सामुदायिक प्रार्थनेचे हृदय आणि उपांगे
( पूर्वार्ध )
सेवामंडळाचे मानसशास्त्र
सर्वांचे जे अधिष्ठान । तेचि माझे रूप पूर्ण - संत नामदेव
संप्रदायांचा सावळा गोंधळ
श्रीगुरुदेव सेवामंडळा ची योजना ज्यांच्या कानी ओझरती पडली असेल , त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे की , आतापर्यंतच्या सांप्रदायिकांनी किंवा पंथवाद्यांनीच तर आमच्या देशात इतका गोंधळ माजवून ठेवला आहे व एवढा कहर केला आहे की त्यामुळे तत्वदर्शन बाजूलाच राहून आपसात भेदविरोध व देवभक्तीच्या नि धर्माच्या नावाखाली आचरट रुढिवाद माजून देश अवनतीला गेला आहे . कन्या कुमारीपासून तो गौरीशंकरापर्यंत अखिल भारतवर्षातील प्रत्येक लहानसान खेड्यातसुद्धा अगणित देवळे निर्मून त्यास करोडो रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या असता आणि त्यांनीहि भागत नाहीसे जाणून गावोगावी व घरोघरी असंख्य मोकळे देव मांडून त्यांची भक्ति मोठ्या जोरजोराने केली जात असताहि अवनतीचा शेवटचा टप्पा गाठण्याची भारतावर पाळी आली आहे . याला आमच्यातील सांप्रदायिक गोंधळ , संकुचित पथभिमान व त्यामुळे परस्परात होणारी फूट ह्या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल . असे असता त्यात श्रीगुरुदेव सेवामंडळ या एका नव्या संप्रदायाची भर घातल्यास आणखी काय हाल होतील ते देवच जाणे ! ही भीती प्रत्येक जाणत्या माणसाला लांबून पाहतांना किंवा दुरून ऐकतांना वाटणे साहजिकच आहे , याची मला पूर्ण जाणीव आहे . परंतु अनेक संप्रदायांना एक करण्याच्या व त्याच्यामधील दोषाभास दूर करुन गुणांचा विकास करण्याच्या भरीस पडणारा उद्योगहि संप्रदायच होत असल्यास त्याला माझा नाईलाज आहे.
तत्वनिष्ठ संप्रदायांची आवश्यकता
आजपर्यंतच्या इतिहासात अनेक प्रसंगी साधुसंतांना त्या त्या काळच्या परिस्थितीस अनुसरून आपले उन्नत विचार वेगवेगळ्या स्वरुपात लोकासमोर मांडावे लागले आहेत ; आणि त्यांचा प्रसार घेऊन महत्वाचे कार्यहि त्या त्या काळी घडून आले आहे , हे कुणाहि तज्ज्ञाला कबूलच करावे लागेल . अर्थात त्या त्या कालखंडात त्या त्या संप्रदायाची बहुदा उपयुक्तच आढळून येते . परंतु ती परिस्थिती बदलून कालांतराने दुसऱ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असता , त्यांनी आपले नियम देशकालपरत्वे बदलावयास पाहिजे होते ते न बदल्यामुळे अर्थात आसक्तीचा स्वभाव तसे करण्यास लवकर धजत नाही म्हणूनच त्या संप्रदायांना एकांगी व विचित्र स्वरूप येत गेले आणि याच कारणाने त्या त्या नूतन परिस्थितीस अनुरूप असे नवनवे संप्रदाय थोरांना निरुपायाने काढावे लागले व संप्रदायांची वृद्धि होत गेली . जुन्या सांप्रदायिकानी जर परिवर्तित परिस्थितीचा विचार करून आपल्या संप्रदायास नवे वळण दिले असते तर आतापर्यंत हजारो भिन्न संप्रदाय दिसलेच नसते . वास्तविक कार्यांचे महत्व साधण्याकरिता कितीही वेळा मंडळ बदलावे लागले , संप्रदायात परिवर्तन करावे लागले , तरी तसे करणेच उचित आहे ; मात्र तत्वात कोणताहि फरक पडता कामा नये , असे मला वाटते .
