सुविचार-स्मरणी
(७००) मित्रा ! ज्याप्रमाणे विषयांध पुरूष आपली आणि आपल्यासाठीच जगाचीही नैतिक बंधने तोडून समाजातून अलग होतो त्याप्रमाणेच आपल्या उपास्य-प्रेमाच्या छंदात अंधश्रद्धेने अत्यंत गुंग होऊन काही लोक जगाच्या नैतिक हृदयधर्माच्या बंधनाला तोडून मनमाने आचरण करितात आणि समाजातून अलग पडतात. त्यांच्याविषयी विचार केल्यास मला दोघांतही मानवी बुद्धीच्या विकासाची पूर्णता आढळत नाही कारण, कोणत्याही नशेच्या अनावरतेमुळे गुंग
झालेल्या पुरुषाचे विषय (प्रवृत्त्या) ज्ञानालाही आवरत
नसतात; आणि प्रकृतीचा उद्दिष्ट हेतु आपल्यासहित जगाला न जाणवता तो अलग पडतो व समाजाच्या धारणेची अव्यवस्था आपल्या माथी लावून घेतो. असा पुरुष-मग साधू समजला जावो वा विषयी त्यात मला भेद मुळीच वाटत नाही. समाजाने आपल्या लोभाकरिता जरी त्यावर अधंश्रद्धा ठेवून इच्छित फळे मिळविली तरी मी त्याला साधू समजण्याला तयार नाही, की जोपर्यंत तो पुरुष आपल्या सदबुद्धि प्रामाण्याने सदाचरण करून समाजाला आदर्शवत दिसत नाही.
ही गोष्ट जर अप्रमाण असेल तर ब्रह्मनिष्ठता म्हणजे
अनुभवाचा मार्ग म्हणणे सोडून आपल्याच धुंदीत
वेड्यासारखे पडून राहणे आणि आपल्या सर्व नियमित
क्रिया विसरणे असाच नाही का अर्थ होणार? आणि असा अर्थ झाला तर ब्रह्मानुभव हा असा असतो असे ज्यांनी सांगितले त्यानाही तसेच व्हावयाला पाहिजे होते आणि तेही जर तसेच असतील तर मग हा सर्व पोथा कादंबरीकारानेच लिहिला असावा असे अनुमान करणे काय वावगे आहे? (कारण, विदेही काय लिहिणार व कुणासाठी?) अशा पूर्ण चिकित्सेत जर प्राणी पडला तर आमचे अंध धर्माभिमानी स्पष्ट सांगतात की- अहो! तो अनुभवाचा मार्ग तुम्हाला नाही कळणार! ते धर्म विरळेच जाणत असतात. असे म्हटल्याने खुशाल आपला थोरपणा मिरवण्याचा रस्ता त्यांना मोकळा
होतों आणि बुद्धिहीन लोक गटगटा तो घोटा पिऊ लागतात; अर्थात, हे मला मुळीच आवडत नाही.
प्रिय मित्रा ! मी स्पष्टपणे सांगेन की, हा अखिल
मानव समाज ज्या उद्देशाने प्रभुने आपल्या इच्छेने निर्माण केलेला आहे तो उद्देश विचारात घेता हाच निष्कर्ष निघत आहे की व्यवहार आणि परमार्थांचा आज दिसत असणारा भेद समाजातून काढून, मानवतेस अध्यात्माच्या भूमिकेवर आरूढ करून जगात दैवी शक्तीने नांदवावे आणि परमेश्वराच्या
अनंत शक्तीचा सुखानुभव प्रत्येक मानवाने घ्यावा; तसेच आपल्या मानव्याच्या पूर्ण विकासाला मानवतेच्या मार्गानेच पावावे हाच ईश्वरी उद्देश दिसतो. आणि हे ज्ञान जो स्वत:च्या बोधाने स्वत:च्या आदर्शाने जगाला देतो तोच साधु, महात्मा किंवा संत असे मी मनोभावाने मानतो.
सुविचार-स्मरणी
(७०१) मित्रांनो ! साधनेच्छु पुरुषाने शांतिदायक अशा एकांत स्थळी जाऊन ती जागा गायीच्या शेणाने स्वतः सारवावी आणि त्यावर शुद्ध खादीचे नरम राहील असे आसन घालून, आपल्याला साधेल अशा बैठकीने मागच्या कण्याचा भाग सरळ करून व दृष्टी स्थिर राहील अशी ठेवून बसावे, त्यानंतर आपल्या मार्गदर्शक माऊलीचे स्मरण करून, आपल्या प्रार्थनेच्या निर्मल संकल्पाचा स्थिर प्रवाह ध्यानी आणून, अत्यंत दक्षतेने कुसंकल्पांचा निरोध सुसंकल्पांनी करीत प्रभुची
प्रार्थना करावी आणि आपल्यात जी उणीव आहेशी वाटते ती नि गुप्त प्रगट दोष नष्ट करण्याची अत्यंत आतुरतेने सद्-गद् होऊन मागणी मागावी, असेच आपण स्वतः त्याप्रमाणे वागण्याचा दृढ निश्चय करावा असा अभ्यास क्रमाक्रमाने वाढवीत रहावा. अंदाजे तीन तासपर्यंत स्थिर राहील असे साधलेले आसन सिद्ध करून नित्यक्रम करावा म्हणजे विचाराच्या धारणेत दैवी अधिकार खेळू लागतो आणि बाह्योंद्रिये ताब्यात येऊन परमेश्वराच्या सहज स्वरुपाचा आनंद साक्षात्काराने प्रत्यक्षपणे अनुभवण्यास मिळतो. असा
अभ्यास चालू असताना अभ्यासाशिवायचा वेळही त्याच विचारात जाईल असे एकांताचरण करावे आणि आपले सर्व कपडे धुण्यापासून तो भोजनकार्य, भांडी साफ करणे वगैरे सर्व स्वत: च करून फावलेल्या वेळी अशा विचारांना अधिक प्रोत्साहन मिळेल अशी संतांची संगती वा उत्तम ग्रंथांचे वाचन अर्थ भावाने करावे. आपली मनोधारणा असेल तोपर्यंत हे साधून अशा निष्काम भावनेने केले म्हणजे आत्मशांती मिळू लागते.
