प्रार्थनेची पार्श्वभूमि
       
                     अनुरुप वातावरण

              प्रिय मित्रांनो । विचाराला अनुरूप अशी भोवतालीन परिस्थिती असल्याशिवाय विचारांची वाढ विचार रूपातसुद्धा होऊ शकत नाही . कारण कोणतेहि विचार हे त्या त्या काळाच्या परिस्थितीनेच बनलेले असू शकतात नि त्या विचाराला उन्नत करणारे दुसरे विचार वेगांत आणण्याकरिता देखील योग्य परिस्थितीच असावी लागते म्हणजे श्रीमंती किवा गरीबी असावी लागते असे नसुन विचाराला पोषक अशी संगति किवा डोळ्यासमोर दिसणारी चित्रे अथवा तेथील एकंदरीत सर्वच रागरंग अनुरूप असावा लागतो . विचार एक व सभोवारची परिस्थिती वेगळीच असे जर असेल तर परस्परांतच ओढाताण होऊन विचाराची पुढची वाढ बंद होत असते . जी परिस्थिती समोर असेल तशी हवा वृत्तीत खेळू लागते नि ज्या परिस्थितीचा जोर विचारापेक्षा अधिक असेल तसेच विचार बनण्याला सुरवात होत असते .
                    बंधूनो ! वास्तविक जगात असा एकहि मनुष्य नसेल की जो कुणाच्या तरी संसर्गाने उन्नत किंवा अवनत झाला नसेल . जो जो . म्हणून मनुष्य आपल्याला दिसत असेल तो समाजनिरपेक्ष नसून त्याचे विचार दुसऱ्या कुणाच्या तरी विचारांचेच द्योतक होत . तात्पर्य एवढेच की जे विचार आपणांस कायम ठेवावयाचे असतील त्याच विचारांची परिस्थिती म्हणून एकूण वातावरण ठेवावयास पाहिजे व वाटेल ते करून मनुष्य ते निर्माण करु शकतो . वैषयिक सुखेच्छा वाढविणाऱ्या रंगमहालात किंवा ज्या स्थळी शृंगारीक चित्रे अथवा भोगविलासाचे वातावरण असेल अशा स्थळी एखाद्याने जर उदासतेचा विचार करून वैराग्य प्राप्त करतो म्हटले तर हजारांत विरळाच तसा यशस्वी साधक सापडावयाचा . किंबहना जो सांपडेल त्याला तेथे भोगविलास आहेत की नाहीत याची


कल्पनाहि राहात नसावी . एरवी इतर सर्व त्या भोगात गांगरून गेलेलेच मिळावयाचे . त्याचप्रमाणे एखाद्या स्मशानासारख्या स्थानी जाऊन कोणी जर भोगविलासाच्या रंगाचा विचार करील किंवा कुविचाराचा अतिरेक करतो म्हणेल तर तसा पुरुष विरळाच सापडणार की जो अति धुंद झालेला असेल ! पण सर्वसाधारण मनुष्याच्या मनात तर समोंरची परिस्थिती जशी असेल तसेच विचार वाढू लागत असतात हा नेहमीचा अनुभव सर्वांनाच आहे . तेव्हा आपणाला कोणत्या विचारांची धारणा तयार करावयाची आहे हे लक्षात आणून तेच विचार अधिक बळावण्याकरिता प्रत्येक अभ्यासूने विचाराप्रमाणेच , विचार करण्याच्या जागेचे वातावरण अनुरुप असे निर्माण करावयास पाहिजे .

             सामुदायिक प्रार्थना व सात्विक शिस्त

               प्रिय मित्रांनो ! मला या सर्व विवेचनातून असे सांगावयाचे आहे की , धार्मिक विचारांच्या स्थळी तेथील हवामानापासून तेथील बिछायतीपासून तेथे असलेल्या फोटोपासून , तेथे बसणाऱ्या लोकांच्या
ओळीतील शिस्तीपासूनसुद्धा आपल्याला खबरदारी घेतली म्हणजे पुढच्या कार्याला व विचाराला ते पोषक होत असते . आपली सामुदायिक प्रार्थना जर आपण तेथे गादी तकिये टाकून करु लागलो तर सहजच लोक तक्क्याशी रेटून व पाय जरा लांब करून प्रार्थना करु लागतील व कुणी म्हटलेहि की अहो ! सरळ बसाना तर ते म्हणतील ! अहो ! मनातून तर चाललेच आहे ना नामस्मरण !  मग असे आणि तसे बसण्याचे काय कारण ? यासाठी तेथे तशीच बिछायत करावी की त्यांना तशी भोगवासना वाढवावयास जागाच उरणार नाही व जिकडे पहावे तिकडे गंभीर वातावरणच दिसून येईल . बसणाऱ्या लोकांची प्रशांत भाविक मनोवृत्ति व लहानमोठेपणाचा भाव विसरुन अत्यंत विनम्रतेने आपल्या रांगेत मोकळ्या ओळींनी बसण्याची पद्धति जेथे प्रकाशही उग्रता दाखवू शकत नाही असे प्रशात स्थळ व ज्या ठिकाणी पक्षाचांंहि आवाज नाही


नि अगदी लहानलहान मुलेहि स्थिर चित्ताने बसले आहेत असे गंभीर वातावरण; हे पाहून आपोआपच वृत्तीत सात्विकता येऊ लागेल व तेथे केलेली प्रार्थना मनाला क्षणभर तरी स्थिर करील, तसेच तेथील बोधमय विचारांचा परिणाम वृत्तीवर होऊन आपल्या धारणाशक्तीला दृढ करण्याची ताकद निर्माण होईल.
    
               वास्तविक पाहता याकरिताच मंदिराची योजना पूर्वीच्या संतमहंतांनी केलेली होती. पण त्यात विकृत रुढि शिरल्यामुळे आजकालची मंदिरे म्हणजे जणू व्यापाऱ्यांची बसावयाची बैठकच होऊन बसली आहे आणि म्हणूनच मी मैदानात अत्यंत शुद्ध वातावरण व रमणीय सात्विकता जेथे नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमतेने का होईना मिळेल अशी जागा तयार करून तीत सामुदायिक प्रार्थना करण्याचे निश्चित केले आहे. अर्थात प्रार्थनेच्या महत्वाएवढेच तेथील स्थिस्तीला स्वच्छतेला, गांभीर्याला व पद्धतशिरपणाला महत्व दिले आहे. या सर्व  विचारांना प्रत्येकाने आपल्या प्रार्थनेच्या स्थानी महत्व दिल्यानंतरच प्रार्थनेचा खरा कार्यक्रम सुरु होणार आहे आणि ही अनुक्रमपद्धतीच 
प्रार्थनेचे वास्तविक महत्व काय ते आपोआप सांगणार आहे. अर्थात अशा स्थळी प्रार्थनेला येणाऱ्या प्रत्येक साधकाचे विचार प्रार्थनेच्या  तत्वानुरूप उन्नत होत जातीलच हे नैसर्गिकच आहे.

                बंधूनो! तुम्हास जेवढी प्रार्थनेची जरुरी, तेवढीच व्यवस्थित राहणीची, अंतर्बाह्य शुद्धतेची व तेजस्वी वृत्तिचीही आवश्यकता आहे, हे विसरु नका.

(श्रीगुरुदेव-एप्रिल १९४४)