विविध संस्थाहि उपयोगीच , पण -
संप्रदायाबरोबरच कितीतरी संस्था मी आतापर्यंत पाहिल्या आहेत व पाहत आहे ; परंतु त्याचे एकीकरण हे त्यांनी निवडून घेतलेल्या विभिन्न कार्यक्षेत्रामुळे होत नाही . त्यांनी उचलून घेतलेले एकेक कार्यंच एवढे मोठे आहे की , त्यातून डोके वर काढणे त्यांना कठिण होऊन बसले आहे ; आणि आपल्या देशात आज एकच कार्य करून भागणारे नाही , तर अशी अनेक कार्य अनेक मार्गांनी एकाच वेळी करण्याची अत्यंत आवश्यकताहि आहे . शिवाय कोणत्याहि संस्थेने एखादे कार्य
हाती घेतले की ते पूर्णपणे तिनेच पार पाडावे अशी आमच्या लोकांची बळी समज होऊन बसल्यामळे , त्या कार्याच्या लहानसान अंगोपांगाकडे हि त्याच संस्थेला किवा व्यक्तीला लक्ष द्यावे लागते व त्यामुळे आपले महत्वाचे कार्य बाजूलाच ठेवणे भाग पडते; अर्थात ते महत्कार्य योग्य त्या प्रमाणात वर येऊ शकत नाही . त्यासाठी , मुळाकडील दृष्टि न सुटू देता जर कार्याची वेगवेगळी अंगे भिन्न भिन्न लोकांना सांभाळता आली तर राष्ट्राचा उत्कर्ष अगदी थोड्या अवकाशात झाल्याशिवाय राहणार नाही . एका साधारण घरातील पाच बंधुनासद्धा आपापल्यापरीने कामागरी वाटूनच घ्यावी लागते आणि आमची सर्वांची कामगिरी आमच्या एका घराकरिताच आहे अशी समज ठेवावी लागते व अशा रीतिने परस्परांच्या सुखोद्देशाने , ऐक्यभावाने नि सर्वांगीण धोरणाने त्यांनी उद्योग केला तरच ते आपल्या संसार थाटाचा करुन दाखवू शकतात , नाहीपेक्षा , भूमीला भार होऊन बसण्याची त्यांच्यावर पाळी येते . राष्ट्रातील विविध संस्थांना सुद्धा हाच नियम लागू आहे.
- बंधुभाव जागृत असेल तर !
प्रिय बंधूनो ! समाज , देश किंबहुना विश्व हे सुद्धा एक घरच आहे आणि त्यातील संस्था हे कर्तेसवते बांधव आहेत . ते आपापल्यापरीने जेव्हा कामे वाटून घेतील तेव्हाच त्या देशाची भरभराट होऊ लागेल , हा नियमच आहे . प्रश्न एवढाच आहे की आपापले नियोजित कार्य करीत असता त्यात जो संकुचित अहंकार व इतरापासून आपण भिन्न असल्याचा भाव निर्माण होतो तो नाहीसा करता आला पाहिजे . संघटनेच्या समुद्रमंथनात स्वार्थी अहंकाराची सुरा आणि वैरभावनेचे हलाहलविष यांचा जो प्रादुर्भाव होतो तो बाजूस सारल्यास साऱ्या विश्वाला जीवन देणारे अमृत त्यातूनच वर आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी देवत्व किवा शिवत्व आमच्यात आले पाहिजे ; बुद्धि सत्वशील व व्यापक झाली पाहिजे . प्रत्येक संस्थेने दुसऱ्या संस्थाकडे एकाच महतकार्याचे
वेगवेगळे विभाग म्हणून बंधुत्वदृष्टीने पाहिल्यास , अर्थात व्यक्तिद्रोह समाजद्रोह , पंथ किंवा धर्मद्रोह इत्यादि दूषितभाव मुळीच न ठेवल्यास तसेच सर्वांनी आपापल्यापरीने काम करून परस्परांना पोषक व राष्ट्राचा उत्कर्ष करणारे बनल्यास जे प्रभावी परिवर्तन होईल त्याची कल्पना तरी करता येते का ?
