सामुदायिक प्रार्थनेचे तात्विक स्वरुप 


  जयन्त्या पर्वे महोत्सव । असंख्यात वाढविती वैभव
   जे देखता स्वर्गीचे देव । तटस्थ होती ।। - श्री समथ

               प्रार्थना ही कुणा करिता नि का ? 

               प्रिय वाचकांनो ! आज जरी सामुदायिक प्रार्थने चा प्रारंभदिन म्हणून आम्ही कार्तिक - पौर्णिमेला प्रार्थना दिन  या नावाने संबोधित असलो आणि या उत्सववावर विशेष भर देत असलो तरी , प्रार्थना व
प्रार्थनेचा आराध्य देव काही नव्याने निर्माण केला गेला नाही . देवाप्रमाणेच । प्रार्थनेचा मार्गहि सनातन आहे आणि त्याच पौर्णिमेलगतची एकादशी  प्रबोधिनी  म्हणजे देवाचा जागृतिदिन  या नावाने पूर्वी पासून ओळखली जात आहे , त्यातहि प्रार्थनेचे महत्त्वच दर्शविले आहे . अर्थात हा प्रार्थनादिनाचा उत्सव या दृष्टीने हि नवीन असा नाही !

              प्रार्थना ही  देवाला जागृत करण्याकरिता उपयोजिली जात होती असे पुरणांतरी अनेक दाखले आहे . वास्तवकि सदैव जागृत असणाऱ्या देवाला जागवण्यासाठी प्रार्थना नाही , तर आपल्या मधील सुप्त देवत्व जागवण्यासाठीच तिचा उपयोग आहे . थोडक्यात म्हणजे  प्रार्थना हाच देव असून त्याच्या संसर्गाने जीवहि देवपणास प्राप्त होतो - आपल्या मुळे पदी आरुढ होतो . यथार्थ प्रार्थना व प्रार्थनेचा देव हे मुळात भिन्न असूच शकत नाहीत व प्रार्थना ही प्रार्थीपणात राहूहि शकत नाही .

                   प्रार्थना कुणी , कुणाची व कशाकरिता करावयाची  याविषयी विचारांती दिसून येते की , हे प्रार्थनेचे बंड देवाकरिता नसून , आम्ही देवा बद्दल आमच्यात जो अविश्वास उत्पन्न करुन घेतला आहे आणि त्याचा परिणाम आमच्या वृत्तीवर जो भ्रमात्मक असा झाला आहे .त्यांचा परिहार करण्याकरिताच प्रार्थना आहे . तो दुष्परिणामी भ्रम एका मोठ्या सात्विक परिणामाने काढून टाकावा , या करिताच ही प्रार्थनेची योजना थोरांनी करुन ठेविली आहे.


       अज्ञानी व तत्वज्ञानी यांना  एकपंक्ती लाभ 

                रजूवर सापाचा भास व्हावा आणि त्याच्या परिणामाने अंगावर शहारे यावेत , अंग थरकापू लागावे भीतीने बोबडी वळावी इत्यादी प्रकार हे एका विकृत भावनेनेच होतात , अर्थात त्यांचा नाश दुसन्या कोणत्याहि औषधोपायांनी होणे शक्य नसते . त्या करिता एकच उपाय करावयाचा असतो . तो म्हणजे , दिवा आणून  ती दोरीच आहे या विषयीची खात्री - ज्ञानयुक्त विश्वास - प्राप्त करुन घेणे . परंतु एवढ्यानेच एकदम आटोपते असे नाही . त्याला पहिल्या परिणामाच्या इतकाच हा विवेकाचा परिणामहि आपल्या वृत्तीवर दृढ करावयास पाहिजे असते . त्याला पुनःपुन्हा आपल्या वृत्तीस समजवावयाचे असते की आपण उगीच भ्रमलो , तो साप नव्हता - दोरीवर सापाचा भास झाला होता तो ! या स्थितीत काही वेळ गेला म्हणजे त्याची भिती व तज्जन्य परिणाम नष्ट होऊन तो पूर्ववत् ( आत्मस्थित ) होतो . या दृष्टांताप्रमाणेच आमचीहि स्थिति आहे . आमच्या वृत्तीवर मी देह आहे , देहाचा व्यवहार हे माझे जीवन आहे  अशा समजुतीचा अज्ञानामुळे जो पगडा बसला आहे नि अनंत दु:खक्लेशांना कारण झाला आहे , तो समूळ काढून टाकण्यासाठी आम्हास यथार्थ ज्ञान हवे आहे आणि ते मिळविण्यासाठी तसेच मिळाल्यावरहि रुजविण्यासाठी व टिकविण्यासाठीसुद्धा प्रार्थनेची आवश्यकता आहे . जगास जड , भिन्न व भोग्य किंवा त्याज्य समजल्याने आमच्यात जी एकांगी किंवा संकुचित वृत्ति निर्माण झाली आहे आणि रागद्वेषास वाढवून जगात कोलाहल माजविण्यास कारण झाली आहे . तिचे उच्चाटन देखील केवळ ज्ञानाने होणार नाही , तर त्यासाठी  जे जे दृष्टि दिसे ते ते हरिरुप किंवा  सियाराममय सब जग जानी हे तत्त्वानुसंधान दृढ झाले पाहिजे ; अर्थात हा रज्जुसर्पाप्रमाणे भासलेला जगदभ्रम नाहीसा करण्यासाठीहि महत्त्वाचा उपयोग आहे यात शंका नाही .