या साधनाच्या पूर्वीचा काळ असा आपल्या कामधंद्यांत
असताना रोज अर्धा तास तरी फिरण्याला एकट्याने जाऊन त्याचा संकल्प दृढ करावा आणि त्याची जरूरी का आहे याचा विचार करावा तसेच देवाला त्याच्या सिद्धीची करुणा भाकावी. असे करीत राहून जेव्हा अत्यंत आतुरता वाढेल तेव्हा कामातून फुरसत काढून आपल्या घरी किंवा एखाद्या रम्य स्थळी, आपल्या मित्राच्या येथे किंवा एखाद्या उत्तम आल्हाददायक देवळाच्या एखाद्या खोलीत अथवा सहन होत असल्यास अरण्याच्या प्रशांत स्थळी साधेल तेवढे
दिवस ही प्रार्थनेची साधना करून नंतर उत्साहाने आपल्या घरी येऊन पुन्हा आपले काम करीत *हाती काम आणि मुखी नाम* भजत आपल्या प्रगतीस सांभाळून जेवढी समाजाची परोपकाराने सेवा करिता येईल तेवढी करावी आणि आपला घरसंसार न सोडता सेवाकार्यातच आत्मानंद प्राप्त करावा, असे माझे मत आहे.
साधकाने ही अवस्था प्राप्त केली असता तो जगातच
मोक्षाचा अनुभव घेईल व ही अखिल सृष्टीच त्याला देवस्वरुप वाटेल. चित्त, स्थिर व अंतर्मूख न करता उगीच साधू होऊन लोकांना कष्ट देण्याची बुद्धी आपल्यात येता कामा नये असे चितंन साधकाने करीत रहावे व सावधपणे आपला उद्धार
करून घ्यावा.
सुविचार- स्मरणी
(७०२) हे पूज्य गुरुदेवा ! जे लोक तुला शरीराचा संप्रदायाचा किंवा धर्माचा बांधवडा समजतात. त्यांना तुझ्या खऱ्या अधिकाराची कल्पना आलीच नसावी असे मला वाटते
(७०३) तू व्यवहार आणि परमार्थाची एकरुपता करून देणारा म्हणजे विश्व, माया, जीव आणि ब्रह्म यांचे अभेदरुपत्व दर्शविणारा ज्ञानप्रकाश आहेस, हे समजणाराच तुला यथार्थ जाणू शकला असे मला वाटते. आणि म्हणूनच त्या सर्वांचा तू चालक
होऊन त्यांनां आपली अभेदशक्ती दाखव आणि संसार स्वर्ग कर. अशी माझी प्रार्थना आहे.
(७०४) श्रीगुरुदेवा! जे लोक तुला शुद्ध ज्ञानमय आणि शरीरीशी अलिप्त अशी सद्-बोधाने प्रकट होणारी एक निरपेक्ष शक्ती समजतात, तेच खरे जाणणारे होत. परंतु तसे न जाणणारेच जगांत अपार आहेत.
(७०५) अशा जाणत्या आणि न जाणत्या-दोघांनाही आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान देऊन त्यांच्यांतील आकुंचित मतभेदांची भावना नाहीशी कर, एवढीच माझी चरणारविंदी प्रार्थना आहे.
(७०६) श्रीगुरुदेवा ! विश्वाच्या विराटरुपात विश्वस्थ रुपाने नटणाऱ्या श्रीगुरुदेवा !! तुला माझा अखंड नमस्कार असो.
(७०७) मनाच्या संकल्पविकल्पाला स्थिर करून सत्कार्य प्रवृत्त करणाऱ्या आणि निश्चयाने टिकविणाऱ्या तुझ्या त्या आत्मीय कृपाशक्तीला मी अनन्यतेने नमस्कार करतो.
(७०८) ही आत्मीय धारणाशक्ती ज्यांच्यात अखंडपणे प्रवाहित राहून जगताला बोध देते, अशा संतमंहताना मी वारंवार नमस्कार करतो.
सुविचार-स्मरणी
(७०९) ज्यांच्या हृदय-पटलावर त्यांचे ज्ञानाचा परिणाम होऊन, निश्चयाने जे जन या शुद्धभक्ति मार्गाला आपल्या विचाराशी संयुक्त करतात; त्या प्रिय मुमुक्षु जनांस मी मनोभावाने नमस्कार करतो.
(७१०) हाच शुद्ध हेतु धरून, लोकांना त्यांच्या अधिकारांप्रमाणे सरळ मार्ग लाभण्याकरिता जे अनेक मार्गानी, भाषानी व पद्धतीनी एकत्व दर्शवितात, अशा निष्काम वृत्तीच्या पूजनीय सज्जनांनाही मी सत्प्रेमाने नमस्कार करतो; आणि या सर्वांत अनुस्यूतपणे एकच तत्व नटलेले आहे, असे मी मनोभावे समजतो.
(७११) श्रीगुरुदेवा! तुझी जाणीव शक्ती सर्व मनुष्यमात्रांच्या हृदयाकाशात विराजमान असून,
जे पुरुष त्या जाणिवेला जाणून असतात नि तिचा आपल्या जीवनोन्नतीत उपयोग करून घेतात, तेच तुझ्या कृपेला पात्र होत असतात.
