाहिजे.
 *अन्नोत्पादन : काही वाईट प्रथा* 
        अन्न उत्पादनाबरोबर अन्न व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रयत्न केला
पाहिजे. आमच्या रुढी आज बदलल्या पाहिजेत, जन्मदिन, मृत्युदिन इत्यादी
समारंभात जरुरीपेक्षा कितीतरी अन्न वाया जाते. त्याचा उपयोग काटकसरीने
केला तर अन्नाची टंचाई बरीचशी दूर होईल. धर्माच्या काही कल्पनामुळे
अन्नोत्पादन बरोबर होत नाही. मुसलमान मेला की कबर बांधण्यास जागा हवी.
साधू मेला की समाधी किंवा देऊळ बांधले जाते ख्रिस्तवासी होणाऱ्या


ख्रिश्चनालाही दफनासाठी जागा लागते. जन्माला आलेल्यासाठी घरे वाढवावी
लागतात. मेला तरीही जमीन खर्च होते. अशा रीतीने जमीन कमी होत आहे
याचाही विचार व्हायला पाहिजे. लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढू नये म्हणून
संयमाचे किंवा संततिनियमनाचे शास्त्रही प्रगत व्हायला पाहिजे. ज्याच्याजवळ
खायला कमी असते. त्यालाच संतति जास्त असा देवाघरचा उलटा न्याय
आहे. त्यामुळे दुबळी प्रजा निर्माण होते. खायला नसल्यामुळे कुटुंबाचे हाल
होतात. अशा सर्व गोष्टी आज मनुष्य पाहत आहे. सर्व गोष्टीवरुन शेतीला
प्रोत्साहन देण्याची किती जरुरी आहे हे लक्षात येईल. शेतीच्या उत्पादन वाढीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत. सरकार यासाठी शेतकऱ्यांना खूप मदत
देत आहे. आज साधू संत महात्मे या सर्वानी धार्मिक अधिष्ठानावरुनही लोकात
धान्य उत्पादनाचा प्रयत्न करायला पाहिजे. लोकात यासाठी चांगला प्रचार
हवा. साधू, संत आणि प्रचारक या कामासाठी लागले तर अशक्य असे काही
नाही. आपण सर्वांनीच हा देशासमोरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ईश्वर आपणास तशी बुद्धी देवो.
सकाळ
१४ -९-५८