परंतु आमच्या भारतवर्षाची स्थिती या तत्वापासून अतिशय दूर व भिन्नस्वरुपाची होत गेली आहे .त्याचा विपरीत परिणाम धर्मापासुन तो समाजापर्यंत आणि संप्रदायापासून तो व्यक्तित्वापर्यंत सर्वात बिघाड करण्यास कारणीभूत झाला आहे ; नव्हे - या विकृत्तीची भरमसाट भरभराट चालु आहे आणि त्यामुळे सर्व संप्रदाय , धर्म , संस्था किंबहूना सर्व लोक अशांतसे दृष्टीस पडत आहेत . मुळातील हे पोटभेदच जर सुरळित नसतील - किबहुना प्रत्येक अवयवच जर परस्परास खाण्याकरिता धडपडत असेल तर सुस्थितिनिर्मितीचे पुढील कार्य कोणी आणि कसे करावे ? मोठ्या संस्था किंवा प्रकाशातील व्यक्तिच जर परस्परात ओढाताण करीत राहतील तर अंधारातील सामान्य जनांना मार्गदर्शन कसे होणार ? व्याघ्रांच्या लढाईत कोल्ह्याकुत्र्यांची काय घाबरगुंडी उडते याची त्या व्याघ्रांना कसली जाणीव , असेच अखेर म्हणावयाचे काय ?
श्रेष्ठांच्या संमिलनात राष्ट्राचा भाग्योदय
सध्याच्या या कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपसात भांडणे हा नसून ; परस्परांची तत्वे समजावून घेणे , एका ध्येयाकडे व सद्भ भावाकडे दृष्टि देऊन आपसातील अन्य मतभेदांना गौणत्व देणे आणि आपापल्यापी कार्य - सेवा करीत सर्वांनी मिळून एक सर्वांगपूर्ण शांतिमूर्ति किंवा सुखाचा स्वर्ग निर्माण करणे , हेच सर्वास श्रेयस्कर आहे . पण तसे भाग्य आम्हाला लाभण्याचे दिवस अजून यावयाचे आहेत , असेच म्हणावे लागते आपापली मते समजावून देण्याचा प्रसंग जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्वा तो प्रत्येक कार्यकर्ता जर आपली निर्भेळ ध्येयदष्टि किंवा थोर कार्य -
बुद्वि आपल्या जवळ घेऊन येईल तर सर्वाचे आंतरिक ऐक्य साधण्याला वेळच लागणार नाही ; परंतु ते केव्हा शक्य होणार ? त्यासाठी सर्वांना सर्वसाधारण अशी एक पातळी गाठता आली पाहिजे , आपल्या सर्वांच्या विविध भेदातहि एक अभेद्य सूत्र आहे याचे ज्ञान झाले पाहिजे , स्वार्थआणि अभिमान इकडे दृष्टि केंद्रीभुत न होता एकाच उच्च ध्येयाकडे सर्वाची दुष्टि लागली पाहिजे व सर्वांना विचारविनिमयासाठी एकत्र येता आले पाहिजे . परंतु काही संस्थामध्ये कित्येक लोक केवळ व्यक्ति सुखाच्याच आशेने घुसलेले असतात आणि त्यांचा मार्गच हा असतो की दुसऱ्या दोघांशी शक्य तो जुंपून देऊन आपला लाभ करून घ्यावयाचा . अशाहि अनेक अडथळ्यामुळे समाज आज या दुर्गतीला पोहचला आहे ! सर्वाच्या कार्यशक्तींनी एक उत्कृष्ट वैभवमंदिर तयार होण्याऐवजी सर्वाच्या ओढाताणीमुळे या जीर्ण गडाचा एकेक दगड खिळखिळा होऊन गडगडत आहे . जोवर सर्वांची वल्ही एकाच दिशेने नावेला गति देण्याचा प्रयत्न करणार नाहीत तोवर ही नाव अशीच गंटागळ्या खात राहणार हे उघड आहे !