(७१२) निसर्गाच्या प्रवाहानुसार मनाच्या चांचल्यात वा आपत्तीच्या अत्यंत गंभीर वातावरणात मनुष्याला धीर देऊन सहनशीलता शिकवितो नि सत्य पथावर आरूढ करतो, अशा त्या स्फूर्त बोधाला जे लोक जाणून असतात तेच तुझ्या कृपेला पात्र होतात.
(७१३) विश्वासमग्न पुरुष जेव्हा अमूर्त कल्पनेच्या भरात तुझ्याकडे पाहतात आणि स्वत:ला विसरुन तुझे ध्यान करतात, तेच तुझ्या दैवी शक्तीच्या कृपेला पात्र होत असतात.
(७१४) व्यवहार व परमार्थांच्या काहुरात गुरफटून गेल्यावर कमालीचा प्रयत्न करून शेवटी मौन होऊन तुजकडे विरही वृत्तीने
पाहतात, तेच तुझ्या कृपेला पात्र होतात.
सुविचार-स्मरणी
(७१५) आपल्या सत्कर्तव्याने व आत्मशक्तीने वर चढत चढत जे धीर पुरुष आपली बुद्धी स्तब्ध (स्थिर) करून सोडतात. तेच तुझ्या कृपेला पात्र होतात.
(७१६) दुःखद प्रसंगानी गहिवरुन जाऊन आपला सत्य मार्ग न सोडता, मरणालाही आपली ध्येयमुद्रा दाखवितात, तेच तुझ्या कृपेला पात्र होतात.
(७१७) सर्व ऐहिक उत्कर्षकारक गुणांनी गुणवंत बनून आपली वृत्ती अनासक्त नि अध्यात्माकरिता मोकळी ठेवतात, तेच पुरुष तुझ्या कृपेला पात्र होतात.
(७१८) कुणाचेही सांप्रदायिक बंधन न पाहता सदय अंतःकरणाने जे आपल्या बोधाने साधकांना पाय पुढे ठेवण्याला मदत करीत असतील, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७१९) अनेक मतांच्या काहुरात भांबावलेल्या पुरुषाला त्याचा अधिकार पाहुनच आपले स्पष्ट नि त्याला पोषक असे ज्ञान मातृवत् प्रीतीने पाजतात, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२०) कोणत्याही संपत्तीच्या लोभात वा लोकेषणेच्या कचाट्यात न सापडता व आपले व्यक्तिमहत्त्व न दाखविता, उपदेशाची याचना करीत समोर आलेल्या पुरुषाला योग्य स्थानी गोड पण रोगावर नि:संशय वार करणारे ज्ञान निर्भीडपणे सांगतात, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२१) समाजाच्या उन्नत उद्दिष्टाकरिता आपल्या प्रियतम वस्तुचाही त्याग करण्याला सदैव तयार असतात, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२२) आपल्या सर्व व्यवहारांचे धोरण समष्टिधारणेवर उभारून, आपले प्रत्येक कर्तव्य आपल्यासहित सर्वलोकांत
जिवंतपणाने प्रभावी रहावे असे समजून जे मनुष्यमात्रांना स्वावलंबी व समष्टिप्रेमी करितात, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
सुविचार-स्मरणी
(७२३) भरमसाट शास्त्रे वाचून त्यावर अंधश्रद्धेने विसंबून जे आपली तारतम्यबुद्धी गहाण ठेवीत नाहीत, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२४) कुणाही महात्म्याची कीर्ती दुसऱ्याच्या तोंडून ऐकून-स्वत:स पटल्याशिवाय -आपले सर्वस्व देण्याच्या जे कधीच भरीस पडत नाहीत. तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२५) ज्यांच्या विचारी अंत:करणामागेच दानशूरता नि कठोर शौर्य वसत असते, तेच पुण्यपुरुष मला प्रिय आहेत.
(७२६) आपला आपल्याला आत्मविश्वास नसण्याएवढा आणि आपल्या विश्वासार्ह (किंवा विश्वास-ध्येय) ठरविलेल्या पुरुषाकरिता आपली वृत्ती साशंक असण्याएवढा दुर्गुण आपल्यात मुळीच असू नये.
(७२७) कुणावरही सुक्ष्मतया शोधल्याशिवाय आपला विश्वास भरमसाटपणे ठेवण्याएवढा तसेच आपल्या देशाचा, धर्माचा किंवा कुलाचा ऱ्हास पाहून आनंद मानण्याएवढा दुर्गुण आपल्यात कधीच असू नये.
(७२८) लाजून वा भिऊन आपले आवश्यक काम करण्यास न धजण्याएवढा किवा आपल्या शुद्र स्वार्थांकरिता आपल्या सर्वस्वाला काळिमा लावण्याएवढा दुर्गुण आपल्यात कधीच असू नये.
सुविचार-स्मरणी
(७२९) तोंडपुजेपणाने गोड बोलून मागे कुटिलता करण्याएवढा आणि आपल्यावर असलेल्या जबाबदारीला आळसाने चुकविण्याएवढा दुर्गुण आपल्यात कधीच असू नये.
(७३०) आपण केलेल्या दोषांचा (अपराधांचा) परिहार करण्यारिता दोष लपवून ठेवण्याएवढा तसेच आपल्या ठरविलेल्या प्रिय देवतेजवळ आपली गुह्यता न सांगण्याएवढा दुर्गुण आपल्यात कधीच असू नये.
(७३१) आपल्या आवडत्या संप्रदायाकरिता दुसऱ्या संप्रदायाशी कुचरपणाने वागण्याएवढा किंवा माझीच बुद्धी न्यायी आहे असे समजून सर्वसाधारण श्रेष्ठांचे मत न घेण्याएवढा दुर्गुण आपल्यात कधीच असू नये.
