प्रार्थना
         
         हे जगच्चालक अमर्त शक्ते । जशी इतर अनेक प्राण्यांची गुणकर्मे त्यांच्या त्यांच्या वेषानुरुप व योनीनुसार पूर्ण स्वरुपाची दिसतात तद्वतच मनुष्याच्या मनुष्यत्वाचा विकास योग्य गणकांनी सहनशील स्वतंत्रतेने व विशालतेच्या उज्जल बाण्याने होऊ दे . अर्थात ज्या अपेक्षेने तू  मनुष्यप्राणी निर्माण केले ती तुझी इच्छाच पूर्णत्वाला येऊ दे .
           हे चैतन्यमया ! आपल्या विपरीत कर्माच्या फळांचे ज्ञान त्यांना लवकर होऊन ते डोळस वृत्तीने मागे फिरतील नि आपल्या आत्म नेत्राने दिसणाऱ्या लाभासच प्राप्त करतील अशी प्रवृत्ति आणि साधन त्यांना दे . अर्थात आळसाने किंवा मनोमानी समाधान न देता समाधानाच्या वस्तूनेच समाधान मिळवून घेण्याचा मार्ग त्यांना लाभू दे , ज्ञान दे व समानता दे . 
           हे आनंदघना ! जी शांति जगाच्या कोणत्याहि वैभवाने प्राप्त होत नसून , जिला मानसिक धनाचीच आवश्यकता असते , असे सत्य व चिरंतन शांतिसुख प्रार्थी - जनात प्रार्थनाफलाने नांदु दे व बाह्य कर्मानीहि वृत्ति त्यातच रंगू दे , अर्थात परमार्थ व व्यवहार यांच्या भेदाची बुद्धि नष्ट करून त्यात साम्यता येऊ दे .
हे अविनाश विश्वरुपा ! तुझ्या सत्यस्फूर्तिला जाणणाऱ्या जगांतील सर्व सज्जनांची वाढ होऊ दे , त्यांना सत्ता व ऐक्य - बुद्धि दे आणि सत्याची सतत धारणा व वृद्धि करण्यास प्रार्थना शक्ति दे तसेच भ्रांत जीवांना प्रार्थना करण्याची इच्छा होऊ दे , हीच माझी प्रार्थना आहे .
( श्रीगुरुदेव - एप्रिल १९४४ )