                    प्रभूपेक्षा प्रार्थनाच थोर 

             सखोल दृष्टीने विचार करिता , प्रार्थना ही सर्व सामान्य


लोकापासून तो तत्त्वज पुरुषापर्यंत सर्वांंनाच आवश्यक आहे असे दिसून येते . प्रार्थना ही देवाकरिता करावयाची नसून आपल्याच अंत:शुद्धीकरिता आत्मविकासाकरिता व आपले देवत्व प्रकट आणि प्रस्थापित करण्या करिता करावयाची असते . देवापाशी मोक्षाचे गाठोडे नाही परंतु प्रार्थना मात्र त्याची प्राप्ती करून देऊ शकते आणि तात्विक प्रार्थनेने ज्याचा अंगीकार केला नाही त्यास प्रत्यक्ष परमात्माहि तारु शकत नाही देव दुर्जनाचा नाश करण्यासाठी अवतार घेईल परंतु प्रार्थना ही दुष्ट व पापी लोकांचा नाश न करिता त्यांचे दर्जनत्व नष्ट करून त्यानाहि देवत्व देऊ शकते . इत्यादी गोष्टीचा विचार करूनच संतांनी  राम न सकहि नामगुण गाई  किंवा  तुझे भक्तिसुख तुज नाही ठावे  म्हणून रामापेक्षा नाम अर्थात देवापेक्षा प्रार्थनाच श्रेष्ठ असल्याची ग्वाही दिली आहे आणि बहुदा प्रत्येक धर्मप्रवर्तकांनी आणि धर्मग्रंथांनी प्रार्थनेवर भर दिल्याचे दिसून येत आहे ! तेव्हा या प्रार्थनेच्याच आधारे आजहि आम्हास आमची उन्नती का नाही करुन घेता येणार ?

              समाजहितार्थ देवा - भावात परिवर्तन

              रोग्यांच्या रोगांचा जसा एकच नियम किंवा प्रकार नाही, तद्वतच मनुष्य - समाजाच्या प्रवृत्तिचेही एकच स्वरुप नाही . प्रकृतीत ज्या ज्या योजनेने  समत्व  निर्माण होईल ती ती योजना त्या त्या काळी श्रेष्ठ होय हा आरोग्य शाखाचा सिद्धान्तच समाज स्वास्थासहि लागू आहे . देशकाल विचाराने एके वेळी जी मनोवृत्ती समाजात निर्माण करणे अगत्याचे ठरते तीच दुसरे वेळी  समता घालविणारी , एकांगी किंवा बाधक म्हणून नाहीशी करणे अथवा बदलणे प्राप्त होते . अर्थात त्या त्या कालानुसार देवाची कल्पना व प्रार्थनेची प्रक्रिया यात देखील योग्य परिवर्तन करावेच लागते , ही गोष्ट आपणास , वेदकाळापासून आतापर्यंत मनुष्य समाजाला किती वेळा देव व प्रार्थनेची पद्धति बदलावी लागली याचे इतिहासावरुन  दिसून येण्यासारखी आहे . अडाणी लोक जरी ही गोष्ट जाणू शकत 


नसले तरी , तत्वज्ञ लोकांना व सामाजिक जीवनाची घडी कालानुरूप बदलविण्याचा प्रयत्न किंवा अभ्यास करणाऱ्या पुरुषांना हे केव्हाच माहित झालेले असते की , प्रसंगानुसार कधी अरुणवरुणाला , कधी नदी पर्वताला , कधी अग्नि - सुर्याला , कधी इंद्रनागेंद्राला आणि कधी मासा कासव - डुक्कर अथवा खांब त्यातून गुरगुरणाऱ्या दैवी शक्तिला सुद्धा देव मानावे लागले व तदनुसार प्रार्थनेचे बाह्यरुप देखील बदलावे लागले .