(७३२) आपल्या मनाची वृत्ती आपल्या ध्येयमार्गावरून थोडीसुद्धा ढळती दिसताच साक्षित्वाने जो संकल्प-विकल्पांना आवरून धरतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३३) कोणतेही कार्य करीत असता कार्याच्या आड येणाऱ्या विघ्नांना अनावरतेने तोंड न देता समतोल वृत्तीने उत्तम व न्याय्य विचार करूनच जो विघ्नांचा प्रतिकार करतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३४) घरात चोर घुसल्यावर त्याला हाकण्याकरिता लोकांत हाकाटी पिटण्यापेक्षा अगोदरच जो आपली जागरूकपणे व्यवस्था ठेवतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३५) आसक्तीच्या मदाने स्त्रैण दुर्जनाशी मित्रता केल्यास त्या दुःसंगतीमुळे होणाऱ्या विपरीत आघातांना प्राप्त होण्यापेक्षा आधीच जो आपल्या सद्विवेकबुद्धीने ओळखुन मित्रता करतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
सुविचार-स्मरणी
(७३६) गुंतागुंतीच्या प्रसंगात अचानक पडल्यावर आपल्या आत्मदेवाशी विनम्र होऊन अंत:साक्षित्वाने हाक (आज्ञा) दिल्याशिवाय जो एक पाऊलसुद्धा पुढे टाकीत नाही तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३७) आपली गति बुद्धीच्या विचाराच्याही पुढे सरकल्यास (विचार कुठिंत झाल्यास) तेथेच स्तब्ध राहून जो आपल्या श्रेष्ठवरिष्ठ पुरुषाच्या सलोख्याने (सल्ल्याने) काम करतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३८) आपल्यामुळे अनेक लोक सुखी होत असल्यास हृदयाच्या धडाधडीने व न्यायाच्या अंतर्निष्ठेने जो समाजाकरिता पुढे सरसावतो तोच खरा सावधान असे मी म्हणतो.
(७३९) आपल्या शौर्यशक्तीने शेकडो माणसांना छिन्नभिन्न करून टाकण्याचे सामर्थ्य अंगी असूनही ज्याचे मस्तक प्रसंगी दुबळ्याकरिता सुद्धा नम्र होत असते, त्यालाच खरी लीनता कळली आहे.
(७४०) आपल्या शास्त्राभ्यासांने प्रकांडपंडितानाही वेडावून सोडण्याइतके ज्ञान असूनदेखील जो प्रसंगी सरळशा भोळ्याभाविकाचीही कथा ऐकण्यास तत्पर व नम्र असतो, त्यालाच लीनता कळली आहे.
(७४१) अनेक गुणांनी परिपूर्ण व ज्ञानात निपुण असतानाही जो गुणग्राहकतेकरिता सदैव विद्यार्थीच राहतो, त्यालाच लीनता कळली आहे.
(७४२) आपल्या श्रीमंतीच्या वैभवात शेकडो गावे विकत घेण्याएवढी शक्ती असतानाही प्रसंगी सामान्य गरीबाकरितासुद्धा धावून जाऊन देहाने व द्रव्याने राबतो, त्यालाच लीनता कळाली आहे...
सुविचार-स्मरणी
(७४३) आपल्या कोकिळासारख्या आवाजाने लक्षावधी लोक गाण्याने मोहून टाकण्याची कला अवगत असतानाही जो प्रसंगी साध्या प्रेमळाचेही भजन ऐकण्यात गर्क होतो, त्यालाच लीनता कळली आहे.
(७४४) कोणतेही कार्य बेधडकपणाने करण्याएवढे धाडस असूनही जो परस्परांच्या कार्यापासून होणाऱ्या परिणामाकडे पाहून बरेच इच्छितो, त्यालाच लीनता कळली आहे.
(७४५) नाना मतांच्या काहरांत पडलेल्या अनेक संप्रदायांना सहज हरविण्याचे ज्ञान अंगी असूनही प्रसंगी जो कोणत्याही संप्रदायाचे सद्गुण शिरसामान्य करितो, त्यालाच लीनता कळली आहे.
(७४६) मोठ्या शक्तिवानाच्या समोरसुद्धा अन्याय होत असताना जो सिंहासारखा चवताळून झेप घालतो व आपले कार्य गोड करून घेतो वा तेथेच आपला शेवट करितो त्यालाच लीनता कळली आहे.
(७४७) श्रीगुरुदेवा ! "तुझ्या वरदस्ताशिवाय या जगात काय होऊ शकते!" असे समजत निराश होऊन स्तब्ध बसणारे पुरुष तुझ्या कृपेला कधीच प्राप्त होत नसतात.
(७४८) "मला तुझ्या रुपाशिवाय नि तुझ्या व्यक्तिगत सेवेशिवाय तुझे सर्व अन्य कार्य नको आहे" समजणारे पुरुष तुझ्या कृपेला कधीच पात्र ठरत नसतात.
(७४९) गुरुदेवाच्या अनेक विविध रुपांना न जाणून आपल्या गुरुशिवाय इतरांस तुच्छ लेखणारे पुरुषही कधीच कृपापात्र होत नसतात.
सुविचार-स्मरणी
(७५०) वादविवादांच्या भराऱ्या मारून शब्दांनीच पांडित्य कमावणारे व तत्त्वाशिवाय गुरुभावनेत चिटकलेले पुरुष तुझ्या कृपेचे कधीच अधिकारी होत नसतात.
(७५१) केवळ चमत्कारांच्या ओढीने आपली माणुसकी गहाण ठेवणारे पुरूष तुझ्या कृपेस कधीच पात्र ठरत नसतात.
(७५२) आपली आशा तृष्णा वाढवून सदैव व्यक्तिमोहात फसणारे लोक तुझ्या कृपेला कदापि प्राप्त होत नसतात.
