कुपा- पात्रता
   

              श्रीगुरुदेवा ! तुझी जाणीवशक्ति सर्व मनुष्य मात्राच्या हृदयाकाशांत विराजमान असून , जे पुरुष त्या जाणिवेला जाणून असतात नि तिचा आपल्या जीवनोन्नतीत उपयोग करुन घेतात , तेच तुझ्या कृपेला पात्र होत असतात .

              निसर्गाच्या प्रवाहानुसार मनाच्या चाचल्यात वा आपत्तीच्या अत्यंत गंभीर वातावरणांत मनुष्याला धीर देऊन सहनशीलता शिकवितो नि सत्य पथावर आरुढ करतो अशा त्या स्फूर्त बोधाला जे लोक असतात तेच तुझ्या कृपेला पात्र होतात .

              विश्वासमग्न पुरुष जेव्हा अमूर्त कल्पनेच्या भरात तुझ्याकडे पाहतात आणि स्वत:ला विसरुन तुझे ध्यान करतात , तेच तुझ्या दैवी शक्तीच्या कृपेला पात्र होत असतात .

              व्यवहार व परमार्थाच्या काहुरात गुरफटून गेल्यावर कमालीचा प्रयत्न करुन शेवटी मौन होऊन तुजकडे विरही वृत्तीने पाहतात , तेच तुझ्या कृपेला पात्र होतात .

              आपल्या सत् कर्तव्याने व आत्मशक्तीने वर चढत चढत जे धीर पुरुष आपली बुद्धी स्तब्ध ( स्थित ) करुन सोडतात , तेच तुझ्या कृपेला पात्र होतात .

               दु : खद प्रसंगांनी गहिवरुन जाऊन आपला सत्य मार्ग न सोडता , मरणालाहि आपली ध्येय - मुद्रा दाखवितात , तेच पुरुष तुझ्या कृपेला  पात्र होतात . सर्व ऐहिक उत्कर्षकारक गुणांनी गुणवंत बनून आपली . वृत्ति अनासक्त नि अध्यात्माकरिता मोकळी ठेवतात , तेच पुरुष तुझ्या कृपेला पात्र होतात .

( श्रीगुरुदेव - जून १९४३)