                   आजवर देव बदलत आले व त्यांचे साधनपंथहि बदलले याचे एकच कारण आहे की , समाजाला ज्या काळी ज्या शक्तिची किंवा ज्या आदर्शाची जरुर होती , ज्या प्रकारचे कर्तव्य त्याजकडून करुन घेणे आवश्यक होते व ज्यायोगे त्याची प्रगति होणे स्वाभाविक होते , तसाच देव व त्याची प्रार्थना लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न महापुरुषांनी त्या काळी केलेला आहे . ज्यांची कल्पनाहि करता येणे कठीण , असे कितीतरी देव त्यांनी वेळोवेळी लोकांसमोर मांडले आहेत . तेहतीस कोटी देवांच्या नावाची यादी कोठे सापडू शकेल काय ? तुम्ही म्हणाल ते तर भारत वर्षातील जनतेलाच उद्देशून म्हटले आहे . असेल कदाचित पण विस्तीर्ण आणि भावनाशील अशा या भारतवर्शात वेदकालापासून आतापर्यंतच्या निरवधि कालात , किती देव मानले गेले असतील त्यांचे मोजमाप तरी करता येईल काय ? ते काही असले तरी त्यातून एकाच सुत्राकडे मला आपले लक्ष वेधावयाचे आहे की , समाजाला प्रसंगानूसार जसे वळण द्यावयाचे होते तसेच हे सर्व देव प्रस्थापित करण्यात आले आहेत ; पुढे त्याचा काही विपर्यास झाला असल्यास तो प्रश्न वेगळा !

           भक्तांच्या विभक्ततेवर प्रार्थनेचा प्रयोग
   
             बंधूनो ! प्राचिन काळी कोणतेहि देव कोठेहि राहोत परंतु त्यांचे सख्य कायम राहत होते आणि त्यांची सभासंमेलनेहि होत होती . परंतु आजच्या एकण देवगणात व भक्तजनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की , दष्ट माणसे सुद्धा कधीकाळी  जीवश्च कंठश्च  मित्र


बनून ऐक्याने नांदू शकतील असंख्य ठगांची एकजुट कोणासहि नष्ट करता येणार नाही इतकी मजबूत राहू शकेल , परंतु या सांप्रदायिक लोकांचे विवेकशाली व सत्वशील देव मात्र मुळीच एक होऊ शकणार नाहीत आणि हे विश्वव्यापी प्रेमाचा व एक सत् तत्वाचा पाठ पढणारे भक्तहि एकत्र बसू शकणार नाहीत . यांचे मुख्य कारण हेच आहे की , त्यांच्या समोर खऱ्या व्यापकतेचा आदर्श नाही , सामाजिक जीवनाची जबाबदारी त्यांच्या समोर एकांगी पारमार्थिकतेपुढे त्यांना महत्वाची वाटत नाही व सामाजिक उत्कर्षासाठी आज काय करावयास हवे याची त्यांना जाणीव नाही . संघटित झाल्याने आपले देव वाटतील , महंत कोपतील आणि मंत्र निःसत्व होतील  असा विपरीत भाव त्यांच्यात दृढ झाला आहे . हा सर्व परिणाम घालवण्याकरिता , आपापल्या ठिकाणी प्रार्थना किंवा अन्य साधने करीत अथवा एकेका विशिष्ट पुरुषाच्या ज्ञानाचे अनुसंधान करीत बसून परस्परांविषयी आत्मियता वाढविता येईल हे शक्य दिसत नाही म्हणूनच सामुदायिक प्रार्थनेच्या पटांगणांत (मैदानावर) सर्वांच्या इष्ट देवता भावनारुपाने बसवून , त्यांच्या भक्तगणांना ही गोष्ट कळवणे आवश्यक आहे की ,या अनेक देवांच्या भावनामूर्तीना एकाच ठिकाणी विलीन करून त्यापासून (किंवा त्यांचे अधिष्ठानस्वरूप म्हणून) जो कोणी मोठा देव प्रगट होईल त्याचीच आपणाला आवश्यकता आहे आणि  ब्रम्हा विष्णु हरिहर , हे जयाचे आज्ञाधार अशा देवाधिदेवास प्रसन्न करावयाचे तर त्याकरिता प्रार्थना ही सर्वात्मकच पाहीजे आहे : अर्थात् ती त्यांच्या कोणत्या तरी एका विशिष्ट शक्तिदर्शक व गुणवाचक नावारुपास किंवा मूर्तीस कवटाळून बसलेली असू नये .