(७५३) माझ्या सर्व संसाराचे व माझ्या वैयक्तिक कामांचे ओझे तुम्हीच उचलून मुलाबाळांच्या लग्नांपासून तो माझ्या सर्वत्र इच्छांची पूर्तता तुम्हीच केली पाहिजे.* असे समजणारे पुरूष तुझ्या कृपेला कधीच प्राप्त करू शकत नसतात.
(७५४) श्रीगुरुच्या वचनाला दूर करून "आम्ही सांगू तेच गुरूने आम्हांस पुरवावे" असे मानणारे लोक सेवा करूनही कृपेला प्राप्त होत नसतात.
(७५५) कुणालाही अडीअडचणीच्या प्रसंगी आपल्यापरीने मोकळ्या मनाने व बंधुत्व भावनेने मदत करणे; तसेच आपल्यावर सोपविलेल्या व आपण कबूल केलेल्या जबाबदारीच्या कार्याला नि:संशयपणे मरेपर्यंतही न टाळणे, यालाच मी मनुष्यत्व
समजतो.
(७५६) काही तत्वांच्या बाबतीत जरी कुणाला आपली मते पटत नसली तरी त्या पुरुषांतील गुणाकडे लक्ष देऊन त्याकडे द्रोहदृष्टीने न पाहणे, यालाच मी मनुष्यत्व समजतो.
सुविचार-स्मरणी
(७५७) आपण कितीही श्रीमंत असलो तरी गुणाने व शीलाने सदैव थोर असणाऱ्या अशा गरीबांना देखील शिरसामान्य समजणे,तसेच कुणी कोणत्याही धर्माचा व देशाचा असो, त्यात जर मानवतेचा विकास दिसत असेल तर त्याला आपला समजून आदर व्यक्त करणे, यालाच मी मनुष्यत्व समजतो.
(७५८) वैभवाकरिता न झुरता असलेल्या परिस्थितीतच आपली सत्यनिष्ठता दाखविणे व कोणत्याही आपत्तीमध्ये आपली कर्तव्यबुद्धी न सोडता मरेपर्यंत सत्याने झगडणे यालाच मी मनुष्यत्व समजतो.
(७५९) कितीही सुखात वा वैभवात आपण असलो तरी जगाच्या दुःखद परिस्थितीच्या विचाराने *आपण दुःखीच आहोत* असे समजून समाजसुखासाठी आयुष्यभर आपल्यापरीने झटत राहणे, यालाच मी मनुष्यत्व समजतो.
(७६०) संसारात स्वर्गसुख जरी लाभले तरी आपले आत्मतत्व जोवर आपण प्राप्त केले नाही. (अनुभवले नाही) तोवर सर्व व्यर्थ आहे. या दृष्टीने त्यासाठी आपल्या आदर्श देवतेची प्रार्थना करीत राहणे, यालाच मी मनुष्यत्व समजतो.
(७६१) हे जगच्चालक अमूर्त शक्ते! जशी इतर अनेक प्राण्यांची गुणकर्मे त्यांच्या त्यांच्या वेषानुरूप व योनीनुसार पूर्ण स्वरुपांची दिसतात तद्वतच मनुष्याच्या मनुष्यत्वाचा विकास योग्य गुणकर्मानी, सहनशील स्वतंत्रतेने व विशालतेच्या उज्ज्वल
बाण्याने होऊ दे. अर्थात, ज्या अपेक्षेने तू मनुष्यप्राणी निर्माण केलेस ती तुझी इच्छाच पूर्णत्वाला येऊ दे.
(७६२) हे चैतन्यमया! आपल्या विपरीत कर्माच्या फळांचे ज्ञान
ज्यांना लवकर होऊन ते डोळस वृत्तीने मागे फिरतील नि आपल्या आत्मनेत्राने दिसणाऱ्या लाभासच प्राप्त करतील अशी प्रवृत्ती आणि साधन त्यांना दे. अर्थात, आळसाने किंवा मनोमार्गांनी समाधान न देता समाधानाच्या वस्तुनेच समाधान मिळवून घेण्याचा त्यांना मार्ग लाभू दे, ज्ञान दे व समानता दे.
सुविचार-स्मरणी
(७६३) हे आनंदघना ! जी शांती जगाच्या कोणत्याही वैभवाने प्राप्त होत नसून तीस मानसिक धनाचीच आवश्यकता असते, असे सत्य व चिरंतन शांतिसुख प्रार्थी जनात प्रार्थनाफलाने नांदू दे व बाह्य कर्मानीही वृत्ती त्यातच रंगू दे. अर्थात, परमार्थ व व्यवहार यांच्या भेदाची बुद्धी नष्ट करून त्यात साम्यता येऊ दे.
(७६४) हे अविनाश विश्वरुपा! तुझ्या सत्यस्फूर्तीला जाणणाऱ्या जगातील सर्व सज्जनांची वाढ होऊ दे; त्यांना सत्ता व ऐक्यबुद्धी दे; आणि सत्याची सतत धारणा व बुद्धी करण्यास प्रार्थनाशक्ती दे. तसेच भ्रांत जीवांना प्रार्थना करण्याची इच्छा होऊ दे, हीच माझी प्रार्थना आहे.
(७६५) आपणास आवडणाऱ्या उद्योगात उन्नत होऊन माझे कष्ट माझ्याकरिता नसून ते राष्ट्राकरिता आहेत असे मनोभावाने समजणे याला मी हरिभजन किंवा उपासनाच समजतो.
(७६६) आपणाकडे आलेल्या जबाबदारीला ओळखून सत्याने व लोकसंग्रही वृत्तीने सतत वागणे याला मी हरिभजन किंवा उपासनाच समजतो.
(७६७) राष्ट्र सर्वांगीण दृष्टीने उन्नत होण्याकरिता नि त्यातील प्रत्येक मनुष्य मानवतेने वर येण्याकरिता (प्रगत होण्याकरिता) जे जे सहकार्य करावे लागेल ते ते विचारपूर्वक व निरभिमानपणे करीत राहणे याला मी हरिभजन किंवा उपासनाच समजतो.
