युगप्रभात
निवेदन

चंद्रसूर्यप्रमाणे अहोरात्र व अविश्रांत परिभ्रमण व परिश्रम करणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या हृदयातील कार्योत्साह अदम्यआहे यांत शंकाच नाही. तथापि त्यांचे असामान्य शक्तिसंपन्न शरीर । देखील निसर्गनियमानुसार अधुनमधून त्यांना सक्तीची विश्रांति घ्यायला भाग पाडते व ते स्वाभाविकच आहे. परंतु त्यांच्या हृदयांतील राष्ट्रहिताची ज्वलंत तळमळ मात्र तशाहि स्थितीत नवनवी प्रकाशकिरणे फेकल्याशिवाय राहत नाही. ओविबद्ध आनंदामृत, अनुभवामृत अभंगावली व युगप्रभात ह्या त्यांच्या अशाच वेळोवेळच्या आत्यंतिक आजारांनी जगाला दिलेल्या बहुमोल देणग्या होत.
       १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात प्रसिद्ध चिमुर-आष्टी प्रकरणांत श्री महाराजांना अंग्रेजी राजवटीने तुरूंगात चार महिने सक्तीने विसावा घ्यावयाला लावला असता त्यांतून जसा सुविचारस्मरणौ हा विचारप्रवर्तक ग्रंथ जन्मास आला, तद्वतच १९४८ च्या त्यांच्या षण्मासिक आजारांतील मत्नव्यांतून युगप्रभात हा नव्या युगाचा मार्गदर्शक असा तेजस्वी तारा उदयास आला आहे. प्रश्नोत्तरपद्धतीने खड्या भाषेत लिहिलेल्या या लेखसंग्रहांत श्री महाराजांचे हृदगत सुसंगतपणे स्पष्ट झालेले पाहून, महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यचार्य सन्मान्य श्री वि.स.खांडेकर यांनी आपल्या मौल्यवान दोन शब्दां नी महाराजांचे व्यक्तिमत्व, कार्य व प्रस्तुत ग्रंथ यांचे संक्षेपत: सादर समालोचन करून त्यांचे वास्तविक मूल्य, महात्म्य व सौदर्य समाजासमोर अभिव्यक्त करण्याचा जो समुचित प्रयत्न केला आहे, त्याबद्दल प्रकाशन मंडळाबरोबरच वाचक देखील त्यांचे हार्दिक आभार मानल्याशिवाय खचित राहणार नाहीत.
                                              सुदाम सावरकर
                            सपादक व संयोजक- श्रीगुरुदेव प्रकाशन




ही ज्ञानाची दिवाळी की दिवाळखोरी ?

माझ्या भारतवासी मित्रा! अरे होय, ते सर्व बरोबर आहे-
देव, धर्म, अवतार, अध्यात्म, आत्मा न् ब्रह्म ! पण प्रश्न एवढाच
आहे की हे सर्व घुसळत बसण्याची वेळ कोणती ? व्यक्तिशः वेळ कोणती आणि सार्वजनिकरित्या वेळ कोणती, हे जोपर्यंत जनतेला व पुढार्यांनाहि कळत नाही तोपर्यंत त्या महत्वाच्या देवभक्तीला नि धर्मज्ञानाला कवडी इतकीहि किंमत नसते; आलं लक्षांत ? घरांतील माणूस मरणोन्मुख झाला, खाली टाकण्याची वेळ आली; अशा स्थितीत सुशिक्षित मुलगा दिवाळीकरिता घरी आला म्हणून तो काय फटाकडे उडवूं शकतो ? गौळणी घरांत आणून त्यांचा नाच करूं शकतो ? हे जसं कर्तव्यदृष्टीनं गर्हणीय व लोकांच्याहि दृष्टीनं निद्य आहे, तसच जनता उपवासान मरत असता वेदांताची दिवाळी करणं हे देखील निंद्यच आहे. पितापुत्राइतकाच देशाचा आणि व्यक्तीचा अभिन्न संबंध आहे. देश आपत्तीत असतां व्यक्तीनं शब्दब्रम्हाचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची आपली जबाबदारी पाळावी यातच धर्म व देवसेवा घडणार आहे.



स्वातंत्र्याची खरी दिवाळी अजून दूरच!