                   हे सर्व लक्षात घेऊनच सेवामंडळा ची सामुदायिक प्रार्थना बनविण्यात आली आहे व तिचा परिणाम समाजावर कार्यरुपाने विशेष व्हावा म्हणून हा प्रार्थना - दिन  निश्चित केलेला आहे . पूर्वी प्रार्थना नव्हती असा त्याचा अर्थ नसून , पूर्वकालीन प्रार्थनापद्धति बहिरंगतः निराळ्या स्वरुपाची होती तिलाच आता कार्यानुरुप काही वेगळे स्वरुप


देण्यात आले आहे उपास्यापासून आसनापर्यंत व मागणीपासून शिस्तीपर्यंत धोरणानरुप नि कालानुरुप बाह्यदर्शनी बदल करण्यात आला आहे . या प्रार्थनेचे बीज आपणास  समानी व आकूतिः  सर्वेऽपि सुखिन सन्तु  किंवा  सहवीर्य करवावहै  इत्यादी ऋषिकालीन प्रार्थनातून आढळून येऊ शकेल व पूर्वीच्या भक्तांच्या धारणेतहि त्याचा सुगावा लागेल .

        आमचा अपेक्षित ईश्वर व्यक्त केव्हा होणार ?

             प्रिय सज्जनवृंद ! आपणाला आज कोणता देव आणि त्याचा कोणता पंथ वा मार्ग आवडतो हे निवडता येत असेलच ना ? अहो , देवाची कल्पना आपण सामाजिक दृष्ट्या जी समोर ठेवली आहे ती म्हणजे  जो सर्वांना सुख व शांति देणारा , अभ्युदयासह निःश्रेयसाकडे नेणारा , मनुष्यमात्रास आरोग्यापासून तो जागतिक कर्तव्यापर्यंतचे ज्ञान देणारा आणि आत्मयोगाकडे नेणारा , समाजावर आघात करणाऱ्या व सर्वाच्या नीतिसुखाच्या आड येणाऱ्या अन्यायी दुष्ट लोकांचा नाश करणारा व मनुष्यसमाजास मानवतेच्या तराजूवर तोलून धरणारा , लहानापासून थोरापर्यंत सर्वांस समबुद्धीने पाहणारा व गुणकर्मानुरूप योग्य फळ देणारा आणि हे सर्व करुनहि आपले व्यापकत्व व अमरत्व न विसरणारा तोच आमचा देव  अशाच स्वरुपाची आहेना ? मग त्याच्या प्राप्तीचा मार्गही आपणास शोधता येणार नाही का ? आपल्या वृत्तीवर व्यक्तित्वाचे जे स्थायी परिणाम झाले आहेत त्यामुळे वृत्ती आंधळी होऊन दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा विचार अवलोकन करण्याची शक्ति तिच्यात राहिली नाही . ती निस्तेज नि निर्वी होऊन प्रवाहपतिताप्रमाणे वाहत जात आहे तिला सामुदायिक भावनेचा आधार दिला . आत्मवत सर्वभूतेषु  च्या ज्ञानांजनाने डोळस केले आणि न्यायबुद्धिपूर्वक अभ्युदय निःश्रेयस साधण्याचा मार्ग दाखविला तर तिला आपली ध्येयमूर्ति प्रत्यक्षात आणता येणार नाही का ? क्षद्र व्यक्ति भाव व परहितनाशक दुष्ट स्वार्थबुद्धि नष्ट होऊन मनुष्य हा सर्वच गणांनी सौंदर्यवान व्हावा आणि ऐहिक व


पारमार्थिक विषयातहि दुसऱ्यास विघातक न होईल असेच आचरण त्याने करावे ; नि असे करणाराच खरा भक्तिवान होऊ शकतो असेच सर्वांचे मतआहेना ? आणि त्याकरिताच ही उपासनेची शाळा आहे ? तसे नसेल तर मग ही आहे तरी कशाकरिता नि देव मांडण्यात व भक्ति करण्यात दुसरा हेतु तरी कोणता ?

        संतांचा मायावाद कर्तव्य - विरोधी नाही ! 