सुविचार-स्मरणी
(७६८) कुणाचेही आपणासमोर बिघडत असलेले दिसले तर त्याचे सांत्वन करून त्याला नीतिमार्गाने सुरक्षित व सुरळीत करुन ठेवण्याचा प्रयत्न करणे याला मी हरिभजन किवा उपासनाच समजतो.
(७६९) *ही सर्व सृष्टी हरिची नि हरिकरिताच आहे* असे निश्चयाने समजून प्रत्येकाशी हरिरुपाने (ईश्वरभावनेने) व्यवहार करणे याला मी हरिभजन किंवा उपासनाच समजतो.
(७७०) आपले सत्कार्य करीत असता संसारात कितीही दुःख प्राप्त झाले तरी आपल्या आनंदवृत्तीत उणीव न येऊ देता किंवा मनोधैर्य जराही डळमळू न देता आपला सत्याचा राजमार्ग निर्धास्तपणे धरून चालणे व विचाराने पुढचा मार्ग चोखाळीत राहणे याला मी हरिभजन किंवा उपासना असेच समजतो.
(७७१) हरिच्या भजनाचे हरिचे निर्मल तत्व अंगी बाणविण्याकरिताहजे जे प्रत्यक्ष वा पर्यायाने कारण होणारे कार्य करावयास पाहिजे ते ते सर्व दक्षतेने क्षणोक्षणी करीत राहणे व त्यासाठी दुसऱ्यास सहाय्य करणे यालाच मी हरिभजन किंवा उपासना समजतो.
(७७२) आपणास आवश्यक व उचित अशा काबाडकष्टापासून तो प्रसंगी मळ साफ करण्याच्या सेवाकार्यापर्यंत प्रत्येक काम नि:संकोचपणे व नम्र भावाने करण्यास जो पुढे धजतो तोच खरा सेवक, असे मी समजतो.
सुविचार- स्मरणी
(७७३) कोणत्याही प्रसंगी निर्भयपणे आपले संरक्षण करून आपल्यावर अवलंबित असलेल्या जीवांचे प्राण हरप्रयत्नाने निर्धास्त करून ठेवतो तोच खरा सेवक, असे मी समजतो.
(७७४) आपली दिनचर्या सर्वांगीण दृष्टीने उत्तम बनवून जो सर्व प्रकारे आदर्शत्व दाखवितो आणि जिज्ञासुला जो आपल्या आत्मविश्वासास धरुन सरळ नि उज्वल मार्ग सुचवीत राहतो तोच खरा सेवक, असे मी समजतो.
(७७५) आपली शारीरिक, बौद्धिक, व्यावहारिक व धार्मिक उन्नती करून घेऊन नेहमीच्या सुव्यवस्थेकरिता आपल्या इंद्रियांना योग्य वळणच लावून ठेवतो तोच खरा सेवक, असे मी समजतो.
(७७६) जगातील प्रत्येक घडामोडीचे ज्ञान संपादन करून जो आपली विद्या सदैव सुसज्ज ठेवतो आणि आपल्या साध्या बोलण्यानेही लोकांची मने आपलीशी करून त्यांना सत्कार्याला लावतो तोच खरा सेवक, असे मी समजतो.
(७७७) आपल्यावर कोणीही कवडीपासून तो मुलीबाळीपर्यंत हवा तो ऐवज विश्वासाने सोपवू शकतील असा भरवसा लोकांना आपल्या वागणुकीने जाणून देतो तोच खरा सेवक असे मी समजतो.
(७७८) माझ्या गावात होणारे कोणतेही सत्कार्य माझेच आहे असे समजून लागेल ती मदत देण्यास जो सदैव तत्पर असतो आणि "जगातील प्रत्येक स्त्रीपुरूष माझ्या देवदेवतेप्रमाणेच आहेत" अशा निषेने वर्तन करतो तोच खरा सेवक असे मी समजतो.
सुविचार-स्मरणी
(७७९) आपल्या निश्चयात्मिका बुद्धीने ठरविलेले सदाचारयुक्त नित्यक्रम जे स्वप्नातही विसरत नाहीत, तेच पुरुष सत्संगाधिकारी असतात.
(७८०) संसारातील अनेक आपत्ती स्वतः:वर आल्या असताही आपला भार आपल्या पूज्य संतसद्गुरुवर न सोपविता दुःख भोगातही जे अंधश्रद्धा निर्माण होऊ देत नाहीत, तेच पुरुष सत्संगाधिकारी असतात.
(७८१) संतसंगाची महती व्यक्तित्वावर अधिष्ठिन नसून ती सदाचार नि सद्वृत्तीवरच अवलंबून असते असे समजून साधुजनांवर प्रेम करणारे पुरुषच सत्संगाधिकारी असतात.
(७८२) "सत्" शब्दाच्या मुळाशी दडी देऊन त्यातील अनुभवाचा ओलावा आपल्या हृदयात लक्ष्यार्थाने आकर्षून घेतात, तेच पुरूष सत्संगाधिकारी असतात.
(७८३) साधुपुरूषांच्या अनेक रंगांनी भरलेल्या वाक्यांतून आपल्याच अधिकारानुरूप रंगाचे महत्वाचे बोल एकतान लक्षाने निवडून घेऊन त्यायोगे स्थिर होतात, तेच पुरूष सत्संगाधिकारी असतात.
(७८४) बोध देण्याच्या वेळेचे महत्व जाणून अचुकपणे ती संधी चालकाप्रमाणे साधतात, तेच पुरुष सत्संगाधिकारी असतात.
