*३३. सामुदायिक जीवनासाठी* 
 *सामुदायिक प्रार्थना* 

प्रिय बंधू-भगिनींनो
       प्रार्थनेतून सामुदायिक जीवनाचा विकासही होत होता ही कामे
गावातील साधू, भटजी किंवा जोशीबुवा यांच्यामार्फत चालत. त्यांना दुसरी
कामेच नसत. त्यांचे भरणपोषणही गावामार्फत चाले. गावातील सर्वांनाच ते
सन्मार्गाचे धडे देत. पण तो जोशीबुवा दक्षिणा आणि लाडू यातच पुढेपुढे दंग
राहिला. ती प्रथा गेली आणि सामुदायिक विकासाचा डोलाराही ढासळला.
बरोबरच आहे. पाण्याचा धंदा आग विझवायचा पण उद्या पाणीच ज्वालाग्राही।
निघाले तर आग कशी विझणार? कुंपणानेच शेत खाल्ले तर पिकाचे रक्षण कसे।
होणार? राजाच अन्यायी आणि स्वार्थी निघाला तर न्याय कुठे मिळणार?
तसाच पंडित स्वार्थी झाला आणि आणि त्यामुळे अशी स्थिती झाली. आज
तीच गोष्ट नव्याने शिकवावी लागत आहे. ती यामुळेच ही प्रार्थना आमच्या
जीवनाचे पैलू शुद्ध करते. ही प्रार्थना मंदिरातच होत नसून ती आपल्या
कार्यक्षेत्रातही होऊ शकते. मात्र त्यात सामुदायिक विकासाची आठवण आम्हास
असावी. शेतकयाची प्रार्थना देशाला भरपूर धान्य पुरविणे ही आहे. तर शिक्षक
उत्तम, सुशील तरुण निर्माण करण्याचे प्रार्थनचे फळ मिळवू शकेल. दुकानदार
गिहाईकाला समाधान देऊन आपली प्रार्थना करीत असतो. याप्रमाणे आमच्या
वैय्यक्तिक जीवनाचा शुद्ध प्रवाह सामाजिक प्रवाहाशी मिळण्याकरिता धाव घेत
असेल तर आमचे काम हीच प्रार्थना होऊ शकेल. या गोष्टींचे धडे देण्यासाठी
आणि सामुदायिक जीवनाचे दर्शन घडण्यासाठी आम्ही सामुदायिक प्रार्थना
करायला पाहिजे.
 *मनोरंजनात विशुद्ध जीवनप्रवाह* 
       मनुष्य नेहमीच गंभीर राह शकत नाही. त्याला कुठेतरी मनोरंजन
पाहिजे. त्याकरताच शिमग्यासारखे सण निर्माण झाले आहेत. त्यातसुद्धा


काही तत्वे भरलेली आहेत. पण आज त्याचा विपर्यास झाला. आमच्या ऋषींनी 
तर दिवाळीत शेणाच्या महिषासुराचीही पूजा करायला सांगितले आहे. ज्या
खतापासून जीवनोपयोग वस्तु प्राप्त होतात त्याची सुद्धा पूजा करावयाची ही
थोर दृष्टी त्यामागे आहे. आमच्या धर्मात अशी कोणतीही प्रथा नाही की जिच्यात
जीवनाचा अर्थ भरलेला नाही. पण त्यातील अर्थ  आज विसरला गेल्यामुळे
सारा घोटाळा झाला आहे. आता हा प्रवाह पुन्हा जीवनात वाहविण्याचा आपण
प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात सौंदर्य आणण्याचा आपण प्रयत्न
केला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात सौंदर्य आले की त्याचे राहण्याचे गाव
आपोआपच सुंदर होईल. हाच परमेश्वर प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. पूर्वीच्या
काळी ही दृष्टी होती, म्हणून सर्व लोक सुखी होते. त्यात जर कोणी दृष्ट प्रवृत्तीचे ।
लोक निर्माण झाले तर त्यांचा नाश करण्यासाठी अवतारी पुरुषांनी बलाची
उपासना सांगितली आहे.
 *दुर्बलाला काहीच करता येत नाही* 
      जो मनुष्य बलहीन आहे तो या जगात काहीच करु शकत नाही.
दुर्बल समाजावरही तोच प्रसंग येतो. म्हणून दुर्जनावर विजय मिळविण्या करिता।
आणि दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करण्याकरिता आपण बलवान झाले पाहिजे. यात
देशाचेही भले आहे. अशा रीतीने बलवान, चारित्र्यवान असे जे कर्मयोगी आहेत
त्यांच्या पाठीशी देव उभा राहिलेला आहे. गोरा, सावता, जनाबाई यांच्या
उदाहरणावरुन हेच दिसते. अशा त-हेने आजही आपणास या गोष्टी अंगी
बाणवयाच्या आहेत. या वर्गात एक महिनाभर हेच सांगितले गेले.जे अप्रगत
असेल ते प्रगत करा. कोणाचा द्वेष करु नका. कोणावर टीका करु नका. श्रमदान,
गावागावातून सुरु करा हीच तुमची प्रार्थना आहे. आणि यासाठी

 *"जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांशी शिकवावे* 
 *शहाणे करूनी सोडावे I सकळजन* 
         ही समर्थांची उक्ती लक्षात ठेवा आणि

" *अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक"* 
अशी महत्वाकांक्षा मनात घेऊन हा संदेश घरा- घरात पोचवा.