              शांतिरूपत्व न्यायमूर्ति परमेश्वरास समाजात अवतीर्ण करण्याकरिता सर्व धर्म - संप्रदाय व उपासनादि मार्ग आहेत . हे सर्वत्र होऊन गेलेल्या संतांच्या व देवाच्या आचरणावरुन सुद्धा दिसून आले आहे . धर्माचा किंवा तत्वज्ञानाचा अर्थ ग्रंथावरुन लावण्यापेक्षा सर्वांच्या हृदयांत घर करून बसलेल्या सर्व श्रेष्ठ महापुरुषांच्या कार्यप्रवृत्तीवरुन लावणे अधिक सोयीचे आहे . त्यांनी  जगत मिथ्या  म्हटले असले तरी अनावश्यक आसंक्ति नाहीशी करून उत्तम काम करण्याला तयार व्हा असाच त्याचा भावार्थ आहे ना ?
तसा नसता तर त्यांनी स्वतः लोककल्याणासाठी इतक्या धडपड़ी का केल्या असत्या ? शुकाने भागवत का सांगितले असते आणि शंकराचार्यांनी अथवा रामदासांनी मठ कशाला स्थापन केले असते ? श्रीगुरुदेव ज्ञानेश्वरांनी  विश्वचि माझे घर  म्हणून संतसंघटनेचे जे महत्कार्य केले ते काय  जग मिथ्या म्हणून टाकाऊ समजून ? तत्वज्ञ संतांनी  जग मिथ्या  म्हटले म्हणून आपण डोळे लावून बसावे , खाणेपिणे व सर्व व्यवहारहि मिथ्यास म्हणून भोजनादि कार्यक्रम सोडून द्यावेत आणि प्राणांचे विसर्जन करून  मरण ती मुक्ति मिळवावी , असा का त्याचा अर्थ होतो ? कदापि नाही ! आमची वृत्ति सत्तत्वावरून तसेच सत्यत्वावरून ढासळू नये , ती व्यापकत्वाला विसरुन संकुचित स्वार्थाने आंधळी बनून मूळच्या समत्वाला आचवू नये अर्थात त्याचा परिणाम दसऱ्यावर अन्याय  करण्यात होऊ नये , तसेच नामरुपाच्या आसक्तीमुळे स्वत:चे स्वत्व


गमावले जाऊ नये अर्थात आत्म्याच्या अमरत्वाचे भान असावे , हाच ना ते ज्ञान सांगण्यातील उद्देश ?

               ज्ञानाने सृष्टि बदलते की दृष्टि ?

             एरव्ही काय  जग मिथ्या  म्हटल्याने ते नाश पावते की  सत्य  म्हटल्याने त्यात परिवर्तन होण्याचे थांबते ? आत्मा सत्य  म्हटल्याने का कामे चालतात नि  शरीर सत्य  म्हटल्याने का नुसते  जड च कार्य करु शकते ? होते तरी काय ? एवढेच ना की , अमर व नाशमान वस्तूंचे ज्ञान होऊन पुरुष त्यांचा साक्षी होतो व सत्यतत्वावर स्थिर राहून त्यामुळे विपरीत परिणामाला प्राप्त होत नाही एकच नितांत गांभीर्य धारण करून जगास निसर्ग समजून लीलाविहार करतो , काय खेळायचे तसे खेळतो व त्याकरिता पुन्हा येतो . अर्थात तो  परिणामी  ( विकारवश , परोक्षज्ञानी ) असला तर दुःख भोगतो व ज्ञानारुढ असला तर सत्य स्वानंदात मस्त असतो आणि  तयाच्या लीलेमाजी नीति , जियाली दिसे  असे मर्मज्ञांना आढळून येते . अर्थात ब्रम्हसत्य जगन्मिथ्या  हे ज्ञान सृष्टीत बदल करण्याकरिता नसून वृत्तीत बदल करण्याकरिताच आहे . तसे म्हटल्याने सृष्टीचे स्वभाव कधी बदलतात किंवा कोणी बदलले आहेत काय ? समजणारे सुखी झाले असतील , बदलणारे पुढे गेले असतील , पण सृष्टि ज्या क्रमाने चालली आहे त्या तिच्या क्रमात कधी खंड पडला नाही तिने आपल्या ठरीव गतीशिवाय स्वतात बदल केला असे कधीहि झाले नाही . सष्टीचा स्वभाव आणि जीवांचे कर्तव्य यांचे यथार्थज्ञान पुरुषात नेहमी जागृत रहावे . या शिक्षणाची प्रार्थना  ही शाळा आहे असे मी समजतो . परंतु या शाळेत बसण्याचे बाबतीत आम्ही इतके उदासीन वा बुद्धिहीन आहोत की , जन्मचे जन्म  परिणामी बनून दु:खे भोगीत असताहि जीवास त्याचे ज्ञान होत नाही , किंबहुना प्रेमहि वाटत नाही . ते प्रेम लोकहदयात उत्पन्न व्हावे नि ते ज्ञान परिणामकारी बनावे याकरिताच अशा प्रकारचे उत्सव , नित्यनैमित्तिक कर्मे , तीर्थग्रंथ व जयन्ती-पुण्यतिथी


आदि स्मृतिदिन यांची योजना श्रेष्ठांनी करुन ठेवलेली आहे . ज्ञान सर्वाठायी आहे हे साच । भक्तिविण तेंच ब्रम्ह नोहे ।। ( तुका ) हाच त्यांचा भावार्थ !