(७८५) व्यक्तिसेवेच्या महत्त्वापेक्षा आज्ञासेवेचे महत्त्व अधिक प्रियोत्तम समजून जे सदैव सद्वचन पाळण्याकरिता तयार असतात, तेच पुरुष सत्संगाधिकारी असतात.
(७८६) सत्यत्वाने व आपल्या कष्टांच्या पराकाष्ठेने कमाविलेल्याज्ञद्रव्यातून वाचलेल्या पैशांचा जे सदुपयोग करितात- योग्य अशाच कार्यी लावतात- तेच खरे दानशूर म्हटले जातात.
सुविचार-स्मरणी
(७८७) आपल्या दानाने जगात भिकार किंवा विकारवृत्ती अधिक न वाढविता विद्या व कला वाढवून भिकार मनाच्या लोकांना उद्योगी लावतात तेच खरे दानशूर म्हटले जातात.
(७८८) दान हे वाडवडील स्वर्गात जातात म्हणून दिले जात नसते, तर या जगात त्यांचे नाव व त्यासह कर्तव्य-तत्परता नांदावी आणि लोक सर्वकाळ त्यांच्या नावाने कार्यी लागावेत म्हणून दिले जात असते; असे समजून जे लोक त्या दानाचा तसाच उपयोग करुन घेतात व देतात तेच खरे दानशूर म्हटले जातात.
(७८९) संकटग्रस्तांकरिता किंवा पतित पददलितांकरिता आपला मोठेपणा विसरुन व मृत्यूची पर्वा सोडून जे धडाडीने पुढे पाऊल घेतात तेच खरे दानशूर म्हटले जातात.
(७९०) आपणास आवश्यक असताही दुसऱ्याची अत्यंत गरज ओळखून आपल्याजवळील बहुमोलही वस्तू जे अडलेल्यांच्या कामी निरभिमानपणे लावतात व त्याचा मोबदला मुळीच इच्छित नाहीत तेच खरे दानशूर म्हटले जातात.
(७९१) स्वत:च्या स्वार्थावर किंबहना सर्वस्वावर पाणी सोडण्याचा प्रसंग आला तरी जे सत्यधर्मांकरिता, परोपकाराकरिता व राष्ट्रहिताकरिता मागे हटत नाहीत तेच खरे दानशूर म्हटले जातात.
(७९२) आपल्या प्रिय वस्तूचे प्रभावी भाव आपल्या नसानसांत भरण्याकरिता व त्यांची परिणामस्वरुप अवस्था सदैव टिकून राहण्याकरिता गायनवादनाच्या मदतीने-आपणास सवयच लागेल अशी- महत्वपूर्ण शब्दप्रणाली पाठ करणे यालांच मी भजन म्हणतो.
सुविचार-स्मरणी
(७९३) आपल्या आतुर हृदयाची हाक आदर्श देवतेसमोर भावनाशक्तीने प्रकट करुन त्यातच मनाची दृढता निर्माण करण्याकरिता, अर्थात आपलेच विचार आपणावर परिणामकारक व्हावेत याकरिता स्वरज्ञानाच्या सहाय्याने मनाची लय साधणे यालाच मी भजन म्हणतो.
(७९४) श्रेष्ठांचे मननीय शब्द हृदयपटलावर उत्तम तऱ्हेने रेखाटले जावेत म्हणून शरीराशी संलग्न असलेल्या वृत्ती नम्र करुन व संगीतात नाचून गाऊन त्या शब्दांना चिरस्मरणीय करुन ठेवणे यालाच मी भजन मानतो.
(७९५) बाणेदारपणाची धमक योजक शब्दांनी पूर्णपणे आपणात बाणावी व ती यंत्राप्रमाणे कार्यकारी व्हावी म्हणून जनांत व मनात त्याच विचारांनी धून लावणारे भाव प्रकट करणे यालाच मी भजन म्हणतो.
(७९६) जगातील घृणामय वागणुकीला अनेक दृष्टांतांनी रंगवून स्फूर्तिदायक शब्दावेशात तिरस्करणीय करुन दाखविणे आणि आपल्या उन्नत कर्तव्याची घोषणा वाजागाजाने रंगात व संगीतात करणे; तसेच आपले स्फूर्त विचार आपल्या दृढनिश्चयाच्या व परिपक्वतेच्या उन्मन वृत्तीने अनुभवपूर्वक
सांगणे यालाच मी भजन समजतो.
(७९७) आपण ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहोत, त्याच्या प्रकाशाचा आदर्श पुन्हा पुन्हा समोर घेऊन त्याचा आनंद नव्यानव्याने चाखावा म्हणून स्फूर्त विचारांनी प्रभूशी लीन
(समरस) होणे तादात्म्य अनुभवणे यालाच मी भजन
समजतो.
सुविचार-स्मरणी
(७९८) प्रत्येक अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीचा विचार करुन समाजाला नेहमीच्या अभ्युदय आणि नि:श्रेयसाच्या समतोल भूमिकेवर ठेवणाऱ्या सद्-बोधांनाच मी शास्त्र समजतो.
(७९९) ज्यात समाजाच्या संघटनेपासून तो विश्वाच्या समतेच्या नात्यात मिळून जाण्याच्या बोधाची परिसीमा दाखविली गेली असेल त्यालाच मी शास्त्र समजतो.
(८००) ज्यात समाजास पोषक व आवश्यक अशा लहान-सहान गोष्टींनाही महत्वाचे व बरोबरीचे स्थान देऊन, बुद्धि-विकास व आरोग्य यांचा तसेच उद्योग, कला व कौशल्याचा तोल सांभाळला जातो, त्या बोधालाच मी शास्त्र समजतो.
(८०१) समाजात तपस्वी बुद्धिमानांकरिता ब्राह्मणत्व, बलवानांकरिता क्षत्रियत्व, उद्योगवानांकरिता वैशत्व आणि या तिन्ही गोष्टींनी विहीन असणाऱ्यांकरिता शूद्रत्व, हे सर्व ज्यात गुणांवरून दर्शविले जाते, त्या तत्त्वसूत्रांनाच मी शास्त्र समजतो.