एकीकरणाचा अमोघ उपाय
या सर्व आपत्तीतून कोणता मार्ग काढावा की जेणेकरून सर्वांची कार्ये परस्परांस पोषक ठरतील आणि सर्वांच्या आवडत्या व सर्वोपयोगी गोष्टी आपणास जनतेपुढे मांडता येतील ? तसेच , प्रत्येकाने आपापल्या नियोजित मार्गानेच जाऊन गावांची देशाची उन्नति करावी ही गोष्ट कशाप्रकारे साधता येईल ? इत्यादि गोष्टिच्या विवंचनेत मी असता , एकच एक मार्ग माझ्या दृष्टिपुढे स्पष्ट दिसू लागला की , आपण प्रथम सर्व संप्रदायांच्या लोकांना एकत्रित आणून सामुदायिक प्रार्थना करु , त्यांच्यातील भिन्न भिन्न देवता व वेगवेगळे आचार विचार किंवा धर्मपंथादि भेद याविषयी कोणाच्याहि मनात द्वेष किंवा दोषबुद्धि येणार नाही अशा प्रकारची सहिष्णु व उदार भावना त्या निर्माण करु आणि प्रत्येक
संप्रदायातील शुद्ध तत्वांचा ओघ त्यांच्या त्यांच्या परीने हळुवारपणे वळवून एका मोठ्या प्रवाहाशी मिळण्याचा प्रयत्न करु , तरच काही साधणे शक्य आहे ! भारतात संस्थाभेद किंवा जातिद्वेष याबरोबरच किंवा याहून अधिक प्रमाणात , संप्रदायांनी बहुजनसमाजात तटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि संप्रदायाची भावना ही सर्वात अधिक दृढमूल झालेली आहे . तीत योग्य परिवर्तन झाल्याशिवाय बाहेरच्या संस्थांच एकीकरणाचे प्रयत्न हे वरवरचेच ठरतात . यासाठी बहूजनसमाजाच्या अंतरंगात घुसलेल्या ह्या धार्मिक समजल्या जाणाऱ्या भावना , धार्मिकतेचे शक्य तो सर्वमान्य अधिष्ठान पुढे मांडून एके ठिकाणी आणणे हाच मानसिक ऐक्य साधण्याचा यशस्वी उपाय ठरणार आहे . हा विचार लक्षात घेता मानवधर्मावर अधिष्ठित व सर्वव्यापी परमेश्वराचे चिंतन । करणारी अशी एक सामुदायिक प्रार्थना हीच मला या कार्यासाठी सर्वांगीण दृष्टीने योग्य उपाययोजना वाटली.
मानवधर्माच्या विस्तीर्ण छत्र - छायेत
आपण सर्वाआधी मनुष्य आहोत व नंतर भिन्न भिन्न धर्माचे किंवा संप्रदायाचे अनुयायी आहोत हा विचार प्रामुख्याने समोर मांडून , माणुसकीचा धर्म आपल्यातून जो लोपल्यासारखा झाला आहे तो फिरून कसा प्रचलित करता येईल ; व आपणास मनुष्यत्वाने एका गावात . एका समाजात किंवा एका धर्मातच नव्हे तर एका देशात किंबहूना अखिल विश्वात एकदिलाने कसे वागता येईल ; या विचाराला वागणूकीची जोड देऊन प्रत्यक्षात आणण्याच्या हेतूनेच मी सामुदायिक प्रार्थना हे माध्यम निश्चित केले व तसा प्रयत्न जवळ जवळ १५ - २० वर्षापूर्वीपासून सुरु केला . त्यात आवश्यकतेनुसार विकास होत जाऊन आज त्याचे स्वरुप विविध व विस्तीर्ण बनले आहे हे कोणासही सहज दिसून येईल .
माझी कार्यपद्धति व कार्योदेश
माझ्या या प्रयत्नाचा प्रारंभिक इतिहास पुढील प्रमाणे आहे .
लोकात कोणतेहि कार्य सुरु करावयाचे तर त्यापूर्वी लोकांचे प्रेम संपादन करणे, त्यांच्या सद्भावनांना संतुष्ट करीत वळवून घेणे आणि परिचय वाढवणे या गोष्टिची महत्वाची आवश्यकता असते. त्या गोष्टी साधण्याकरिता, प्रेमाने लोकांचे काम करणे व त्यांच्यातील रूढ भजनपूजनात सामील होणे असे धोरण काही वर्षे मी सुरू ठेवले. नंतर तो इतस्ततः पसरलेला परिचय समाज एकत्रित करण्याकरिता, सप्ताह-यज्ञ-दान व तपादिकांनी समाज एकत्र येऊ शकतो ही भावना मनाशी धरुन, त्या कार्यातून लोकांची प्रेमभावना वाढविण्याचा प्रयत्न केला व साधारणतः आपल्या संकल्पित कार्याला उपयोगी असे काहीतरी लोक मिळतील ही गोष्ट दिसून येताच स्वत: भाषणाने मते तयार करण्यास प्रारंभ केला अर्थात त्यातूनच सामुदायिक प्रार्थनेचे बीज मागे सांगितलेल्या भावनेनुसार हळूहळू रूजविण्याचा उद्योग सुरु केला व त्यात वेळोवेळी प्रसंगोचित फरक करीत जाऊन, अखेर काही सज्जन लोकांची त्यांच्या कार्याच्या दृष्टीने योग्य ती मदत घेऊन हे सर्वांगीण विकासाचे महत्कार्य उभारले.