         प्रार्थनेचा मूलोद्देश - व तत्वनिष्ठ परिवर्तन

              वास्तविक खऱ्या देवात कधीहि बदल होत नाही ; आणि प्रार्थना हा काही देवासाठी आपल्यावर लादलेला कोणी परका विषय नाही . देवाकरिता प्रार्थना मुळीच नाही व प्रार्थना ऐकण्याकरिता देवहि नाही . आमचेच स्वभाव सृष्टीच्या नियमांना अनुसरून राहावेत म्हणून व आमच्यातील सुप्त शक्ति नि खरी सत्ता प्रगट व्हावी म्हणून सर्वश्रेष्ठ आदर्शाची प्रार्थना आम्हास करावयाची आहे . ईश्वराच्या सत्तेने जे आमच्यात प्रगट झाले व ज्यांनी त्याच्या एकरूप सत्तेचा मार्ग दाखविला , त्यांना देवत्व देऊन ( वा त्यांचे देवत्व जाणून ) आम्हाला त्यांची प्रार्थना करणे आहे .

                 ही प्रार्थना कधी अग्नि प्रज्वलित करून करण्यात आली आहे तर कधी आत्मयोगाने केली गेली आहे , कंधी पंचतत्वांचा आश्रय घेऊन तर कधी रामकृष्णादिकांची रुपे दृष्टीपुढे ठेवून ती करण्यात आली आहे कधी एकेश्वरभावनेने तर कधी अनेक देवांच्या रुपांनी तिचा अंगीकार केला आहे . परंतु या सर्वांच्या मुळाशी अंतिम हेतु हाच की प्रकृतीच्या
या पसाऱ्याचे व जीवाचे मूलज्ञान पुरुषाला व्हावे व त्याला हा सर्व संसार खेळण्याप्रमाणे वाटावा . अर्थात हा हेतु देशकालादिभेदाचा विचार करून ज्या ज्या मार्गाने सफल करता येईल तो तो मार्ग श्रेष्ठांनी वेळोवेळी प्रचलित केला आहे . हे सांस्कृतिक इतिहासावरून दिसून येते . 

            सामुदायिक प्रार्थनेचा सर्वकष दृष्टिकोण

            बंधूनो ! आजवरचा परंपरानुक्रम लक्षात घेता , आजच्या परिस्थितीस अनुसरून , लोकांच्या पंथाभिमानाच्या व जातीयतेच्या भावना


एकमुखी करण्याकरिता सामुदायिक प्रार्थनेशिवाय गत्यंतर नाही व ते जान सुगमपणे सोप्या पद्धतीने लोकांना दुसऱ्या प्रकारे आपण देऊ शकणार नाही , अस वाटते ना तुम्हाला ? तुम्हाला जर आपला अधिक विकास करून घ्यावयाचा असेल तर , या  सामुदायिक प्रार्थन च्या मुळाशी जी दिशा व जी तत्वे अवलंबिली आहेत त्यांचा स्वीकार या ना - त्या रुपात करावाच लागेल ; अर्थात दृष्टीकोण हाच राखावा लागेल मग ते कार्य तुम्ही प्रार्थना या नावाने विभुषित करा अथवा त्याचा नामनिर्देश न करिताच तसा परिणाम करू लागा , पण क्रम मात्र बदलता येणे शक्य नाही . आजच्या परिस्थितीत जनतेत खरे जीवन नि धर्मतज निर्माण करावयाचे तर , सर्वसाधारण अशा भूमिकेवरच सर्वांना एकत्र निर्माण करावया आणून , त्यांच्या हृदयातील भावनांच्या तारा हळुवारपणे छेडीत त्यांच्यात ससंवादित्व निर्माण केले पाहिजे . त्यांच्या सदभावनेच्या पातळीवरच सर्व कार्याची बैठक पक्की केली पाहिजे . जी काही कोमल अथवा कठोर भावना त्यांच्यात निर्माण करावयाची असेल ती या मार्गानेच आज सुगमपणे अभिव्यक्त करता येईल आणि तीच अधिक परिणामकारक व दृढमूल होईल . हे सर्व विचार समोर ठेवूनच ही  सामुदायिक प्रार्थने ची योजना पुढे मांडण्यात आली आहे . यात , कोणताहि वेदान्तवाद आपले . मत अलग राखु शकत नाही . कोणताहि पंथ  आपण भिन्न आहो असे प्रतिपादू शकत नाही आणि कोणताही सुधारणावाद किंवा सुधारक राष्ट्र आपली बाजू सरसावून दाखवू शकत नाही . कारण या योजनेचा पाया जगाच्या मूलाधारावर - विश्वाच्या अधिष्ठानरुप तत्वावर आधारलेला असून सर्वांच्या हृदयातील साररुप भावनासच आत्मियतेने त्यात गुंफण्यात आले आहे . याप्रमाणे तत्वज्ञानाच्या अध्यात्मवादाच्या व उपासना वृत्तीच्या कसोटीवरच केवळ कसलेली ही योजना नाही , तर समाजशास्त्राच्या व सुधारणावादी बुद्धीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचेहि सामथ्र्य तिच्यात आहे . ती सर्वांगीण उन्नतीच्या शिक्षणाचे माध्यम आहे , हे विचारांती कोणाहि तज्ज्ञास पटेल इतकी ती खंबीर व गंभीर आहे. 