(८०२) जन्मास येऊन कार्यप्रवृत्त झालेल्या प्रत्येक मानव-प्राण्याकडून त्याच्या वैयक्तिक कार्याबरोबरच त्यास सामुदायिकत्वाचे वर्म तेवढ्याच महत्त्वाने पटवून देऊन *धर्म* म्हणून आचरुन घेणाऱ्या अधिकारवाणीलाच मी शास्त्र समजतो.
(८०३) समाज-बिंदू अप्रसंगी मोकळे राहिले तरी प्रसंगी समाज-जीविताच्या सुरक्षिततेकरिता एकत्र होऊन देश, काल व परिस्थितीला अनुलक्षून आकुंचित मतभेदांना न जुमानता गंगेप्रमाणे समाज-समुद्रात मिसळावेत यासाठी जी वाणी पूर्णतया सहमत वा कारणीभूत होते, त्या सनातन
तत्त्वबोधांनाच मी शास्त्र समजतो.
सुविचार-स्मरणी
(८०४) समाजातील दुर्गुणांची शक्ती समतोल रहावी याकरिता आपल्या बुद्धीचा नकाशा जो आपल्या शुद्ध व निर्लोभी दृष्टीने सारखा पाहात असतो; तसेच समाजाच्या कोणत्याही अव्यवस्थेबद्दल हेळसांड न करिता, जो जरुर तेथे लक्ष घालून त्यास उन्नत करण्याकडे आपले आयुष्य वेचतो, त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
(८०५) लोकांच्या मनोवृत्तीत *अमकी कला तुच्छ आणि अमका गुण नीच* असा भाव न येऊ देण्याची जो सतत काळजी वाहतो तसेच सर्व मानवांना उद्योगवृत्तीने, त्यांच्या गुण व कर्माच्या योग्यतेनुसार तसेच अंतरंगातील आत्मत्त्वास स्मरुन समान समजून, जो सर्वाकरिता आपली भावना सारखी ठेवतो त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
(८०६) गेल्या प्रसंगाचे आणि येणाऱ्या प्रसंगाचे लक्षपूर्वक मनन करुन, अनेक श्रेष्ठांना संमिलित करुन घेऊन समाजाच्या धारणेकरिता त्याच्या रचनेत योग्य तो फेरफार करण्याचे- तपश्चर्या,ज्ञत्याग आणि सुबुद्धी यांनी युक्त असे-धाडस जो आपल्यात ठेवतो, त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
(८०७) आपले सुविचार प्रतिबंधक शक्तीच्या माणसांकडून दाबलेज्ञजातात व समाजात अव्यवस्था निर्माण होते हे बघताच समाजाची न्यायधारणा सांभळणारा क्षात्रवर्ग सामदाम-दंडभेदाने स्वकार्यी जो सुसज्ज ठेवतो, त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
(८०८) या अखिल विश्वात अविनाश, अपरिवर्तनशील, अमर्याद
व आनंदस्वरुप अशी जी सत्य वस्तू आहे, त्याच गुरुशक्तीचा जगत् हे चिद्-विलास आहे, किंबहुना ती एकच अनेकत्वाने नटलेली आहे, म्हणून *सर्वांनी ती धारणा ठेवावी व सर्वात्मक भावाने सर्व सुखी व्हावेत या उद्देशाने जो अशा सद्-बोधाचा सतत उपदेश करतो, त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
सुविचार-स्मरणी
(८०९) *प्रत्येक कार्याच्या पाठीशी आध्यात्मिक तेजाची जरुरी आहे* हा नेहमीचा सिद्धांत पटवून देऊन उपदेशाबरोबरच आत्मीयताही पण जो सक्रियतेने दाखवितो, त्यालाच मी शास्त्री असे समजतो.
(८१०) आपल्या वैयक्तिक हिताकरिता दुसऱ्याचा दोष सांभाळून नम्रता दाखविणारे लोक *मुके मैंद* असतात.
(८११) गुंड लोकांच्या तावडीत जाऊन आपले न्याय्य मानाधिकार वा हक्क सोडणारे लोक *नपुंसक* असतात.
(८१२) आपल्या इष्ट देवतेच्या मार्गात अडथळा आल्यास त्याला तोंड न देता मागे फिरतात व ब्रह्मज्ञान सांगतात ते लोक *देवाचे वैरी* असतात.
(८१३) इंद्रियांच्या सुखाकरिता अति उदार नि आपुलकी दाखविणारे लोक महान *कपटी* असतात.
(८१४) दुसऱ्यांचे अज्ञान न घालवता त्याचा उपयोग स्वतःचा स्वार्थ साधण्याकडे जे करुन घेतात ते *घोर अन्यायी* असतात.
(८१५) बिघडलेले दुरुस्त करण्याची बुद्धी न धरता जे निष्क्रीय निंदा करतात ते *दुबळे नि भेकडे* समजले जातात.
(८१६) गरीबांवर आघात करुन धन कमावून कीर्तीसाठी पुण्यकर्म करणारे लोक देवाजवळ *गुन्हेगार* ठरत असतात.
सुविचार-स्मरणी
(८१७) हरिभक्तीला व्यापार समजून तशा दृष्टीने जे देवभक्ती व देशभक्ती करितात ते फुटक्या कवडीचाही मान मिळवित नसतात.
(८१८) आपल्या मोठेपणाचा फायदा दुसऱ्याकडून कष्टाने सेवा घेण्यात करुन घेतात ते जिवंतपणीच *भुते* होतात नि त्यांची दुर्गती लोक आनंदाने बघतात.
॥ हरि ॐ तत्सत् ॥