मित्रा ! तुला माहित आहे ना की, देशात स्वातंत्र्य आलं म्हणून सर्वसाधारण रिवाजाप्रमाणं लोक ज्यावेळी आनंदानं नाचत
होते, त्याच वेळी पुज्य महात्मा गांधी उपवास करीत होते;
खेड्याखेड्यांत फिरत होते. याचा अर्थ काय? हाच ना याचा अर्थक की, गुंडांचा नंगा नाच चालू असतां मिळालेल्या स्वातंत्र्याचा हर्ष कशाचा? देशांत दुःखाचा वणवा पेटला असतां देश स्वतंत्र झाला असं कुणी म्हणावं ? गावंची गावं गुंडलोक जाळून भस्मसात् करतात अन् कुलीन व तरुण स्त्रियांची धिंड काढून आसुरी बलात्कार करत।
नि म्हणे देशांत आनंदी आनंद गड्या! हे कुणाच्या हृदयाला आवडत असेल ते आवडो, पण थोरामोठ्यांना तरी ते कळलंच
पाहिजे ना ! अजून देखील राष्ट्रांत तशीच चिंताजनक स्थिति आहे; सामान्य जनतेचं जीवन या-ना-त्या आगीत अजूनहि होरपळतच आहे; मग अशा होळीत ही आनंदाची दिवाळी हातांत पोथ्यापुराणं घेऊन तुम्ही कशी साजरी करणार? आपण स्वातंत्र्याचं दर्शन घेतलं, सीमोल्लंघन करून आपण ही महत्वाची मर्यादा गाठली, हे ठीक आहे ! पण जोपर्यंत आपण आपल्या लहानथोर दुःखी बांधवांना सोनं वाटल नाही, त्यांच्या जीवनांतील दुःख थोडंसुद्धा नाहीसं केल नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याची दिवाळी साजरा करण्याचा दिवस अजून लांब आहे, हे समजावयास नको का जनतेला ?



सभोवती वादळ पण आमचा दीप अढळ?

तूं म्हणतोस- ज्यांना तकलीफ असेल, गुंड छळत असतील,
ज्याच्या घरी अन्नाचा कण नसेल किंवा ज्यांच्या बिमारीची काही व्यवस्था नसेल त्यांना आनंद नाही होणार; पण ज्यांना अशी काहीच अडचण नाही, खायला-प्यायला उत्तम आहे, घरी रग्गड पैसा आहे, मानमरातब आहे, उच्च सरकारी अधिकाराची जागा आहे, मील आहेत, कारखाने आहेत, त्यांना काय हरक आहे. आनंद मानायला-
चैन व उत्सव करायला? वाहवा! फार उत्तम तत्वज्ञान आहे हे ! तुझे हे म्हणणं याप्रमाणं आहे की दुःख झालं असेल तर ते पोटांत झाल असेल पण तोंडानं लाडूपेढे खायला काय हरकत आहे ? ओठाचं अण् पोटाचं तर बरंच अंतर आहे. असंच ना तुझं म्हणणं ? पण हे बरोबर आहे का, तूंच विचार करून सांग. खवखवलेल्या विस्तवावर पाय ठेवून तुला हसतां येईल का? आपले सर्व अवयव परस्परांशी संबंधित आहेत, असं तुला वाटतं ना ? अगदी त्याप्रमाणच देशातील सर्व लोकांचं जीवन एकमेकाशी निगडित आहे. गरीब व
भांडवलदार, ब्राह्मण व महार यांचा इतका निकट संबंध आहे की जितका डोक्याचा व हृदयाचा ! सर्व लोक एकाच विराट पुरुषाने वेगवेगळे अवयव आहेत, हेच नाही का तुमच्या ब्रम्हज्ञानानं आजवर कंठरवानं सांगितलं ? ज्यांना हे देशबांधवाचं नातं समजत नाही ते देशाचा सर्वच तऱ्हेचा नाश करणारे किडे आहेत. त्यांना कधीना-कधी तरी सर्वांच्या सुख:दुखाशी समरस होणं भाग पडेल किंवा घरादारांसहित नेस्तनाबूद तरी व्हावं लागेल. एका अवयवांत अधिक
रक्त साचणं म्हणजे दुसऱ्या अवयवांचा पोटमारा होणं, अशा स्थितीत शरीर सुखी कसं राहणार? एक तर हे रक्त निरनिराळ्या उपायांनी


चहुंकडे सारखं वाहतं तरी करांव लागेल, नाहीतर निरुपायानं शिंगालावून किंवा ऑपरेशन करून सर्व अवयवाचं जीवन परस्परसंबद्ध आहे, हे समजून घेण्याचे दिवसच आले आहेत; आलं लक्षात ?


             प्रयत्नाच्या दिव्यांनी हा अंधार नष्ट करा !

मित्रा ! ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे डोळेझाक करून
आपल्या कल्पनेच्या किंवा सांप्रदायिकतेच्या सणावारांत, जातपांत व जातिधर्मांत गर्क राहणं म्हणे देशांत अंदारधुंदी व चवचिंधीच नाही की देशांत जर लोक इतके विपत्तीतच आहेत तर सर्वांनी आता सर्व सुखसोयी बंद करून फक्त एवढच एक काम कराव मला फक्त एवढच म्हणावयाचं आहे की प्रत्येकानं आपापल्या परीनं तरी हे कार्य अवश्य उचलून धरलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध दिशेन पाऊल टाकण्याच मात्र आदीच बंद केलं पाहिजे. देशांत सर्वांना सुख व्हांव, अंगाला पुरेसं वस्त्र व पोटाला योग्यसं अन्न मिळावं, प्रत्येकाला मानानं व मित्रत्वानं राहतां यावं अन् देशाला मिळालेलं स्वातंत्र्य टिकवतां याव म्हणून जे जे लोक प्रयत्न करतात त्यांना प्रोत्साहन व धाडस देणे, आम्ही पाठीशी आहोत एवढा तरी विश्वास व शक्य ती मदत त्यांना देणं, हे तरी आपणा सर्वांना करता येईल की नाही? की उलट यानं काय होणार ? देवाधर्मांशिवाय जग ताळ्यावर येण शक्यच नाही म्हणून दुबळेपणाच वाढवायचा नि अन्यायाच्या बडग्यासमोर डोकं नम्रच करीत राहायचं ?