          तौलनिकदृष्ट्या मौलिक भेदावर प्रकाश

            जगातील प्रमुख धर्मापैकी काही धर्मात किंवा धर्मपंथात  सामुदायिक प्रार्थने  चा जो उपक्रम केला गेला आहे तो पूर्णतया याच तत्वावर आधारलेला किंवा ही तत्वे जाणून केलेला जरी नसला , तरी ते आमच्या तत्वाचे प्रचारक आहेत असेच मी म्हणेन .  तुम्ही सामुदायिक प्रार्थना का करिता ? असा प्रश्न जर त्यांना केला तर ते योग्य कारण दाखवू शकतीलच असे नाही . कित्येक  पूर्वजांच्या परंपरे  कडे बोट दाखवून मोकळे होतील , कित्येक  पापनिष्कृतीसाठी क्षमायाचने ची आवश्यकता पटवितील नि कित्येक फार तर  एकजातीयता किंवा एकराष्ट्रीयता याचे स्मरण करुन  संघटनेची शक्ति दाखवितील .

               परंतु सामुदायिक प्रार्थनेचे तत्व वास्तविक याहूनहि अधिक उच्च , व्यापक व गंभीर आहे ; मूलग्राही व सर्वस्पर्शी आहे ! सामुदायिक प्रार्थनेचे काही अंशी इष्ट परिणाम त्यांचेवर झाले असले तरी तिचे मूलतत्व त्यांच्या हाती अजून देखील आलेले दिसत नाही . तसे झाले असते तर मूठभर लोकांच्या एका राष्ट्राकरिता कोट्यावधि लोकांचे प्राणे घ्यावेत व तेहि न्यायासाठी नव्हेत तर फक्त स्वार्थासाठी घ्यावेत असे त्यांना कधीहि वाटले नसते ; त्यांनी सर्व शोधांचा , सुधारणांचा व शास्त्रीय प्रगतीचा ओघ मानवजातीच्या संहाराकडे न वळविता सर्वांच्या सुखाची तरतूद केली असती ; परंतु तसे आढळत नाही . याचे कारण हेच आहे की त्यांनी सामुदायिक प्रार्थना केली पण ती सामुदायिक प्रार्थनेच्या शुद्ध तत्वानुसार मात्र केली नाही. संघटना वाढवली पण ती अंतशद्धीच्या
पायावर मात्र उभारली नाही . अर्थात ही गोष्टच विश्वात अशांतता - हाहा:कार - माजवण्यास कारण होऊन , त्याच्या मुळाशी असणाऱ्या लोकांवरहि तिची प्रतिक्रिया होणे क्रमप्राप्त आहे . ही अनर्थावहता नष्ट होऊन स्वतः संपूर्ण सुखी , समर्थ व उन्नत व्हावे आणि हे  होणे  जगास ताप देणारे न ठरता शांतीसुख देण्यास कारणीभूत व्हावे या दृष्टीची  सामुदायिक प्रार्थना आमच्या लोकात रुढ व्हावी म्हणूनच आम्ही या


गोष्टीस विचारपूर्वक चालना दिली आहे व त्याच उद्देशाने हा प्रार्थना दिन पाळण्यात येत आहे .