या कार्यात प्रथमपासून माझा एकच उद्देश नंदादीपाप्रमाणे तेवत आहे की, विश्वधर्म हा जगात मनुष्यत्वाच्या विकासाच्या मार्गाने कसा नांदू शकेल नि सर्व संस्था परस्परांशी बंधुत्व-भावनेन वागून आप आपल्यापरी प्रगतीचे व सेवेचे कार्य कशाप्रकारे करती या विषयीचे बौद्धिक शिक्षण जनतेला देणे, तसेच इहलोकीचे सार्थक व परलोकींची (परमार्थाची) सकतसामग्री सक्रिय तत्वज्ञानाच्या रुपाने प्राप्त करून घेण्याचा मार्ग जनतेला कसा दाखवता येईल याविषयी विचार व प्रयत्न करणे! हे प्रयत्न जेव्हा वाढत्या प्रमाणात लोकांसमोर येऊ लागले तेव्हा लोकांंचा थोडीफार मदतहि त्यास मिळू लागली; परंतु कित्येक संस्थांना या प्रार्थनादि कार्याचे महत्व न वाटून त्यांनी त्याला विरोध करण्यासहि कमा कल नाही, तथापि तो आपोआपच विराम पावला. अर्थात जेव्हा त्याच्या निदर्शनास येऊ लागले की ह्या गोष्टी म्हणजे कार्यांचे संपूर्ण रुप नसून ही एका महतकार्याची प्रस्तावना आहे, एका महत्वाच्या कार्यासाठी
हे सर्व केले जात आहे ; तेव्हा त्यातील थोर माणसांनी दुरुन का होईना याला प्रोत्साहनच दिले . त्याचप्रमाणे कित्येकांना कसा बुवा व्याप वाढला म्हणून नवल वाट्न त्यांनी मला याविषयी अनेकदा विचारणाति केली व मी माझे विचार मोकळेपणाने त्यांचे समोर मांडले .
सेवामंडळाचा उपदव्याप कशाकरिता ?
कित्येकांना वाटले की , आध्यत्मिक तत्वाच्या दृष्टीने असला व्याप अनिष्ट आहे . ह्या खटपटी म्हणजे परमार्थ नव्हे . हरिभजन करीत देवावर भार टाकून स्वस्थ बसावे हेचं पारमार्थिकांचे काम ! या मताच्या पुरुषांना मी असे सुचविले की . ईश्वराचे आवडते लोकसेवाकार्य ना करिता स्वस्थ बसणे हा ईश्वराच्या दष्टीनेच गुन्हा आहे . भूतदया , परोपकार , दान याचेच समष्टिरूप राष्ट्रसेवा व विश्वसेवा हे आहे . कर्मयोगाचा आदर्श साधुसंतांनी व रामकृष्णादिकांनी आपणासमोर आचरण्यासाठी म्हणूनच ठेवला असून या सक्रिय सेवाभक्तीतच त्यास संतोष होणार आहे . ईश्वरभावनेने जगाचे कार्य करणे हा व्याप बाधक नसून साधक होणार आहे अमूर्त तत्वज्ञानाचे मूर्तस्वरुप विश्वव्यापी प्रेमात व सर्वांगीण लोकसेवेतच दिसून येत असते . आत्म्याचे अमरत्व कर्तव्य करीत मरण्याच्या धडाडीत व ब्रह्माचे व्यापकत्व सर्वभूतहिताच्या कार्यातच दिसून आले पाहिजे , नाहीतर तो नुसता एकांगी व भेकड विचार ठरेल !! ऋषिमुनींचा आदर्श समोर ठेवून विश्वात शांति निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून शक्य तेवढा प्रयत्न करणे यातच आपल्या भक्तीची व ज्ञानाची खरी कसोटी व सार्थता आहे !