             देवधर्म - कल्पनांची काजळी झाडून टाका !

मित्रा ! देवधर्माविषयींचा तुझा विश्वास तरी किती विचित्र!
तुला देवधर्महि तोच हवा ना की जो शरीराला नेभळट बनवतो,  कर्तव्यवंताला निराश करतो नि जीवंत माणसाला नामर्द करुन सोडतो?




देवधर्माची अशी विकृत व्याख्या करुन त्यांच्या मन:कल्पित सामर्थ्याची व अवतारांची वाट पाहात राहिल्यानं नि त्यांच्या मूर्तीपुढं फक्त नमस्कार घालीत बसण्यान आता काय भागणार? अरे! धर्म म्हणजे प्रत्येक देशकाल-परिस्थितीत ज्या ज्या मार्गांनी जनतेचं धोरण, पोषण व प्रगति होऊं शकेल असे सर्व न्याय्य मार्ग अन् अवतार म्हणजे मागील बिघडलेले मार्ग झाडून किवा देशकालनुसार योग्य अशी नवी वाट काढून लोकांना शांति व प्रगतीची जोड करून देणारे क्रांतिकारक महापुरुष! त्यांच्या नावांच्या नुसत्या माळा ओढित
बसल्यान काय होणार ? आज तर भारतांत नवं युग निर्माण होऊ घातलं आहे; अर्थात् आज भारतातील विचारधाराहि त्याला पोषक अशीच वाहू लागायला पाहीजे, देशात साहित्यहि तसच निर्माण व्हावयाला पाहिजे आणि देवधर्माच्या कल्पना, व्याख्यान-कीर्तन व
उत्सवहि त्याच मार्गाचा प्रभाव पाडणारे असले पाहिजेत. असा चहू बाजूंनी जोर पडेल तेव्हाच देशांत सर्व एक होऊन असा एक अभेद्य तट निर्माण करतील की ज्यांत शत्रूला बोट घालण्यासहि जागा मिळणार नाहीं आणि आदर्श असं नवयुग उदयास येण्याला कोणतीहिअडचण राहणार नाही, हे निर्विवाद आहे. अशी खरीखुरी आनंदाची
दिवाळी साऱ्या भारतवर्षांत निर्माण व्हावी, असं नाही का तुम्हांला वाटत? मग सचोटीचा आचार नि सत्याचं संशोधन याशिवाय हा असला नेभळा व उदासवाणा वेदांताचा अर्थ हृदयाशी धरल्यानं काय लाभ होणार? 


                   प्रकाश घेणार की ज्वाला ?


मित्रा! याच वेदांताशी, धर्माशी व देवावताराशी संलग्न
होऊन पूर्वीच्या लोकांनी शूरपणानं लढाया करुन दुष्टांना शासन केलं,
स्वातंत्र्य मिळवलं, आपलं सत्याचं ब्रीद नि जगाच आदर्श गुरुपद


राखलं पण तत्वाला कुठंहि बाध येऊं दिला नाही. प्रसंगी ब्राह्मण व महार, पुढारी व जनता, देव व भक्ति एक होऊन त्यांनी दुष्टाच्या मनोवृत्यांचा पाठलाग केला व खऱ्या धर्माची म्हणजे सत्याची - न्यायाची संस्थापना केली. पण अत्यंत आश्वर्य वाटतं मला, की त्याच थोरांच्या संप्रदायांना व देवधर्मांना हृदयाशी धरून आम्ही आपल्या घरात हा आळस नि भित्रेपणा कसा वाढवला? दगडमातीच्या देवापुढं डोकं ठेवून-ठेवून वाईट लिला तेवढ्या करायला शिकलो आम्ही ! जे आवश्यक ते सर्व सोडून देण्याची प्रवृत्ति आमच्यांत भरुन राहिली ! आता तरी या सर्व दुर्गुणांना आळा घालून आम्हाला कर्तव्यतत्पर व्हावयाला नको का? असं जर आम्ही करणार नाही तर राष्ट्रांत आनंदाची दिवाळी साजरी होणं केव्हाहि शक्य नाही; आणि अशा स्थितींत आम्ही एकटे-दुकटेच जर चैनीचा उत्सव करुं लागलो तर हे दिवाळीचे दिवे कोणत्या क्षणी आगीचं रुप धारण करतील तेहि सांगता येणार नाही!
i