                      पौर्णिमेच्या प्रकाशात

            सर्व लोकांना एकाच विशिष्ट दिवशी , एकाच वेळी , एकाच भावनेने हाक देता यावी व अशा प्रकारे त्या कार्याची जाणीव टिकून रहावी म्हणून , तसेच दैनिक किंवा साप्ताहिक सामुदायिक प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकात प्रतिवर्षी नवा उत्साह निर्माण व्हावा म्हणून  सामुदायिक प्रार्थनादिन  निश्चित करण्यात आला आहे . चंद्र स्वत : पूर्ण असूनहि छायावरणामुळे तो एरव्ही अपूर्ण भासतो आणि पौर्णिमा ( पूर्णिमा ) तिथीस मात्र आपल्या पूर्ण वैभवाने झळकू लागतो हे लक्षात घेऊन , अपूर्ण भासणाऱ्या जीवास आपले पूर्णत्व प्राप्त करून घेण्याचे भान व्हावे म्हणून , पूर्णत्वाकडे नेणाऱ्या या सामुदायिक प्रार्थने चा तोच उत्सवदिन ठरवणे आम्हास योग्य वाटले . शिवाय पूर्ण झालेल्या अनेक महापुरुषांच्या पुण्याईचा दिवस म्हणूनहि पौर्णिमेकडेच दृष्टि वेधल्याशिवाय राहात नाही . श्रीगुरु दत्तात्रेय , त्रिपुरान्तक शिव , सर्वदर्शी व्यास , भक्तवीर हनुमान , महासती सावित्री , योगेश्वर श्रीकृष्ण , मानवधर्मप्रचारक महात्मा कबीर व गुरु नानकदेव , ब्रम्हनिष्ठ संत श्री आडकोजी महाराज इत्यादि  अनेक दिव्य पुरुषांचे स्मरण पौर्णिमेशी निगडित झालेले आहे . तसेच इस्लामधर्मादि अन्यधर्मीय बांधव व प्राचीन - अर्वाचीन कलाप्रेमी लोक सुद्धा चंद्राचे चाहते आहेत . हे सर्व जाणून आणि पंढरपुरातील सर्वपंथीय संतांच्या सम्मेलनाची प्राचिन प्रथा लक्षात घेऊन कार्तिक - पौर्णिमेचाच सोयीस्कर दिवस आम्ही  सामुदायिक प्रार्थना दिन  म्हणून निश्चित केला आहे . तो सज्जनांना आवडेल असा विश्वास वाटतो .

                प्रार्थना - दिनाचा कार्यक्रम 

               बंधूनो ! श्रीगुरुदेव सेवामंडळा च्या अनेक योजनात पंचमहोत्सव 


हि पण एक आवश्यक योजना आहे ; आणि त्या पाच उत्सवात प्रार्थनादिना चा उत्सव प्रमुख आहे - केंद्रस्वरूप आहे ! या उत्सवात आकाशातील तारकांचा मेळावा पृथ्वीवर आणून अर्थात नभामाजी तारांगणे । तैसे लोक - ( समर्थ ) संघटित करुन स्वर्गीचे दिव्यत्व पर्व उतरविण्याचा प्रयत्न आपणास करावयाचा आहे याची जाणीव प्रत्येकास झाली पाहिजे . एक प्रशस्त व प्रशांत स्थळ आणि स्फूर्तिदायक निवांत वेळ ठरवून सर्वांना एका व्यापक अधिष्ठानावर एकत्रित केल्यानेच . शक्य होणार आहे ! त्याकरिता सर्वांनी एकाच गावी जमले पाहिजे असे मुळीच नाही . ज्यांना जसे शक्य असेल त्याप्रमाणे त्यांनी आपापला गावी अत्यंत परिणामकारक रीतिने , सर्वसंग्राहक दृष्टीने , उत्साहवर्धक पद्धतीने तो प्रसंग घडवून आणावा . प्रार्थनादिना निमित्य सर्वांनी आपापले गाव स्वच्छ करून , स्वच्छ कपड्यानिशी सकाळी रामधुन व सायंकाळी नित्याच्या पद्धतीप्रमाणेच सामुदायिक प्रार्थना करावी आणि सर्वांना सेवामंडळा चे तत्वज्ञान समजावून सांगून अत्यंत गंभीरतेने प्रसंग आटोपावा ; हीच माझी सर्वांना सविनय सूचना आहे .

               अखिल विश्वातील माझ्या बंधुभगिनींनो ! तुमच्यात सामुदायिक प्रार्थनेचे शुद्ध तत्व तात्विकतेने नि सक्रियतेने भरावे आणि सर्वांनी ईश्वराच्या उद्देशानुसार परस्पराशी बंधुभावनेने वागून शांतिसुख भोगीत पूर्णत्वाकडे जावे एवढीच माझी हार्दिक इच्छा आणि त्या जगन्नियंत्यास एकमेव प्रार्थना आहे !

( श्रीगुरुदेव - ऑक्टोंबर १९४५ )