वरील दृष्टीच्या लोकांखेरीज कित्येक लोक असे विचारणारेहि मिळाले की काय हो ! जगात इतक्या संस्था लोककार्य करणाऱ्या असतांना फिरुन तुम्ही हा नवा उपद्व्याप का केला ? तेव्हा मी त्यांना असे सांगून गेलो की - बंधूनो ! देवाची , धर्माची किंवा देशाची सेवा एकाच मार्गाने होते असे नाही ; आणि त्याचबरोबर भिन्न भिन्न मार्गानी
आपापल्यापरी लोक जी कार्ये करतात त्यातील काही साधे जुळतीलच असेहि दिसत नाही. ते सर्व सांधे जुळविणाऱ्या या सर्वसग्राहक मागनि विश्वमयाची सेवा करण्याचे मी योजिले आहे. आपण पाहात आहोतच
की, संप्रदायाचे परस्परांशी मुळीच जुळत नाही; तसेच कुणाला देशभक्तिच मोठी वाटते तर कुणाला देवभक्तिच अधिक महत्वाची दिसते. कुणाला आपला धर्म किंबहना रुढ्याच महत्वाच्या वाटतात तर कुणाला सब झूट वाटून स्वैराचार आवडतो. कणाला जगात श्रीमंत लोकच नकोत अस वाटते तर कुणाला त्याशिवाय कसे चालेल असा प्रश्न पडतो. अशा भिन्न भिन्न समजुतीच्या रानात घोटाळणारे हे जन समंजसपणाने एखाद्या सुरक्षित व व्यवस्थित अशा मार्गास लागावे याची मला आवश्यकता वाटल्यावरुन मी ही श्रीगुरुदेव सेवामंडळा ची योजना आखलेली आहे आणि त्याची उद्देशपत्रिका नियमांसह जाहिर केलेली आहे.
सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वांचा समन्वय
मुख्य विचारणीय गोष्ट ही आहे की, कोणतेहि एकांगी कार्य करुन राष्ट्राची संपूर्ण उन्नती होत नसते. एकांगाची प्रमाणाबाहेर वाढ हा रोग ठरतो तसेच अनेक कारागिरांनी भिन्न भिन्न अवयव आपापल्या कल्पनेने निर्माण करून त्यांची एक मूर्ति करु म्हटल्यास तेहि हास्यास्पद व विद्रूप होण्याचा पूर्ण संभव असतो.यासाठी एका परस्पर विचारविनिमयाच्या
मयदित जर सर्वाकडून वेगवेगळ्या अंगाची वाढ झाली आणि सर्वांचा कोठेतरी समन्वय (मिलाफ) करता आला तर ते कार्य अत्यंत उपयुक्त ठरणे स्वाभाविक असते. ही गोष्ट लक्षात घेऊन, या दृष्टीने कार्याचा
आदर्श व क्षेत्र सर्व संस्थांच्या व संप्रदायाच्या लोकांकरिता निर्माण करून देण्यासाठीच आम्ही हे मंडळ स्थापन केले आहे!
कोणतेहि एक कार्य चांगले व दुसरे वाईट, असे म्हणता येत नाही. प्रसंगी सर्वच गोष्टीची सर्वांनाच जरुर लागते. देशभक्ताला म्हटले की, देवभक्ती नको तर त्याच्यापुढे काही आदर्शच उरणार नाही, आणि देवभक्ताला सांगितले की देशभक्ति नको तर एका देवळातच
तो देवाचे महत्व मर्यादित करील व देवाला आवडणारी जनसेवा करणार नाही. श्रीमंत लोक नसले तर गरीबांचे आर्थिक चालक म्हणून कोण राहणार नाही नि श्रीमंत उन्मत झाले असले तरी गरीबांना भोजनहि मिळणार नाही. याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीची जी सांगड अनुभवी पुरुषांनी घालून दिली आहे ती मोठ्या मनाने समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती न समजल्यामुळेच आज सर्वत्र मोठा घोटाळा माजलेला
दिसून येत आहे, नव्हे काम बंद पडण्याची पाळी आली आहे. याकरिता तो मार्ग सर्वांना मोकळा करुन. मनुष्याच्या सर्वागीण उन्नतीस ज्या ज्या कार्याची जरुरी आहे ती सर्व कार्ये सेवामंडळा तून आपण सुरु करु या
उद्देशानेच, उदक अग्नि धान्य झाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये।। (संत तुकाराम) हे सुत्र समोर ठेवून मी या महत्कार्यास प्रारंभ केला आहे.
(श्रीगुरुदेव-डिसेंबर १९४५)
***